- सागर मालपुरे, सीएमए, अध्यक्ष-पिंपरी-चिंचवड चॅप्टर
‘सीएमए’ यांचं काम कशा स्वरूपाचं असतं?
- सीए, सीएस आणि सीएमए हे शब्द वारंवार आपल्या कानावर पडत असतात. मात्र, सोप्या शब्दांत त्यांची कामे सांगायची झाली, तर कंपनी सेक्रेटरी (सीएस) हा कंपनी कायद्याशी संबंधित सर्व कामे, व्यवहार पाहत असतो. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) हा कंपनीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं ‘फायनान्शिअल स्टेटमेंट’ तयार करतो. कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची ‘कॉस्ट’ म्हणजेच किंमत किती असावी? त्यानुसार त्या वस्तूची गुणवत्ता राखली जाते की नाही? कमी किमतीतही गुणवत्तेत तडजोड होता कामा नये, या सर्व गोष्टींचं नियंत्रण, व्यवस्थापन करण्याचं काम कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएम) करत असतो. हा मूलतः फरक आहे. त्यामुळे ‘सीएमए’ सर्व ठिकाणी लागतो.
‘सीएमए’ची गरज कुठे कुठे भासते?
- कोणत्याही कंपनीला आपलं उत्पादन कमीत कमी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आवडतं. कारण, त्यामुळे मागणी वाढते. यासाठी जागतिक बाजारपेठेत मोठी स्पर्धाही असते. मात्र, किंमत कमी होताना वस्तूची गुणवत्ता कमी होते आहे का? काळा बाजार होतो आहे का? अचानक किंमत कमी-जास्त होते आहे का? त्याचा उत्पादनावर काही परिणाम होतो का? याचं नियंत्रण सीएमए करतात. ते ‘कॉस्ट ऑडिट’ करतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीला सीएमए लागू शकतो. ‘रेग्युलेटरी सेक्टर’ जसं की औषधनिर्माण क्षेत्रात ‘सीएमए’ची भूमिका महत्त्वाची ठरते. इलेक्ट्रिसिटी, तेल, स्टील, सिमेंट यांसह अनेक सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रातही ‘सीएमए’ कार्यरत आहेत.
या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घेता येईल?
- देशभरात आमचे १०० हून अधिक चप्टर (विभाग) आहेत. जगातही काही ठिकाणी आहे. तेथे हा अभ्यासक्रम शिकवला जातो. कोणत्याही शाखेतून बारावी झालेला विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल अशा तीन टप्प्यांत ही परीक्षा होते. पदवीधर विद्यार्थी थेट इंटरमिजिएटला प्रवेश घेऊ शकतो. बारावीनंतर तीन, तर पदवीनंतर दोन वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण होतो. बहुपर्यायी, सविस्तर उत्तरे आणि गणित अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. फायनलच्या मुलांना काही काळ आर्टिकलशिप करावी लागते. त्याचा त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळतो. ‘सीएमए’ झालेले विद्यार्थी कौशल्याच्या जोरावर पुढे जाऊन ‘सीईओ’, ‘सीएफओ’ही होतात. आमचे अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
‘सीएमए’ होताना...
स्थानिक ते जागतिक अशा विविध प्रकारच्या बाजारपेठांचा अभ्यास करा.
कंपन्यांमध्ये होणारे बदल आणि त्याचा उत्पादनावर होणारा परिणाम, यानुसार कामाची पद्धत ठरवा.
पारंपरिक क्षेत्रांबरोबरच ‘जीएसटी’सारख्या नव्या व आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी स्वतःला तयार करा. अभ्यास करा.
(शब्दांकन : मयूर भावे)