राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Inshorts Marathi February 06, 2025 06:45 AM

मुंबई, दि ०५: विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या भेटीवेळी श्री. सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. भविष्यात त्यात वाढ करण्यासाठी काम करत आहोत. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकास कामे सुरू आहेत. त्यांना गती दिली जात आहे. नवीन गुंतवणूक येत आहे.’

श्री. सुब्रह्मण्यम म्हणाले की, मुंबई मध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. २ ट्रिलियन क्षमतेचे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता दोन्ही आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचे वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा”अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्‍मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,

गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.