सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
Marathi February 06, 2025 11:25 PM

रवीकांत तुपकर: आज सोयाबीनच्या (Soybean) सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आजच्या या शेवटच्या दिवशीही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होणं बाकी आहे. याच मुद्यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आक्रमक झाले आहेत. सोयाबीन खरेदीला एक महिना मुदत वाढ द्या, अन्यथा राहिलेले सोयाबीन मुंबईतील अरबी समुद्रात फेकून देऊ असा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे.

सरकारने फक्त 7 ते 8 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केलं

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. राज्याचे सोयाबीनचे उत्पादन हे 60 ते 65 लाख मेट्रीक टन आहे. त्यातील सरकार 13 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातील सरकारने फक्त 7 ते 8 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केलं आहे. राहिलेलं सोयाबीन आम्ही कुठं फेकायचं? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे? असा सवालही त्यांनी केला. ज्या संस्थाची अवकात नाही, त्या संस्थाना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याचे तुपकर म्हणाले.  सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. यांनी खाली लोकं नेमले आहेत. आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी घोळ घातला आहे. ज्या संस्थाची औकात नाही, त्यांना सोयाबीन खरेदीचे टेंडर दिले जात असल्याचे तुपकर म्हणाले.

अकोला जिल्ह्यातील 1 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी

आज सोयाबीनच्या सरकारी खरेदीचा शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशीही अकोला जिल्ह्यातील1 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी आहे. जिल्ह्याला साडेनऊ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यापैकी साडेआठ लाख क्विंटल सोयाबीन आतापर्यंत खरेदी करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमी केंद्राच्या माध्यमातून खरेदीसाठी अंतिम मुदत 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. आज अकोल्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. सध्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर 3800 ते 4000 रुपयापर्यंत घसरलेत. हमी केंद्रावर सोयाबीनला 4851 रुपये क्विंटलचा दर आहे. त्यामुळं या केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, अजूनही शेतकऱ्यांचे  सोयाबीनची खरेदी बाकी आहे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत सोयाबीनची खरेदी करा अन्यथा प्रतिक्विंटल सोयाबीनसा 3000 रुपये द्या अशी मागणी देखील तुपकरांनी केली.

सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचणी

विक्रीसाठी नोंदणी न होणे
सोयाबीनची प्रतवारीचे कारण सांगून परत पाठवणे
पीक पेऱ्यावर सोयाबीनची नोंद नसणे परत पाठविणे
नोंदणी केंद्र कुठे आहेत याची सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नाही
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नोंदणी कशी करायची याचे ज्ञान नसणे

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.