ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेनंतर टीम इंडियात बरंच काही घडल्याची क्रीडा वर्तुळात चर्चा आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीत वाद असल्याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या वादाला आणखी फोडणी मिळत असल्याचं दिसत आहे. या चर्चेचा केंद्रबिंदु आता विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आहे. नागपूर वनडे सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान न मिळाल्याने आता त्याच्या नावाची चर्चा होत आहे. नेमकं चर्चेचं कारण काय? आणि कशासाठी चर्चा होत आहे? याबाबत तुम्हाला प्रश्न पडला असेल. 6 फेब्रुवारीला इंग्लंड आणि भारत यांच्यात नागपूरमध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात विकेटकीपर फलंदाज म्हणून केएल राहुलला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. त्यामुळे ऋषभ पंतला बेंचवर बसावं लागलं. मागच्या काही वनडे सामन्यात केएल राहुलने टीम इंडियासाठी विकेटकीपिंग केली आहे. ऋषभ पंतच्या गैरहजेरीत वर्ल्डकप 2023 मध्ये केएल राहुलने ही भूमिका बजावली होती. तसेच चांगली कामगिरीही केली होती. त्यामुळे टीम इंडियाचा नंबर 1 विकेटकीपर कोण असा प्रश्न पडला आहे. केएल राहुल की ऋषभ पंत? पहिल्या वनडे सामन्यात केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाल्याने मॅनेजमेंटच्या नजरेत नंबर 1 म्हणून हाच खेळाडू आहे. मग प्रश्न असा पडतो की अजित आगरकर खोटं बोलला होता का?
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मागच्या महिन्यात 19 जानेवारी संघाची घोषणा करण्यात आली. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि अजित आगरकर पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार या दोघांवर केला. अजित आगरकरला विचारलं की, संघात टीम इंडियाचा पहिला विकेटकीपर कोण आहे? तेव्हा त्याने सांगितलं की, वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऋषभ पंत पहिली पसंत आहे. अजित आगरकराच्या या वक्तव्यामुळे ऋषभ पंत प्लेइंग 11 मध्ये असेल हे स्पष्ट झालं होतं. तर मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यात चुरस असणार होती. पण प्लेइंग इलेव्हननंतर सर्वच फासे उलटे पडले.
प्रशिक्षक आणि कर्णधार निवड समितीचा निर्णय मान्य करत नाहीत का? असा प्रश्न क्रीडावर्तुळात विचारला जात आहे. तसेच अजित आगरकरने याबाबत खोटं बोललं होतं का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्यामुळे नेमक काय खरं आणि खोटं या प्रश्नांमुळे सोशल मीडियावर उधाण आलं आहे. पण गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या वादानंतर एक बाब स्पष्ट आहे की, अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात निर्णयावरून एकमत नसल्याचं दिसत आहे. पंत त्याचं उदाहरण असल्याचं क्रीडाप्रेमी बोलत आहेत.