पिंपरी - नवीन आर्थिक वर्षात अर्थात एक एप्रिलपासून रेडिरेकनरनुसार जागेच्या किमती वाढू शकतात. मुद्रांक शुल्कात वाढ होऊ शकते. बांधकाम साहित्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीही वाढू शकतात. परिणामी, ३१ मार्चपर्यंत अर्थात पुढील दोन महिन्यांत घर घेण्याची चांगली संधी नागरिकांपुढे आहे. बॅंकांचे धोरणही गृहकर्जासाठी सकारात्मक असून, काही बॅंका तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा करत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी स्वतःचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण, मनासारखं ठिकाण, परवडणारे घर, लाखो रुपयांची तजवीज, कर्ज मंजुरी अशा विविध अंगांनी अनेकदा विचार केला जातो. मुलांचे शिक्षण की घर?, कशाला प्राधान्य द्यायचे?, लाखो रुपयांची कशी व्यवस्था करायची? असे अनेक प्रश्नही मनात डोकावू शकतात. शिवाय, विविध अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ‘आता नाही, पुढे बघू’ असे म्हणत घर घेण्याचा विचार पुढे ढकलला जाऊ शकतो. पण, ‘आता नाही तर पुढेही कदाचित नाहीच,’ अशी स्थिती उद्भवू शकते.
आताच घर का?
एक एप्रिलपासून रेडिरेकनरनुसार जागेच्या किमती वाढू शकतात
जागेच्या किमती वाढल्यास खरेदीसाठी मुद्रांक शुल्क अधिक लागू शकते
एक एप्रिलपासून मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे
बांधकाम साहित्याच्या किमती सतत वाढतच आहेत
३१ मार्चपर्यंतचा विचार करून, घरांचे स्वप्न साकार करता येईल
पर्यायाने घरांच्या किमतीही वाढतील आणि घर घेणे आणखी त्रासदायक ठरू शकते
सध्या बॅंकांचे धोरणही गृहकर्जासाठी सकारात्मक आहेत
काही बॅंका तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत कर्जपुरवठा करत आहेत
‘नवीन आर्थिक वर्षात अर्थात एप्रिलपासून रेडिरेकनर दर वाढण्याची शक्यता असल्याने घरांच्या किमती वाढतील. सध्या पुण्यातील घरांच्या किमतीत १५ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत मालमत्ता नोंदणी ३९ टक्क्यांनी वाढली आहे. शहरातील प्रॉपर्टी मार्केटला मिळत असलेला प्रतिसाद पाहता नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारतातील राहण्यायोग्य सर्वोत्तम तीन शहरांमध्ये पुणे एक आहे. उत्तम पायाभूत सुविधा, वेगाने वाढणारे अर्थव्यवस्थेचे केंद्र, दर्जेदार शिक्षणसंस्था आणि आयटी हब यामुळे शहराचा दर्जा सतत उंचावत आहे. फक्त फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे नवीन दर लागू होण्यापूर्वी घर घेण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे.
- आकाश फरांदे, व्यवस्थापकीय संचालक, फरांदे स्पेसेस
‘नवीन आर्थिक वर्ष सुरू व्हायला अवघे दोन महिने शिल्लक आहेत. शिवाय, एक फेब्रुवारीला केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. त्यातून बांधकाम क्षेत्रासाठी सकारात्मक दिशा मिळाली आहे; पण रेडिरेकनरनुसार जागेच्या किमती वाढू शकतात. परिणामी, घरांच्या किमतीही वाढतील. सध्या घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा चांगली संधी आहे. केवळ नोकरदारच नव्हे तर, मिळकतकर भरणारे आणि न भरणाऱ्या सर्वांसाठीच पुढील दोन महिन्यांचा कालावधी फायद्याचा ठरणार आहे.
- आकाश अगरवाल, संचालक, क्रिसाला डेव्हलपर्स
घर घेण्यासाठी पुढील दोन महिन्यांचा कालावधी सुवर्णसंधी ठरणार आहे. कोरोना काळापासून गृहकर्ज असो की कोणतेही कर्ज प्रक्रियेसाठी अनेक बॅंकांनी ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. यामुळे बॅंकांमध्ये जाऊन कागदपत्रांचा गठ्ठा जमा करून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी लागणारा वेळ वाचत आहे. प्राप्तीकर भरणारे (आयटीआर) व न भरणाऱ्यांसाठीसुद्धा गृहकर्जाच्या सुविधा आहेत. आयटीआर नसलेल्यांना त्यांच्या चालू बॅंक खात्याच्या आधारावर गृहकर्ज दिले जात आहे. शिवाय, घराच्या एकूण किमतीच्या ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यामुळे घर घेण्याची चांगली संधी नागरिकांपुढे आहे.
- असिफ शेख, उपव्यवस्थापक, गृहकर्ज विभाग, एचडीएफसी, पिंपरी
‘मी सध्या भाडेतत्त्वावर वन बीएचकेमध्ये राहात आहे. बारा हजार रुपये महिन्याचे भाडे आहे. मोठी मुलगी बारावीला आहे. तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत. तिच्यापेक्षा लहान मुलीचे व मुलाचे शिक्षण सुरू आहे. आम्हाला स्वतःचे घर घ्यायचे आहे. पण, खासगी नोकरीमुळे आयटीआर नाही. त्याशिवाय, कर्ज मिळते का? याचा शोध घेत आहे. काळेवाडी, चिखली, आळंदी, चऱ्होली, चाकण भागातील गृहप्रकल्पांतील फ्लॅट बघितले आहे. पण, किती कर्ज बॅंक मंजूर करते, त्यावर पुढचे नियोजन आहे. त्यासाठी बॅंकेकडे चौकशी करत आहे.
- संजय हरळे, कामगार, काळेवाडी