Team India New Jersey: रोहितला वगळून टीम इंडियाच्या खेळाडूंचे नव्या जर्सीसह फोटोशूट? BCCI च्या 'त्या' पोस्टनंतर चर्चांना उधाण
esakal February 05, 2025 11:45 PM

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड विरूद्धच्या वनडे मालिकेची आणि त्यानंतर होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेची तयारी करत आहे. भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका ६ फेब्रुवारीला सुरू होणार आहे.

त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळली जाणार आहे. अशातच आता बीसीसीआयने बुधवारी (५ फेब्रुवारी) केलेल्या एका पोस्टमुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताच्या नव्या अनावरण झाले होते. त्यानंतर आता या नव्या जर्सीत भारतीय संघातील खेळाडूंचे फोटोशूटही झाल्याचे समजत आहे. बीसीसीआयने १५ खेळाडूंचे नव्या जर्सीतीली फोटोही शेअर केले आहेत.

नवी वनडे जर्सीही निळ्या रंगछटेतील आहे. या जर्सीतील लक्षवेधी गोष्ट म्हणजे खांद्यावर भारताच्या राष्ट्रध्वजातील तिन्ही रंग आहेत. या नव्या जर्सीत विविध पोझ देऊन खेळाडूंचे फोटो काढण्यात आले आहेत.

मात्र, या फोटोशूटमधील केवळ १५ खेळाडूंचेच फोटो बीसीसीआयने आधी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचाच फोटो नाही. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

बीसीसीआय रोहित कर्णधार म्हणून त्याच्यासाठी वेगळी खास पोस्ट करणार आहे का? कारण त्याचा बाकी खेळाडूंमध्ये फोटो नाही, असे प्रश्नही सोशल मिडिया युझर्सने विचारले आहेत. काहींनी बीसीसीआयला रोहित शर्माचा फोटो कुठेय, त्याचा फोटो न टाकण्यामागील कारण काय, असाही प्रश्न विचारला आहे.

आता रोहितचा फोटो बीसीसीआयने का टाकला नाही, तो फोटोशूटसाठी उपलब्ध होता की नाही, याबाबत अद्यापतरी कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये इंग्लंड विरूद्धच्या वनडे संघात निवडलेल्या शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, , केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा या १५ खेळाडूंचे फोटो आहेत. मात्र, त्यात रोहित शर्माचा मात्र फोटो नाही.

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा , मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका (वेळ - दु. १.३० वाजता)
  • ६ फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर

  • ९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक

  • १२ फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.