राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीत केलेले अभिभाषण प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि प्रभावी आहे. या भाषणातून देशाच्या प्रगतीची दिशा स्पष्ट झाली आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते राज्यसभेत अभिभाषणावरील आभार प्रस्तावासंबंधीच्या चर्चेला उत्तर देत होते. विरोधकांना नकारात्मकतेमुळे देशाची मोठी हानी झाली आहे. मात्र, आजही ते या मनोवृत्तीतून बाहेर पडण्यास उत्सुक नाहीत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, वस्तू उत्पादन, केंद्र सरकारने गरिबांसाठी चालविलेल्या विविध योजना, कौशल्य विकास, मेक इन इंडिया आदी मुद्द्यांचे विवेचन त्यांनी केले. गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारी कामांचा वेग त्यापूर्वीच्या कोणत्याही सरकारच्या कामापेक्षा अधिक होता, हे त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. भविष्यकाळातही सरकार याच दिशेने कार्यरत राहील असे प्रतिपादन केले.
‘हिंदू’ शब्दाची अवमानना केली
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या अनेक दशकांमध्ये काँग्रेसने चुकीच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अत्यंत मंद राहिला. अशा मंद अर्थव्यवस्थेचे वर्णन त्याच सरकारकडून ‘हिंदू ग्रोथ रेट’ अशा अवमानकारक शब्दांमध्ये करण्यात येत होते. स्वत:च्या आतबट्ट्याच्या आर्थिक धोरणामुळे आलेले अपशय झाकण्यासाठी हिंदू या शब्दाची अवमानना करण्यात आली. त्या दिशाहीन धोरणामुळे देशाची अपरिमित हानी झाली आणि देश अन्य अनेक देशांच्या मागे पडला, असा आरोप त्यांनी भाषणात केला.
पाय ओढण्याची नीती
दुसऱ्याने ओढलेली रेष छोटी करुन दाखविणे आणि इतरांचे पाय ओढणे ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे. आज लोकशाहीचा पुळका आलेल्या काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात विरोधी पक्षांची अनेक राज्ये स्वत:च्या सत्तास्वार्थासाठी अस्थिर केली आहेत. याचे परिणाम हा पक्ष आज भोगत आहे. आज त्याचे मित्रपक्षही त्याच्यापासून दूर पळत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
आरक्षणावर दांभिक धोरण
जेव्हा आरक्षणाचा मुद्दा प्रथम उपस्थित झाला, तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी त्यावेळच्या सरकारने कोणतेही गंभीर प्रयत्न केले नाहीत. सत्य स्वीकारण्यात टाळाटाळ केली गेली. देशाचे विभाजन कसे होईल, विविध समाजांमध्ये फूट कशी पडेल, याचाच विचार देशहितापेक्षा अधिक केला जात होता. गेल्या 10 वर्षांमध्ये प्रथमच आम्ही ही फूट दूर करुन ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयाने काम करण्यास प्रारंभ केला आहे. या धोरणाचीही कुत्सितपणे चेष्टा विरोधकांकडून केली जात असली, तरी लोकांना हे धोरण मान्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकल्प केले वेळेवर पूर्ण
देशाच्या विकासाचा मार्ग पायाभूत सुविधांमधून जातो, याची आम्हाला जाण आहे. त्यामुळे आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठा भर दिला आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक प्रकल्प रखडविला जात होता. एकही महत्वाचा प्रकल्प पूर्व निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येत नसे. त्यामुळे त्यांचा खर्च अनेक पटींनी वाढत असे. परिणामी, त्यांचा अत्यल्प लाभ देशाला होत असे. आमच्या सरकारने नेहमीच कोणताही प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण करण्याचे धोरण लागू केले आहे. साहजिकच, आम्ही झपाट्याने प्रकल्प पूर्ण करुन त्यांचा जास्तीत जास्त लाभ देशाला मिळवून देत आहोत, ही बाब त्यांनी भाषणात प्रकर्षाने अधोरेखित केली. स्टार्टअप च्या क्षेत्रातही आपल्या युवकांनी भरारी घेतली आहे. त्यांच्यातील अनेक मध्यमर्गिय आहेत. त्यांनी अशा स्टार्टअपमधून यश मिळविले आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
खर्गे यांना ऐकविल्या काव्यपंक्ती
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे काँग्रेसमध्ये काही चालताना दिसत नाही. तेथे त्यांचे कोणी ऐकत नाही. पक्षाची स्थिती पाहून ते दु:खी आहेत. त्यामुळे ते राज्यसभेत आपले मन मोकळे करतात. अलिकडे बऱ्याचदा त्यांना कविता ऐकविण्याची लहर येते. आज मीही त्यांना काही काव्यपंक्ती ऐकविणार आहे. असे म्हणत त्यांनी ‘तमाशा करनेवालों को क्या खबर, हमने कितने तूफानोंको पार कर दिया जलाया है’ अशा ओळी ऐकविल्या.
प्रगतीची दिशा निश्चित आणि स्पष्ट