जालना : छत्रपती संभाजीनगर येथील बिल्डर सुनील तुपे यांच्या मुलगा चैतन्य तुपे मंगळवारी( ता.४) रात्री दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती. या अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून बुधवारी (ता.५) दुपारी सुटका केली आहे. दरम्यान हे अपहरण प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन 4 एफ वन 1 भागातून बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षाचा मुलगा चैतन्य तुपे याचे मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सायकल खेळत असताना कारमध्ये कमबून अपहरण केले होते. त्यानंतर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मात्र, अपहरण कर्ते छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोड, भोकरदन मार्गे माहोराकडे गेले. महोऱ्याकडे जात असताना अपहरणकर्त्याच्या चारचाकी वाहनाचा मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अपघात झाला.
या अपघातात प्रमोद शेवैत्रे (रा. ब्रह्मपुरी, ता. जाफराबाद, जि. जालना) हा जखमी झाला. त्याला भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना या अपघातातून छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे यांच्या केसची लिंक लागली.
त्यानंतर जालना पोलिसांनी संशयित आरोपी प्रमोद शेवैत्रे त्याच्याकडून अधिक चौकशी करत उर्वरित तीन आरोपींचे लोकेशन मिळवले. मिळालेल्या लोकेशननुसार जालना पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या पथकांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे छापा टाकला.
पोलिसांच्या या कारवाईत अपहरण झालेला चैतन्य तुपे याची सुखरूप सुटका केली. शिवाय बंटी गायकवाड याच्यासह हर्षल असे अन्य दोन संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली. हे तिन्ही संशयित आरोपी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी तेथील रहिवाशी आहेत. या तीन आरोपी पैकी दोन आरोपींना जालना पोलिसांनी पकडले असून एक आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर स्थानिक गुन्हे शाखेने अपहरण झालेल्या चैतन्य तुपे याला घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथून अपहरण झालेला चैतन्य तुपे हा सात वर्षाचा मुलगा मिळून आला असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना पोलिसांसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पार पाडली.
अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक जालना