'हा राहुल सोलापूरकर कोण? शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना गोळ्या झाडल्या पाहिजेत, अशा तीव्र शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून राज्यभरात त्याचा निषेध करण्यात आला. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकर यांना कडक शब्दात सुनावलंय.
खासदार उदयनराजे भोसले हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका टीव्ही शोमध्ये औरंगजेबच्या कैदेतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली होती, असं विधान केलं होतं. त्याप्रकरणी राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आली होती. सोलापूरकर यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराजांबद्दल बोलणाऱ्यांची जीभ हासडून काढली पाहिजे,असंही उदयनराजे म्हणालेत.