- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘किसी को घर से निकलते ही
मिल गई मंज़िल
कोई हमारी तरह उम्र भर
सफ़र में रहा’’
- अहमद फ़राज़
‘जिस दिन से चला हूँ,
मेरी मंझिल पे नजर है
आँखो ने कभी मिल का
पत्थर नहीं देखा!
- बशीर बद्र
रट्टा मारून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या युवतीचा मागील लेखात उल्लेख केला होता. युवतीच्या त्या वाक्याने माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती यादी पुढे देत आहे. काही तरी उत्तरे सापडतील म्हणून तुम्हालाही सामील करून घेतोय.
1) रट्टा मारून इंजिनिअरिंग पूर्ण करता येते?
2) इंजिनिअरिंगच्या शिक्षणाविषयी या युवतीने व्यक्त केलेले मत तुम्हाला योग्य वाटते का?
3) शिक्षणव्यवस्थेचाच मूलभूत काहीतरी गोंधळ आहे, असे तुम्हाला वाटते का?
4) कुठल्याही प्रकारच्या समजुतीशिवाय इंजिनिअरिंग पूर्ण करणे, शक्य असल्यास या युवतीकडे बुद्धिमत्तेपलीकडची काही, विशेष बुद्धिमत्ता असू शकते का?
5) इंजिनिअरिंगच्या शिक्षणाबद्दल आणि एकूण करिअरबद्दल तुम्हाला काय वाटते?
6) एकुणातच रट्टा मारून कोणतेही शिक्षण घेणारे असा वाक्यप्रयोग, इंजिनिअरिंग या क्षेत्राऐवजी केला तरी चालण्यासारखे आहे का?
वाचकांना यापेक्षा वेगळे प्रश्न पडू शकतात. चाचपडत का होईना शेवटी मार्ग सापडतोच असे म्हणता येईल. मुळात ती युवती बुद्धिमान आहे. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्या क्षेत्रात आपल्याला रस नाही, असाही साक्षात्कार तिला झाला असणार. काही प्रमाणात स्वतःशी प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? एखाद्या कोर्सला प्रवेश मिळाला नाही, अगदी एका गुणाने प्रवेश हुकला म्हणून रडत बसून, एन्ट्रन्स परीक्षेला परत बसण्यापेक्षा, आत्ता जे मिळतेय ते पदरात पाडून घेऊया. छंदाचे व्यवसायात रूपांतर वगैरे बघूया नंतर, असा थोडासा व्यावहारिक विचार करणे योग्य.
अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्यांबद्दल मी बोलत नाहीए ती तरून जातात. त्यांना सगळीकडे लाल गालीचे अंथरलेले असतात. भारतीय परिप्रेक्षात विचार करायचा म्हणजे काय तर, विद्यार्थी, स्पर्धक संख्या खूप आहे. एव्हरेस्ट शिखर एकच आहे ना? त्यावर चढण्याची पात्रता, वातावरण सगळ्यांच्याच वाट्याला सारखे येईल असे नाही. एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न समजा असफल झाला, तर खट्टू न होता, कांचनगंगा, कळसूबाई शिखर चढण्याचा प्रयत्न का करू नये. लसावि काय तर, खट्टू न होणे. स्वतःशीच स्पर्धा करणे केव्हाही श्रेयस्कर.
दहावीच्या परीक्षेला सामोरा जाणारा एका विद्यार्थ्याची त्याच्या पालकांसह भेट झाली. पालकांना बाहेर बसायला सांगितल्यावर तो मोकळेपणाने बोलायला लागला.
‘काका, मी शिक्षण घेतोय म्हणजे काय करतोय हो? कशासाठी करतोय हे सगळे. मुळात परीक्षा कशासाठी द्यायच्या?’
नेमक्या पौंगडावस्थेतील, शारीरिक व मानसिक अवस्थेत जडणघडण होण्याच्या वयात अत्यंत दबाव उत्पन्न करणाऱ्या परीक्षा असतात. पालकांना विनंती की पाल्याला दबावाखाली आणू नका. पाल्य बुद्धिमत्तेच्या नेमक्या कोणत्या गटात मोडते ते शोधा.
‘राह खुद मंझिल बन सकती है, मुश्किले मागे पडू शकतात. उम्र पडी है जिने के लिए.’