बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकाडांतील आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल अद्याप पोलीस, एसआयटी आणि सीआयडीला मिळालेला नाही. तसेच हत्येला दोन महिने होत आले तरी फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडलेला नाही. तो बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याची शक्यता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. हत्याकांडातील सर्व आरोपींची स्पेशल रिमांड घेऊन त्यांच्याकडून हत्येचे सर्व पुरावे गोळा करावे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
संतोष देशमुख हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला पोलीस आणि सीआयडीकडून अटक करण्यात आली नाही, हत्येच्या 22 दिवसानंतर तो स्वतःहून केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात शरण आला. तर हत्येतील दुसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तो बाहेर राहून गुन्हेगारीचे सर्व पुरावे नष्ट करण्याची भीती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
धनंजय देशमुख यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्याकडे पुरावे गोळा करण्यासाठी स्पेशल रिमांडची मागणी केली आहे. त्यासंबंधी त्यांनी आज माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुका अध्यक्ष विष्णू चाटे याचा मोबाईल अद्यापही तपास यंत्रणेने हस्तगत केलेला नाही. त्याच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासोबतच वाल्मिक कराडसोबतच्या संघटीत गुन्हेगारीचे सर्व पुरावे आहेत. हा मोबाईल लवकरात लवकरच पोलीसांनी हस्तगत करावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती आहे. मोबईलमध्ये संघटीत गुन्हेगारीचे सर्व पुरावे असू शकातात. त्यासाठी सर्व आरोपींची स्पेशल रिमांड घेऊन त्यांची चौकशी करावी. विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये त्यांच्या गुन्हेगारीचे सर्व पुरावे असण्याची शक्यता आहे. त्यांच्या गुन्हेगारीची पाळेमुळे कुठपर्यंत पोहचली आहेत हे मोबाईल हस्तगत केल्यानंतर समोर येईल. कृष्ण आंधळे यालाही लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, अन्यथा बाहेर राहून तो हत्येचे सर्व पुरावे नष्ट करु शकतो.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आरोप केला की, कृष्णा आंधळे हा फार लांब नाही. तो बीडच्या आसपासच बुलढाणा, सोलापूर, जालना या भागात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठीच तो अद्याप फरार आहे का? असा सवाल आता उपस्तित होत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधाचा भांडाफोड करणार आहेत. मुंडे यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट नियमांचे कसे उल्लंघन केले याचे पुरावे सादर करणार असल्याचे म्हटले आहे. हे पुरावे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावाच लागेल, तसेच निवडणूक आयोग त्यांची आमदारकी रद्द करेल असा दावा दमानिया यांनी केला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याशिवाय देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे.
दमानियांच्या दाव्यासंदर्भात धनंजय देशमुख म्हणाले की, दमानिया या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पुराव्या शिवाय त्या काही बोलत नाही. त्या आज पत्रकार परिषद घेणार असतील तर त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असल्याशिवाय त्या समोर येणार नाहीत.
धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख हे नुकतेच भगवान गडावर जाऊन आले. तिथे त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे आतापर्यंतचे कारनामे काय-काय आहेत याचे पुरावे सादर केले. त्यानंतर शास्त्रींनी भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नाही तर देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे म्हटले. आता बीड मधील नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज आज देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे.