विटा : नियमाहून अधिक व्याजाची आकारणी करणाऱ्या संदीप श्रीकांत दाते (वय ३९, हजारे मळा, विटा) या खासगी सावकाराविरुद्ध एका महिलेने आज विटा पोलिसांत फिर्याद दिली. त्याच्यावर महाराष्ट्र सावकार अधिनियम २०१४ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार २४ नोव्हेंबर २०२२ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्री समर्थ फायनान्स, विटा येथे घडला.
संदीप दाते यांच्याकडे सावकारीचा परवाना आहे. मात्र शासनाने दिलेल्या नियमांच्या अधिन न राहता परवान्याचा दुरुपयोग करून संबंधित महिलेला दहा हजार रुपये मुद्दल व्याजाने दिली. तेव्हा व्याजाचे तीन हजार रुपये आधीच काढून घेतले. त्यानंतर चार महिन्यांत दहा हजार रुपये परत घेतले. त्यावर तीस टक्के व्याज आकारणी केली.
संबंधित महिलेने दाते याच्याकडून वीस हजार रुपये घेतले नाहीत; मात्र संबंधित महिलेकडून दाते याने घेतलेले दोन सह्या केलेले कोरे धनादेश महिलेने वारंवार मागणी करूनही परत दिले नाहीत. धनादेश परत न देता परस्पर बाऊन्स करून न्यायालयात महिलेविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे तपास करत आहेत.