जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखानं घटली, येत्या काळात लाभार्थी कमी होणार?
Marathi February 07, 2025 12:24 PM

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या लाभाची रक्कम 24 जानेवारी आणि 25 जानेवारी या दोन टप्प्यात वितरित करण्यात आली. त्यावेळी आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 41  लाख इतकी होती.  म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर महिन्यात लाडक्या बहि‍णींची संख्या 2 कोटी 46 लाख इतकी होती. तर, जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्यात लाभाच्या वितरणावेळी आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार तेव्हा 2 कोटी  46 लाख लाभार्थी महिलांना 1500 रुपयांची रक्कम दिली गेली असल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती.

लाभार्थी कोणत्या कारणानं कमी झाले?

लाडकी बहीण योजनेतील कमी झालेल्या 5 लाख लाभार्थ्यांपैकी दीड लाख लाभार्थी महिलांचं वय  65 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार 21 ते  65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून लागू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे.

महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान त्यांचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींनी दिल्या जाणाऱ्या लाभाची रक्कम 1500 वरुन 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. लाडक्या बहिणींना त्या घोषणेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांच्या नावावार किंवा कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना यातून वगळलं जाणार आहे. ज्या लाभार्थी कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच लाभ दिला जातो. याशिवाय ज्या महिला नोकरी करतात आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्या संदर्भातील माहिती आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे.

लाडक्या बहिणींना  2100 रुपये कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आता येत्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

https://www.youtube.com/watch?v=ayb09olmifw

इतर बातम्या :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, शासन निर्णय जारी, 5 कोटींचा खर्च करणार

Ladki Bahin Yojana : शिवभोजन, आनंदाचा शिधा योजनेला ब्रेकच्या चर्चा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय, GR प्रसिद्ध

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.