IND vs ENG 1st ODI: जडेजा-राणा नागपूर वनडेत चमकले; इंग्लंड बटलर-बेथलच्या अर्धशतकांनंतरही २५० धावांच्या आत ऑलआऊट
esakal February 07, 2025 03:45 PM

गुरुवारी (६ फेब्रुवारी) नागपूरमध्ये भारत आणि इंग्लंड संघात वनडे मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीला आक्रमक सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला २५० धावांच्या आत रोखण्यात भारताला यश मिळाले आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी आक्रमक सुरुवात केली होती. दोघांनीही ८ षटकांमध्येच संघाला ७० धावांचा टप्पा गाठून दिलेला. ६ व्या षटकाच सॉल्टने पदार्पणवीर हर्षित राणाविरुद्ध २६ धावाही ठोकल्या होत्या. तो पदार्पणात एका षटकात २६ धावा खर्च करणारा पहिलाच भारतीय ठरला. परंतु, ९ व्या षटकात सॉल्टला श्रेयस अय्यरने उत्तम क्षेत्ररक्षण करत धावबाद केले. सॉल्ट २६ चेंडूत ४३ धावा करून बाद झाला. पाठोपाठ १० व्या षटकात हर्षित राणाने इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. त्याने बेन डकेटला ३२ धावांवर आणि हॅरी ब्रुकला शून्यावर माघारी धाडले. बेन डकेटला अफलातून झेल यशस्वी जैस्वालने घेतला.

त्यानंतर कर्णधार जॉस बटलर आणि जो रुट या अनुभवी खेळाडूंनी डाव सावरत पुढे नेला. त्यांची जोडी जमली आहे, असे वाटत होते. पण १९ व्या षटकात रवींद्र जडेजाने ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने जो रुटला १९ धावांवर पायचीत पकडल्याने त्याला माघारी परतावे लागले. पण यानंतर बटलरला जेकॉब बेथलची चांगली साथ मिळाली. या दोघांनी ५९ धावांची भागीदारीही केली. त्यामुळे इंग्लंडला स्थिरता मिळाली होती. पण ३३ व्या षटकात अक्षर पटेलने बटलरचा मोठा अडथळा दूर केला. बटलर ६७ चेंडूत ५२ घावा करून हार्दिक पांड्याकडे झेल देत बाद झाला. पाठोपाठ ३६ व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोनलाही हर्षित राणाने ५ धावांवर बाद केले. त्यानंतर ब्रायडन कार्सने बेथेलची साथ देण्याचा प्रयत्न केला, पण कार्सला ४३ व्या षटकात मोहम्मद शमीने १० धावांवर त्रिफळीचीत केले. तरी एक बाजू बेथलने सांभाळून ठेवताना अर्धशतक साकारले होते. मात्र, अर्धशतक केल्यानंतर लगेचच ४३ व्या षटकात बेथल ६४ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. डीआरएसमध्ये तो बाद असल्याचे दिसला. त्याला रवींद्र जडेजाने पायचीत केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.