Pune Metro: पुणे मेट्रोच्या नव्या मार्गांबाबत मुरलीधर मोहोळ यांनी सुचविले पर्याय; 'हे' भाग होणार कव्हर
esakal February 06, 2025 06:45 AM

Pune Latest News: पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत आहे. जास्तीत जास्त पुणेकरांना मेट्रोने प्रवास करता यावा, यासाठी काही पर्याय समोर येत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत नवीन मार्ग सुचवले आहेत.

पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे सूचित केले आहेत, असं मोहोळ यांनी सांगितलं. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हर्डिकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांना यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुरलीधर मोहोळ यांनी सुचवलेले मेट्रोचे मार्ग

१) खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.

२) खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub म्हणून विकसित करावे. खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि राहीवाशीदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून Interchangeable and Multimodal Transport Hub साठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणारांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी हब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.

३) कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा ! पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज ते हिंजवाडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.

४) भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.