मुंबई : वांद्रे येथील फॅमिली कोर्टात धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटीत पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती, या केसचा निकाल आज आला. यामध्ये कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना महिन्याला २ लाख रुपये पोडगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
करुणा मुंडे यांनी कोर्टाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "आम्ही कोर्टात दरमहा १५ लाख रुपये पोटगीची मागणी केली होती. पण कोर्टानं ही मागणी मान्य न करता २ लाख दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं मी आता मुंबई हायकोर्टात अपिल करणार आहे."
कोर्टानं नेमकं काय निकाल दिला?कोर्टानं करुणा मुंडे यांचा अर्ज अशतः मान्य केला आहे. त्यानुसार करुणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये आणि त्यांची मुलगी शिवानी यांना लग्नपर्यंत दरमहा ७५ हजार रुपये देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. हे पैसे खटला सुरु झाल्यापासून आत्तापर्तंतच्या हिशोबानं देण्यात यावेत. आपल्या आदेशात कोर्टानं करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचंही मान्य केलं आहे. या प्रकरणाची शेवटचा निकाल येईपर्यंत धनजंय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करु नये.