Badnapur News : धक्कादायक! १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं हॉस्टेलमध्येच संपवलं आयुष्य
Saam TV February 07, 2025 02:45 AM

अक्षय शिंदे, साम टीव्ही 

जालना : बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीने जीवन संपविले आहे. दरम्यान या विद्यार्थिनीने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. 

जालन्याच्या शहरालगत असलेल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील वस्तीगृहात इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या तरुणीने रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ज्योती सुरासे असे या विद्यार्थिनीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ज्योती सुरासे ही बदनापूरमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत ती वसतिगृहात वास्तव्यास होती. 

आठवडाभरात दुसरी घटना 

दरम्यान बदनापूर शहरातच एका उच्चशिक्षित तरुणीने दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु असताना उच्चशिक्षण घेऊन शासकीय नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. मागील ५ ते ६ दिवसांपूर्वी बदनापूर येथील एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हि ताजी असतानाच आज पुन्हा एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे बदनापूर तालुक्यात खळबळ उडाली. 

पोलिसांकडून तपास सुरु 

आठवडाभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेने बदनापूर शहरात खळबळ उडाली आहे. ज्योती हि ही बदनापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दरम्यान तिने टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी अधिकचा तपास बदनापूर पोलीस करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.