भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. खरं तर ही मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे या मालिकेत खेळाडूंना पारखण्याची संधी दोन्ही संघांना मिळणार आहे. विराट कोहली दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी संघात यशस्वी जयस्वालला संधी मिळाली. पण त्याला फार काही चांगली खेळी करता आली नाही. दुसरीकडे, रोहित शर्मा आऊट ऑफ फॉर्म असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाला. खरंच इंग्लंड विरुद्धचा सामना श्रेयस अय्यर, शुबमन गिल आणि अक्षर पटेलच्या खेळीमुळे जिंकला. मात्र या सामन्याचं श्रेय या तीन खेळाडूंना न देता रोहित शर्माने गोलंदाजांचं कौतुक केलं. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली होती. त्यामुळे आरामात 300 पार धावा होतील असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 47.4 षटकं खेळून 248 धावांवर बाद झाला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या धावा भारताने 6 गडी गमवून 38.4 षटकात पूर्ण केल्या. रोहित शर्मा 2, तर यशस्वी जयस्वाल 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आणि डाव सावरला. श्रेयस अय्यरने 36 चेंडूत 59 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर सामना हातून जातो की काय अशी स्थिती होती. पण चौथ्या विकेटसाठी गिल आणि अक्षरने 108 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ‘या विजयामुळे मी आनंदी आहे. आम्ही हा फॉर्मेट खूप दिवसानंतर खेळत आहोत. मी तुम्हाला सांगतो आम्ही सुरुवातीपासून ठरल्याप्रमाणे खेळलो. त्यांनी खरं तर या सामन्यांची सुरुवात चांगली केली होती. पण गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दिलं. त्यात आम्हाला एक डावखुरा फलंदाज मध्ये हवा होता. आम्हाला माहिती होतं की डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्याची आवश्यकता होती. गिल आणि अक्षर पटेलने मधल्या फळीत चांगली भागीदारी केली. एकंदरीत एक संघ म्हणून शक्य तितक्या योग्य गोष्टी करत आहे.’ इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा डाव घसरला आणि 248 धावांवर आटोपला.
दुसरीकडे, वनडे मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर नाराज दिसला. सामन्यानंतर त्याने सांगितलं की, ‘सामना न जिंकल्याने थोडी निराशा आहे. आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली. पण त्या नंतर विकेट गमवल्या. सामना पाहता आम्हाला 40 ते 50 धावा कमी पडल्या असं म्हणावं लागेल. खरं तर या सामन्यात भागीदारी रचण्याचं श्रेय हे श्रेयस अय्यरला जातं. आता पुढच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.’