रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट; 'हे' तीन बॉलिवूड अभिनेते साकारणार मुघल
esakal February 08, 2025 12:45 AM

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. वडील मुख्यमंत्री असूनही त्याने कधीही त्यांच्या पदाचा वापर केला नाही. आपल्या भूमिका दमदार पद्धतीने साकारत त्याने आपली ताकद दाखवून दिली. नायक असो किंवा खलनायक त्याने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. आता रितेश लवकरच 'राजा शिवाजी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. त्याच्या या चित्रपटाबद्दल आता नवीन माहिती समोर येतेय.

हिट अभिनेते साकारणार मुघल

रितेशने २०२४ मध्ये आपल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील रितेशच करतोय. या चित्रपटात रितेश मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, हा द्विभाषिक चित्रपट असणार असून तो मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग आधीच सुरू झाली असल्याने चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. आता या चित्रपटात मुघलांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नावं समोर आलीयेत.

हे कलाकार साकारणार मुघल

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात अभिनेता संजय दत्त, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन हे तिघे मुघलांची पात्र साकारणार आहेत. मुघलही तितक्याच ताकदीचे दिसायला हवेत यासाठी या कलाकारांची निवड करण्यात आलीये. क्रू मेम्बर्सनी मुघलांच्या भूमिकेसाठी फरदीनसोबत संपर्क केला आहे आणि आता टीम त्याच्या उत्तराची वाट पाहतेय. तर गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशीच रितेशने या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर जाहीर केलेलं.

हे पोस्टर शेअर करत त्याने लिहिलेलं, 'छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर एक भावना आहे. त्यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी, मी तुमच्यासोबत या मातीच्या महान सुपुत्राला आदरांजली वाहतो. त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला प्रेरणा देत राहो.' आमचा नवीन प्रवास सुरू करताना आम्ही तुमचे आशीर्वाद मागतो. जय शिवराय!!" ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.