जेवळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) - अल्पशा आजाराने मृत्यू पावलेल्या आष्टा कासार (ता. लोहारा) येथील महिलेचे पुणे येथे अवयवदान झाले असून याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आष्टा कासार येथील समस्त नागरिकांनी बुधवारी (ता. ५) मोठ्या संख्येने एकत्र येत पुष्पवृष्टी करीत त्या महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, सुवर्णा युवराज सगर (वय-३८) हे लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील रहिवास आहेत. त्यांच माकणी येथील युवराज सगर या व्यक्तीबरोबर लग्न झालं होतं. लग्नानंतर पाचच वर्षांनी पती मयत झाल्यानंतर त्या आष्टा कासार येथे आईकडे राहत होत्या.
जन्मल्या पासूनच अत्यंत कष्टाने आपले आयुष्य जगणाऱ्या सुवर्णा सगर यांच पतीच्या निधना बरोबरच कमी वयातच वडिलांचा आधार व भावाचाही आधार गमावला होता. यामुळे आईसोबत राहून आपले आयुष्य जगत असताना आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता यावे, यासाठी खटाटोप करून इतरांच्या घरी स्वयंपाक करून मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत होत्या.
काही अंशी यश ही मिळाले. पंढरपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलगी आणि मुलगा मुरूम येथील कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहेत. परंतु शिक्षणासाठी आर्थिक ताण येत असल्याने त्या दोन महिन्यापासून पुणे येथे स्वतः एके ठिकाणी नोकरी करून मुलांचा खर्च भागावा याच हेतूने अहोरात्र काम करणे सुरू होते.
आत्ता कुठे आयुष्यात थोडे आनंदाचा क्षण येत होते. त्यातच नियतीने पुन्हा एकदा दुख पदरी टाकले, कामाच्या व्यापाने त्यांना आठ दिवसाखाली चक्कर आली आणि त्यातच त्या कोम्यात गेल्या. गेली आठ दिवस त्यांची मुले आमच्या आईला वाचवा, ही आर्त हाक डॉक्टरांना देत होती. परंतु डॉक्टरांनीही हात टेकवले. त्यांनी सांगितले ही यात कांहीच बदल होऊ शकत नाही. त्यावेळी मात्र सर्वांनी आशा सोडली.
अशा वेळी काय करावे याचे ज्ञान नसलेल्या मुलांना त्यांच्या डॉक्टरांनी, सोबत असलेल्या त्यांच्या वर्ग मित्रांनी व गावातील काही नागरिकांनी त्यांचा मुलगा, मुलगी व आईचे मन वळवून अवयव दान करा ही विनंती केली. त्यावेळी परिवारातील सर्व व्यक्तींनी निर्णय घेतला आमची आई आयुष्यभर आमच्यासाठी झटली, आता तिचे अवयव इतरांना कामी यावेत या उदात्त हेतूने हा निर्णय घेतला.
त्यानुसार मंगळवारी (ता. ४) रात्री (डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल) डॉक्टरांनी त्यांचे शरीरातील हृदय, किडनी, लीवर, पेंक्रिया, फुफुस असे एकूण पाच अवयव दान केली गेली. आपल्या गावच्या मुलीचे मृत्यूनंतर अवयवादान केल्याची बातमी समजतात आष्टा कासार येथील नागरिक हे भारावून गेले. या भागात पहिल्यांदाच असे एक समाज उपयोगी ते स्तुत्य उपक्रम घडल्याने येथील नागरी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.
सुवर्णा सगर यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आज दुपारी चारच्या सुमारास आष्टा कासार येथे आणण्यात आले. त्यावेळी येथील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. येथील आष्टा हायस्कूल आष्टा कासार, साहारा आश्रम शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाला, कन्या प्रशालेचे विद्यार्थ्याने व नागरिक दुतर्फा साखळी करून पुष्पवृष्टी केली. यावेळी येथील ग्रामपंचायत व विविध संस्थेने पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्काराचे विशेष प्रयोजन केले होते.
सुवर्णा सगर यांच्या अवयवादानाची बातमी समजतात आमदार प्रवीण स्वामी यांनी आष्टा कासार येथे रात्री नऊच्या सुमारास उपस्थित राहात नागरिक व नातेवाईकांची भेट घेत विचारपूस केली.