Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरामध्ये अवजड वाहनांना २४ तास बंदी, कसा कराल प्रवास?
Saam TV February 06, 2025 04:45 PM
सचिन जाधव, पुणे

पुणे शहरात अवजड वाहनांना शहरात २४ तास बंदी घालण्यात आली आहे. गंभीर अपघात रोखणे तसंच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात अवजड वाहनांना २४ तास बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. दहापेक्षा जास्त चाकी वाहने, कंटेनर, ट्रेलर, बल्कर अशा वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे.

सहा ते दहा चाकी वाहने आणि मालवाहू अवजड वाहनांना निश्चित केलेल्या मार्गांचा वापर मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत करण्यास मुभा देण्यात आली आहे. शहर परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

वाहतूक शाखा, महापालिका आणि संबंधित विभागाकडून एकत्रित प्रयत्न करून निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वाहतूक शाखेने शहरात येणाऱ्या जड वाहनांवर प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.

पण यामधून मुंबई-बंगळूरू महामार्ग वगळण्यात आला आहे. तसेच, वाहतूक पोलिसांनी शहरात काही 'रेड झोन' तयार केले असून, या मार्गांवर वाहतूक शाखेच्या पूर्वपरवानगीनेच प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी संबंधितांना वाहतूक शाखेकडे अर्ज करावा लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.