Anjali Damania Accuses Dhananjay Munde of ₹142 Crore Scam : कृषीमंत्री असताना धनंजय मुंडेंनी १४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा मोठा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंदर्भातील गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.
अंजली दमानिया यांनी नेमके काय आरोप केले?"कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अफाट पैसा खाल्ला. त्यांनी सर्व कायदे पायदळी तुडवून जवळच्या कंपन्यांना कंत्राटं दिली. कंत्राट कुणाला द्यायचं हे आधीच ठरलं होतं. कृषीमंत्री असताना नॅनो युरीया, नॅनो डीएपी आणि फरावणी यंत्राच्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला'', असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
''नॅनो युरीयाची बॉटल बाजारात आज ९० रुपयांना मिळते. मात्र, धनंजय मुंडे यांच्या खात्याने ती बॉटल २२० रुपयांना खरेदी केली. याशिवाय ५७७ रुपयांच्या नॅनो डीएपीच्या बॅगा १२०० रुपयांना विकत घेतल्या गेल्या. तसेच २४०० रुपयांचा फवारणी पंप ३ हजार रुपयांना खरेदी केला, या खरेदीत धनंजय मुंडेंनी ८८ कोटी रुपयांचा घोटाळा केला'', असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.
''कंत्राटदारांना पैसे देताना मागच्या तारखेत सह्या करण्यात आल्या, याशिवाय कापसाच्या बॅग खरेदी करण्यातही घोटाळा झाला. एकंदरित धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी एकूण १४२.६८ कोटी रुपयांचा घोटाळा केला'', असंही अंजली दमानिया यांनी सांगितलं.
''महत्त्वाचे म्हणजे म्हणजे आणखी एका प्रकरणाची माहिती, माहितीच्या अधिकारात देण्यात आली नाही. या सर्व प्रकरणातील घोटाळ्याची गोळाबेरीज केली, तर धनंजय मुंडे यांनी एकूण २७५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं स्पष्ट केलं होत आहे'', असंही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना, ''धनंजय मुंडे मंत्रीपदासाठी योग्य नाही. त्यांनी कृषीमंत्री असताना मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवावं, याचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे, तसेच अशा व्यक्तीला भगवान गडाने पाठिंबा द्यावा का, याचाही विचार व्हायला हवा'', अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली.