Jalgaon News : मुलाला व्हिडीओ कॉल करून मृत्यूला कवटाळलं; व्यापाऱ्यानं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Saam TV February 07, 2025 02:45 AM

जळगाव : व्यवसायासाठी उसनवारीने पैसे घेतले होते. मात्र व्यापार फारसा चांगला न चालल्यामुळे घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने चिंतेत असलेल्या व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इसमाने मुलाला व्हिडीओ कॉल करून रेल्वेखाली उडी घेतली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील खेडी कढोली येथील रहिवासी गणेश बंडू बडगुजर (वय ६१) असे मृत व्यापाराचे नाव आहे. गणेश बडगुजर हे धान्याचा व्यापार करायचे. त्यांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेले होते. तसेच गावातून काही जणांकडून उसनवारीने पैसे देखील घेतले होते. दरम्यान व्यवसायात फारसा फायदा झाला नसल्याने या कर्जामुळे ते मागील काही दिवसांपासून चिंतेत होते.

मुलाला व्हिडीओ कॉल केला 
दरम्यान व्यापारी गणेश बडगुजर यांनी सोमवारी रात्री मुलाला व्हिडीओ कॉल केला. यात त्यांनी आत्महत्या करीत असल्याचे सांगत रेल्वेसमोर उडी घेतली. दरम्यान गणेश बडगुजर यांनी व्हिडीओ कॉल करत आत्महत्या करत असल्याचे सांगताच कुटुंब धास्तावले. यानंतर ते काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. जळगाव ते शिरसोली दरम्यान घटना घडली.

पोलिसांना दिली घटनेची माहिती 

दरम्यान वडिलांनी फोन केल्यानंतर गणेश बडगुजर यांच्या मुलाने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर तालुका ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, गुलाब माळी घटनास्थळी आले. मात्र तोवर त्यांनी रेल्वेखाली उडी घेतली होती. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.