टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील सलामीचा सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंडने सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. मात्र टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांपैकी विकेटकीपर म्हणून कुणाला संधी मिळणार? याबाबत डोकेदुखी आहे. या दोघांपैकी कोणत्या एकाला निवडायचं ही डोकेदुखी असेल, असं कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
केएल राहुल याने 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत विकटकीपर आणि बॅट्समन दोन्ही भूमिका चोखपणे पार पा़डल्या. “केएल राहुल गेल्या काही वर्षांपासून विकेटकीपिंग करतोय. केएलने चांगली कामगिरी केली आहे. केएलने गेल्या 10-15 तेच केलंय जे त्याकडून अपेक्षित होतं. ऋषभ पंतही उपस्थित आहे. आम्हाला त्या दोघांपैकी कुणा एकाला खेळवू शकतो. दोघांमध्येही सामना जिंकून देण्याची क्षमता आहे”, असं रोहितने म्हटलं.
“केएल आणि ऋषभ, या दोघांपैकी कुणाला खेळवायचं ही चांगली डोकेदुखी आहे. मात्र मागील कामगिरी पाहता सातत्य राखणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”, असंही रोहितने नमूद केलं.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने फिरकीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत एकूण 14 विकेटस घेतल्या. वरुणला या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. वरुणला याच कामगिरीच्या जोरावर एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली. रोहितने वरुणला संधी देण्याबाबतही प्रतिक्रिया दिली.
“वरुणने निश्चितच काही तरी वेगळं करुन दाखवलं आहे. त्याने जरी हे टी 20i क्रिकेटमध्ये केलं असेल पण त्याच्यात काही तरी वेगळं असं आहे. आम्हाला एक पर्याय हवा होता. तसेच पाहायचं होतं की आम्ह त्याच्यासोबत काय करु शकतो”, असंही रोहितने सांगितलं.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.