पांडुरंग म्हस्के
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी मंत्र्यांनी आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षक ‘गिफ्ट हॅम्पर’ मंत्र्यांसह आमदारांना भेट देण्यासाठी आणले होते, मुख्यमंत्री महोदयांनाही या सप्रेम भेटीचा मोह आवरला नाही. त्यांनी आदिवासींनी बनविलेली वस्तू भेट दिल्याबद्दल कौतुक करत भेटीचा स्वीकार केला.
इतरांनाही भेट देण्याची अनुमती दिली. मात्र, हे ‘गिफ्ट’ म्हणजे मोहाची बाटली असल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘मोह’ आवरत तीव्र नाराजी व्यक्त केली. जेव्हा ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली, त्यावेळी तातडीने त्यांनी संबंधितांची कानउघडणी तर केलीच पण त्या गिफ्ट हॅम्परमधील मदिरा तत्काळ परत नेण्याचे आदेश दिल्याचे समजते.
मंगळवारी (ता.४) मंत्रिमंडळ बैठकीत हा अनपेक्षित प्रकार झाला. आदिवासी मंत्र्याने सर्व मंत्र्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या भागातील आदिवासींनी तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षक ‘गिफ्ट हॅम्पर’ तयार केले आणि मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना देण्यासाठी आणले. बैठक संपल्यावर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली की, आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू भेट द्यायच्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत तात्काळ त्याला अनुमती दिली.
फडणवीस यांनी विचारणा केल्यावर संबंधित मंत्र्याने भेटवस्तूमध्ये मोहाची बाटली असल्याचे सांगितले. हे ऐकताच मुख्यमंत्री ताडकन उडाले. ‘अहो हे काय करताय’, असे म्हणत त्यांनी तात्काळ ती बाटली काढून घ्या आणि या खोलीतून बाहेर न्या, असे सुनावले.
मुख्यमंत्र्यांचे प्रसंगावधानबैठकीच्या खोलीबाहेरील पत्रकारांना जर हे आढळले तर केवढा गदारोळ होईल, असे फडणवीस यांनी सांगितल्यावर त्यांच्या सूचनेवरून या बाटल्या मागील दाराने गुपचूप बाहेर नेण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानाने पुढील नामुष्की टळली.