ढिंग टांग : बाबा बंगाली की जय हो..!
esakal February 05, 2025 12:45 PM

जगविख्यात वशीकरणतज्ञ पू. बाबा बंगाली यांना कोण ओळखत नाही? आमचे त्यांना हमेशा वंदन असो. ‘मशहूर औलिया बाबा बंगाली, टोटका, जादूटोना, वशीकरण एवं मंत्रतंत्र में एक्सपर्ट. ३० दिन में रिझल्ट न आनेपर पैसा वापस. गारंटी के साथ. तुरंत मिलें : बाबा बंगाली, रु. नं. १०७, रेड रोज होटल के सामने’ या अँड्रेसवर मन:शांती प्राप्त होते. एकदा अनुभव घेऊन पाहावा! संतान की पीडा, शादी में रुकावट, प्रापर्टी का मसला, कोरट का मामला, अशा कैक विवंचनांचा अक्सीर एवं जालीम इलाज म्हणजे बाबा बंगाली!!

गेले काही दिवस चित्रविचित्र अनुभव येत होते. जरा निवांत खुर्चीत बसलो की कुणीतरी शुक शुक करतंय, असा भास होत होता. झपकन कुणीतरी डावीकडून उजवीकडे गेलंय, असं वाटायचं. शेवटी बाबा बंगाली यांच्या कोठीवर जाणे भागच पडले…

पाहातो तो काय, तेथे ऑलरेडी एक हुडीधारी व्यक्ती गॉगल चढवून ( पक्षी : वेषांतर) बसली होती. बाबा बंगालींचे पित्ते काही जामानिमा मांडत होते. खारीची शेपूट, सापाची कात, वटवाघळाचे तेल, (हे कसे काढतात, हे पाहून ठेवले पाहिजे.) घुबडाचा पंख, ( तो कसा ओळखतात, हेही पाहून ठेवले पाहिजे) नाना प्रकारच्या माळा, मोरपीसांचा झाडू असले काहीबाही समोर मांडले जात होते. बाबाजींचा पत्ता नव्हता…

‘काही प्रॉब्लेम?’ आम्ही उगीचच विचारले. दवाखान्यात डॉक्टरकडे जाऊन जीभ दाखवण्यापूर्वी हातात (रिकामी) बाटली धरुन वाट बघताना दोन पेशंट एकमेकांशी काही ना काही बोलतातच.

त्यावर सदरील व्यक्तीनं हुंदकाच दिला. म्हणाली, ‘‘काय सांगू? काल बंगल्याच्या हिरवळीवर रेड्याचं शिंग पुरलेलं आढळलं!’

‘बापरे, काय सांगताय काय?,’ आम्ही उगाचच म्हणालो. वास्तविक रेड्याचे शिंग कसे ओळखायचे, हे आम्हाला ठाऊक नाही. उद्या कोणी सशाचे शिंग म्हणून रेड्याची शिंगे दाखवली, तरी आम्ही ‘अरे वा’ असेच म्हणू.

‘रेड्याची शिंगं सापडल्यामुळे मी त्या बंगल्यात अजून राहायला जाऊ शकलो नाही! आज रेड्याची शिंगं सापडली, उद्या आणखी काही सापडेल!,’ हुडीवाले गृहस्थ चिंतेने काळवंडून म्हणाले.

‘काय सांपडेल?,’ आम्ही विचारले. ते थोडे चपापले.

‘हल्ली जो कोणी येतो तो काळी जादू करतो! सगळेच अशी काळी जादू करायला लागले तर माणसानं कारभार कसा करायचा?’ ते उद्वेगाने म्हणाले.

‘पण रेड्याची शिंगं तुमच्या बंगल्याच्या आवारात ठेवली कुणी?,’ आम्ही अजूनही त्या शृंगापत्तीतच अडकलो होतो.

‘या बाबा बंगालीनेच! आधीच्या मालकानं बंगल्यात यांच्याकडूनच शिंग पुरुन घेतली, आता काढण्यासाठी आम्ही त्यांनाच सांगायला आलोय!,’ वैतागून हुडीधारी व्यक्ती म्हणाली.

आम्ही मनात म्हटले, च्यामारी, हा धंदा बरा आहे! जादूटोणा करायचा, आणि नंतर त्यावर तोडगाही आपणच काढायचा. दोन्ही पार्ट्यांकडून पैसा उक़ळायचा!! हे नवं स्टार्टप बरंय, असा विचार आमच्या सुपीक डोक्यात येऊन गेला.

‘या बंगालीबाबाने महाराष्ट्रातल्या झाडून सगळ्या मोठमोठ्या नेत्यांच्या बंगल्यांमध्ये काही ना काही पुरुन ठेवलं आहे! कुठे खिळे ठोक, कुठे घुबडाचे खूर पुरुन ये, असले यांचे उद्योग!’ हुडीधारी व्यक्ती संतापाने म्हणाली. त्या संतापाच्या भरात घुबडाला खूर कुठे असतात, हा प्रश्न हवेतच विरला.

…तेवढ्यात बंगालीबाबा प्रविष्ट झाले, विजयी मुद्रेनं आमच्याकडे बघून त्यांनी हाताची घडी घातली, आणि मान उडवत म्हणाले, ‘‘कल सुबह कू सव्वानौ बजे का भोंगा देखो, रेडे का शिंग किसने रख्खा पता चल जायेगा!’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.