- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
दहावीनंतर योग्य शाखा निवडल्याने करिअरची दिशा ठरते, वैयक्तिक आवडीनुसार समाधान मिळते आणि मधल्या टप्प्यावर असमाधान किंवा कोर्स बदलण्याची गरज टळते. त्यामुळे वेळ, श्रम व पैशांची बचत होते. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, व्होकेशनल इ.पैकी योग्य शाखा निवडीचे निकष आपण आजच्या लेखात पाहू.
योग्य शाखा निवडीतील पायऱ्या
सखोल संशोधन - आवडीच्या क्षेत्रातील करिअर संधी, अभ्यासक्रम, कोर्सचा कालावधी, विविध विषय, प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती मिळवावी. त्यासाठी महाविद्यालयाला भेट देणे, वेबसाइट बघणे, शैक्षणिक प्रदर्शने अधिकृत स्रोतांचा आधार घ्यावा.
आवड आणि कौशल्यांचा शोध - विद्यार्थ्यांनी त्यांची आवड, कौशल्ये, व्यक्तिमत्त्व, कौटुंबिक पार्श्वभूमी याचा शोध घ्यावा. यासाठी पालक, शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सल्ला उपयुक्त ठरतो.
कल चाचणीचा ‘कल’ - ॲप्टिट्यूड टेस्टच्या (कल चाचणी) माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमता, कल, अभ्यासाची पद्धत, व्यक्तिमत्त्व याची योग्य माहिती मिळू शकते. करिअर समुपदेशकांचा तज्ज्ञ सल्ला योग्य निर्णयाप्रत पोहोचण्यास मदत करतो. या आधारे अनेक मिसिंग डॉट एकत्र करून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समेट घडवून शाखा निवड सोपी करता येऊ शकते.
अभ्यास पद्धतीचा ‘अभ्यास’ - निवडलेल्या शाखेमध्ये शिकण्याच्या, परीक्षेच्या, लक्षात ठेवण्याच्या पद्धती याचे महत्त्वपूर्ण योगदान यश मिळवण्यामध्ये असते. कल व क्षमता असतानाही अभ्यास करण्याची योग्य पद्धत नसल्यास अनपेक्षित निकालास सामोरे जावे लागू शकते. कल, क्षमता व अभ्यासाची पद्धत याचा त्रिवेणी संगम झाल्यास निवडलेल्या शाखेत यश मिळवण्यास मदत होते.
‘प्रवेश परीक्षां’चा अभ्यास - निवडलेल्या शाखेतील बारावीनंतरच्या कोणकोणत्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षा आहेत, त्यांचा अभ्यासक्रम, काठिण्य पातळी, त्या प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धा, त्यातून मिळणारे प्रवेश, उपलब्ध महाविद्यालयांचे पर्याय इ. चा अभ्यास निर्णय घेण्यापूर्वी नक्की करावा. करिअर कशात करायचे? त्यातील प्रवेश परीक्षा कोणत्या? त्यासाठी शाखेची पात्रता कोणती? असे रिव्हर्स इंजिनिअरिंग करून निर्णयाप्रत पोहोचता येऊ शकते.
तज्ज्ञांशी संवाद - इच्छित शाखेत काम करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधल्याने त्या क्षेत्राची खरी परिस्थिती कळते. यासाठी अनुभवी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि त्या क्षेत्रातील व्यावसायिक, नोकरदार यांच्याशी चर्चा करावी. प्रत्यक्ष संवाद साधल्याने त्या क्षेत्रातील खऱ्या परिस्थितीचा अंदाज येतो.
तुलना टाळा - इतर विद्यार्थ्यांच्या निवडीशी स्वतःची तुलना न करता वैयक्तिक आवडी, ध्येय आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित करावे.
आवड आणि समाधान - ‘स्कोप’ आणि ‘पॅकेज’पेक्षा ‘कामातील समाधान’ आणि ‘आवडीचे काम’ यावर लक्ष द्या.
पालकांसोबत संवाद - कोणता क्लास लावू? कोणते महाविद्यालय निवडू? कुठले बोर्ड घेऊ? इत्यादी विषयांवरील चर्चेपलीकडे शाखा निवडीतील सर्व निकषांवर घरामध्ये साधकबाधक चर्चा होणे गरजेचे आहे.
निष्कर्ष
योग्य शाखा निवडण्यासाठी सखोल संशोधन, स्वतःच्या आवडी आणि क्षमतांचा विचार, तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य तयारी आवश्यक आहे. फक्त गुण आणि समाजाच्या अपेक्षांवर न थांबता, विद्यार्थ्यांच्या आवडी, कौशल्ये आणि उद्दिष्टांचा विचार करावा.
शाखा निवड दीर्घकालीन ध्येय आणि समाधानावर आधारित असावी, ज्यामुळे त्या शाखेत अभ्यास करताना रस येईल व यश संपादन करण्यास मदत होईल.