योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा बचाव करून ते १०० टक्के निर्दोष असल्याचा दावा केला होता. धनंजय मुंडे १०० टक्के गुन्हेगार नसल्याचं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं. नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर भागचंद महाराजांनी भाष्य केलं होतं. भागचंद महाराजांनी भाष्य केल्यानंतर त्यांना अनेकांनी धमक्या दिल्या. धमक्या मिळाल्यानंतर भागचंद महाराजांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंद केली आहे.
भागचंद महाराज यांनी महंत यांच्या विरोधात बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले आहे. माझ्या जीवितच काही बरं वाईट झालं, तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, असं म्हणत भागचंद महाराज झांजे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. भागचंद महाराज झांजे यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
काय आहे नेमकं प्रकरण?महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भागचंद महाराज यांनीही प्रसारमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया दिल्यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांचे अनुयायांनी गेल्या पाच दिवसापासून फोनवरून धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू जिवे मारू, ठोकून काढू, असे फोन कॉल सुरू आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशा शब्दात भागचंद महाराजांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.
भागचंद महाराज म्हणाले, 'मी संविधानिक मार्गाने प्रतिक्रिया दिली. चूक झाली असेल तर गुन्हा दाखल करा. मात्र मला जीवे मारण्याची धमकी का देता, असा सवाल श्री हभप भागचंद महाराज झांजे यांनी केला आहे. तसेच शास्त्री महाराज माझ्यासारख्या वारकऱ्याला धमकी देणाऱ्या तुमच्या अनुयायांना आवरा, असं आवाहनही भागचंद महाराजांनी केलं आहे.