चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचे चार खेळाडू बाद झाले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेतील वजन हलकं झाल्याचं दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे स्पर्धेल मुकला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेत नेतृत्व कोण करणार याची डोकेदुखी वाढली आहे. ऐन स्पर्धेपूर्वी आता कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॅट कमिन्ससह दुखापतीमुळे जोश हेझलवूड आणि मिचेल मार्श हे दोघंही स्पर्धेला मुकले आहेत. तर मार्कस स्टोईनिसने या स्पर्धेपूर्वीच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघातून चार खेळाडू आधीच बाद झाले आहे. या खेळाडूंऐवजी ऑस्ट्रेलियाला चार खेळाडूंची निवड करावी लागेल. इतकंच काय तर कर्णधारपद कोण भूषवणार हे देखील जाहीर करावं लागेल. दहा दिवसांचा अवधी असल्याने ऑस्ट्रेलियाला जो काही निर्णय असेल तर तो येत्या दोन ते तीन दिवसातच घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे, दुखापतग्रस्त असलेला कॅमरून ग्रीन अजूनही बरा झालेला नाही. त्यामुळे संघात परतण्याची आशाही मावळली आहे.
ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला होता. पॅट कमिन्स (कर्णधार), अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस आणि एडम झॅम्पा असा ऑस्ट्रेलियाचा संघ होता. आता या संघात बदल होणार आहे. या संघातून पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोईनिसने या संघात आता नसतील.
ऑस्ट्रेलियाचा संघ ब गटात असून या गटात अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडशी होणार आहे. दुसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी 25 फेब्रुवारीला, तिसरा सामना 28 फेब्रुवारीला अफगाणिस्तानशी होणार आहे. तीन पैकी दोन सामने जिंकल्यानंतर उपांत्य फेरीत वर्णी लागणार आहे. त्यामुळे साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाचा कस लागणार आहे.