बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमीच आपल्या अभिनयामुळे आणि समाजकार्यामुळे चर्चेत असतो. पण आता सोनू सूदसंदर्भात एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोनू सूद अडचणीत आला आहे. त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गुरूवारी लुधियानाच्या एका न्यायालयाने सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी केले. हे प्रकरण फसवणुकीसंदर्भातील आहे. सोनू सूदने फसवणुकीच्या प्रकरणात साक्ष देण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हा खटला लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी दाखल केला होता.
लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमनप्रीत कौर यांनी हे अटक वॉरंट जारी केले. लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी १० लाख रुपयांच्या फसवणुकीचा खटला दाखल केला होता. त्यांनी आरोप केला की, मुख्य आरोपी मोहित शुक्लाने त्यांना रिजिका कॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. सोनू सूद या प्रकरणात साक्ष देणार होता. या प्रकरणात साक्ष देण्यासाठी न्यायालयाने सोनू सूदला अनेक वेळा समन्स बजावले होते. पण समन्स बजावल्यानंतरही अभिनेता सोनू सूद न्यायालयात हजर झाला नाही.
सोनू सूदने समन्स देऊनही कोणताही प्रतिसाद दिला नाही ज्यामुळे न्यायाधीश रमनप्रीत कौर यांना त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करावे लागले. लुधियानाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हे अटक वॉरंट मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा पोलिस ठाण्यात पाठवले आहे. वॉरंटमध्ये सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे की, 'सोनू सूदला समन्स किंवा वॉरंट पाठवण्यात आले होते, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि जाणूनबुजून न्यायालयात हजर राहिला नाही. म्हणून, तुम्हाला सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.'
न्यायालयाने पोलिसांना १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत वॉरंट त्याच्या अंमलबजावणीची पुष्टी देऊन परत करण्याचे किंवा ते का लागू केले गेले नाही याची स्पष्ट कारणे देण्याचे निर्देश देखील दिले आहे. सोनू सूदने याबाबत अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हे प्रकरण सोनू सूदचे टेन्शन वाढवू शकते. कारण न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि त्याच्या अडचणी वाढू शकतात.