हौस ऑफ बांबू
पाऊस पडून गेला असावा. झाडं अजून ओलेती होती. पाखरांची किलबिल पुन्हा सुरु झाली होती. काटेसावरीवर साळुंक्यांनी थैमान मांडलं होतं. बेहड्याच्या गर्द पानोळ्यातून कोयाळ कुकारा करत उडाली. ( खरं तर हिते गोची झालीय. आधी म्हटलं पाऊस पडून गेला, मग आता कोयाळ ओरडण्यासाठी वसंत ऋतु कुठून आला?) रुईच्या झुडपामागून भारद्वाजाचं जोडपं जमिनीवर उतरुन पुन्हा किडे खाऊ लागलं. ( या पक्ष्याचं नाव बदला. चांगलं ऋषींचं नाव ठेवलंय, किडे कसले खातो लेकाचा?) रायमुनियाच्या झुडपात शिंपी पक्ष्याच्या मादीनं गोदा केला होता. (खुलासा : गोदा म्हणजे घरटं..! पण सगळेच पक्षी गोदा करत नाहीत,
काही खोपाही करतात. पक्षीजगतातही सदनिका, गाळा, रोहाऊस, बंगलो, बंगलोप्लॉट असे प्रकार असावेत!) वानराच्या टोळीत थोडी धावपळ झाली. एक वानरी फांदीवर उडी मारुन दुसऱ्या वानरीच्या सामोरी पाठ करुन बसली. तेवढ्या हुप्प्यानं ‘खर्रर्र…खक खक’ असा इशारा दिला. याचा अर्थ जवळच कुठंतरी वाघ उठलाय!
वाघाचा कडका लागला की सारं रान सावध होतं. (खुलासा : कडका म्हणजे चाहूल) एका सुतार पक्ष्यानं पिंपरणीच्या खोडाला भोक पाडण्याचं काम चोचीत घेतलं होतं. (खुलासा : माणसं काम हाती घेतात, सुतार पक्षी चोचीतच घेणार!) जवळच त्याची सुविद्य बेटरहाफ नुसती बघत बसली होती. नवरा इमानदारीत ड्रिलिंगचं काम करतोय, आणि या बाईला काही काम नाही. काय हे?
‘‘लौकर आटपा! वाघ उठलाय बहुतेक! ते मेलं वान्नर ओरडलं आत्ताच!,’’
सुतारीणबाईंनी पतीराजांना टोकलं.
‘‘कुठला वाघ नि काय! असले छप्पन वाघ आले नि गेले,’’ सुतारसाहेबांनी एक ढलपी लीलया उडवली.
…तेवढ्यात नेपतीच्या झुडपामागे एक मुस्कट दिसू लागलं. चट्टेरी पट्टेरी वाघ आणि वाघिणीचं जोडपं पायवाटेवर अवतरलं. सुतार पक्ष्यानं आपलं ड्रिलिंग थांबवलं. सुतारीणबाई गप्प झाल्या. वडाच्या झाडावरची वटवाघळं गुमान उलटी होऊन लटकत राहिली…
‘‘बरेच दिवसात काळवीट नाही खाल्ला हो! मी तर चवच विसरल्ये,’’
वाघीणबाई म्हणाल्या.
‘‘गेल्याच महिन्यात तर खाल्लास! बरेच दिवस काय?,’’ वाघसाहेबांनी कटकटून विचारलं. जणू काही ही बाई दर रविवारी काळवीट खाते! हल्ली कुठं परवडतो काळवीट? दिवस हे असे!! वाघसाहेबांच्या मनात चिंतेचं जाळं पसरलं. दोघंही रमतगमत पाणवठ्याकडे निघाले होते. पाणवठ्याशी आल्यावर वाघसाहेब अचानक थबकले. पाणथळीनजीकच्या देवभाताच्या कंजाळात एक हिरवी टोपी त्यांना दिसली. माणूस?
‘‘अहो, माणूसच दिसतोय, फॉरिष्टातला वाटतो! बघा तरी जवळ जाऊन! जमलं तर टाका जंप,’’ वाघीणबाईनी आपल्या मिष्टरांना भरीस घालण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ टक लावून निरीक्षण केल्यावर वाघसाहेबांनी नाद सोडला. फॉरिष्टातली ती व्यक्ती हातातली दुर्बिण सावरत उठली, आणि ब्राह्मणी बदकांचा पलिकडचा थवा बघण्यासाठी चालत निघाली. वाघाच्या जोडीकडे पाहून त्यांनी हसून ‘हाय’ म्हटलं. वाघसाहेबांनीही पंजा उचलून ‘काँग्रॅच्युलेश्नस’ असं सांगितलं.
फॉरिष्टाचा अधिकारी थँक्यू, असं म्हणून पुढे निघून गेला…
‘‘हे काय, तुमच्यासमोरुन सावज गेलं, आणि तुम्ही नुसता हात हलवताय?’’
वाघीणबाई संतापल्या होत्या.
वाघसाहेब शांतपणे म्हणाले, ‘‘ते आपले मारुती चितमपल्लीसाहेब होते, नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय. मराठी भाषेला आपल्या रानातले त्यांनी लाखभर शब्द दिलेत! लाखमोलाचा माणूस आहे. शिवाय…’’
‘‘म्हणून काय झालं? मी म्हणत्ये की-,’’ वाघीणबाई मुद्दा सोडायला तयार नव्हत्या.
‘‘…शिवाय नॉनव्हेज खाणारी माणसं हुडकूनच वाघ हल्ले करतात, असं त्यांनी नुकतंच सांगितलंय. काय करायचं?’’