Jalna Crime : शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; जालना तालुक्यातील घटना , ग्रामस्थांकडून चोप
esakal February 06, 2025 08:45 PM

जालना/रामनगर  ः जालना तालुक्यातील शेवगा येथील जिल्हा परिषदेच्या चौथीच्या विद्यार्थिनीचा वर्गशिक्षकाने लैंगिक छळ केला. हा प्रकार बुधवारी (ता. पाच) उघडकीस आला. प्रल्हाद सोनुने असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याला ग्रामस्थांनी चोप देत मौजपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कायद्याअंतर्गत मौजपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिक्षक सोनुने याच्यावर २००९ मध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

शेवगा येथील जिल्हा परिषद चौथीच्या वर्गशिक्षकाकडून अश्लील वर्तन केले जात असल्याचे पीडित विद्यार्थिनीने आईला सांगितले. तीन-चार दिवसांपासून शिक्षक सोनुने हा लैंगिक छळ करत असल्याचे ती म्हणाली. यानंतर पालकांनी हा प्रकार सरपंचासह ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी बुधवारी सोनुने याला सकाळी शाळेत जाऊन चोप दिला. शिवाय या मारहाणीचे व्हिडिओदेखील तयार करण्यात आले. त्यानंतर या घटनेची माहिती मौजपुरी पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित शिक्षक प्रल्हाद सोनुने याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. त्याच्या बडतर्फीची मागणी केली जाणार आहे.

- कल्याण देशमुख, सरपंच, शेवगा

संशयित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ मध्येदेखील याने अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबतचा गुन्हा मौजपुरी पोलिस ठाणे येथे दाखल होऊन त्यावेळेस संबंधित शिक्षक निलंबित झाला होता.

- मिथुन घुगे, सहायक पोलिस निरीक्षक, मौजपुरी

शिक्षक प्रल्हाद सोनुने याची चौकशी लावली जाणार आहे. शिवाय या शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली जाईल.

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद, जालना

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.