भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारण या मालिकेनंतर टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा अभ्यास कसा झाला आहे हे स्पष्ट होईल. या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होत आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 44 हजार तिकीटांची विक्री झाली आहे. आता ही गर्दी पाहता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. नागपूर ते जामठा स्टेडियमपर्यंत वर्धा रोडवर सामना पाहायला जाणाऱ्यांची गर्दी असेल. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आतापासून उपाययोजना सुरु केल्या आहेत. मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी खास प्लानिंग आखलं आहे. यासाठी 550 वाहतूक पोलीस असणार आहेत. बंदोबस्तासाठी 1500 च्या जवळ पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. 7 ठिकाणी वेगवेगळ्या पार्किंग व्यवस्था करण्यात आल्या आहे. तसेच एन्ट्री आणि एक्झिट वेगवेगळ्या मार्गाने असणार आहे. क्रेन आणि टोइंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून वाहतुकीचं निरीक्षण करून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.क्रिकेटप्रेमींना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे मेट्रो आणि महापालिका बसचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आव्हान पोलिसांनी केलं आहे.
दरम्यान, टेलीग्राम स्पोर्टच्या रिपोर्टनुसार इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथ पिंडली याला दुखापत झाली आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांना मुकणार आहे. जेमी स्मिथने अलीकडेच भारताविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान पदार्पण केलं होतं. जेमी स्मिथला टी20 मालिकेत 2 सामने खेळण्याची संधी मिळाली. जेमी स्मिथची अनुपस्थिती इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. इंग्लंडकडे सध्याच्या संघात फिल साल्ट आणि बटलरच्या रूपात दोन यष्टिरक्षक-फलंदाज आहेत.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार) , शुबमन गिल , श्रेयस अय्यर , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , ऋषभ पंत , केएल राहुल , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , अर्शदीप सिंग , हर्षित राणा , कुलदीप यादव , मोहम्मद शमी.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार) , हॅरी ब्रूक , बेन डकेट , जो रूट , फिलिप साल्ट , जेमी स्मिथ , जेकब बेथेल , ब्रायडन कार्स , लियाम लिव्हिंगस्टोन , जेमी ओव्हरटन , जोफ्रा आर्चर , गस अॅटकिन्सन , साकिब महमूद , आदिल रशीद , मार्क वूड.