आवश्यक कौशल्यं
esakal February 08, 2025 12:45 PM

शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आज आपण बघतोय, की अधिकाधिक तरुण मुली, तरुण स्त्रिया, नोकरी, करिअर, स्वतःचा व्यवसाय अशा अनेक आघाड्यांवर स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. आपल्या समाजाला आणि देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यात त्यांचे योगदान देत आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा, उत्साह आणि प्रतिभा (talent) अगदी भरभरून आहे. त्यांची स्वतःची अशी एक जीवनदृष्टी आहे आणि स्वप्नंही आहेत, जी त्यांना साकार करायची आहेत. यासाठी त्या खूप मेहनतही घेत आहेत.

आजच्या या तीव्र गतीने बदलत्या जगात, आणि आधुनिक जीवनशैलीमुळे, बऱ्याचवेळेला असंही होतं, की आपल्या इच्छा, आकांक्षा आणि ध्येय साध्य करताना कन्फ्युजन, डायलेमा, अँक्झायटी अशा अनेक मानसिक कोड्यांमध्ये आपण अडकतो आणि मग यामुळे वेगवेगळ्या स्ट्रेसमधूनही आपण जात असतो. नवीन नोकरीचा, नवीन कामाचा ताण, नवीन जीवनशैली, कामाच्या नवीन ठिकाणी ॲडजस्ट होण्याचा ताण. त्यातून जेव्हा आपण अनेक नवीन गोष्टी करत असतो, तेव्हा ते आपल्याला थोडं overwhelming होतं, आणि आपल्यावर दडपण येतं. याचा प्रतिकूल प्रभाव आपल्या कामावर, तब्येतीवर आणि नातेसंबंधांवर होतो.

या नवीन प्रवासात आपण अनेक नवीन गोष्टी शिकणार आहोत, करणार आहोत, आणि अनेक नवीन अनुभवही येणार आहेत, हे समजून घेऊन, आपण आधीच यासाठी थोडी मानसिकदृष्ट्या तयारी करणं आवश्यक आहे. आपली स्वप्नं यशस्वीपणे, आणि तणावमुक्त मनानं साकारण्यासाठी, आपल्याला काही जीवनकौशल्यं (life skills) शिकणं खूप आवश्यक आहे.

वेळेचं व्यवस्थापन : हे कौशल्य आपण जितक्या लवकर शिकू, तितकं आपल्यासाठी चांगलं. अगदी सुरुवातीपासून ही सवय करा, की तुमचं काम आणि जीवनातील इतर घटक, यांचा ताळमेळ कसा नीट बसेल यांवर लक्ष द्या. आपल्या सर्वांकडे एकसारखे २४ तास आहेत. त्या २४ तासांचं नियोजन तुमच्या प्राधान्याप्रमाणे करा. नवीन जॉब आणि करिअरची सुरुवात असते, तेव्हा आपण त्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे हे खरं; पण याची सवय होऊ देऊ नका. आवश्यक आहे, तुमच्यावर जबाबदारी आहे, तेव्हा स्वतःला झोकवून देणं अगदी बरोबर आहे; पण नकळत याची सवय होऊ शकते हे ध्यानात ठेवा. त्याचबरोबर कामापलीकडील बाकी वेळेचंदेखील नियोजन करा. त्यातूनच मग वेळेच्या नियोजनाची सवय होतं. कारण पुढे जसजसा कामाचा आणि वैयक्तिक जीवनाचा विस्तार होतो, तसतशा अनेक आघाड्या आपल्याला सांभाळाव्या लागतात, आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या या कौशल्याचा खूप फायदा होईल. त्याचबरोबर तुमचं काम कधी संपलं पाहिजे, याची स्पष्ट सीमा निश्चित करणंसुद्धा महत्त्वाचं आहे.

ऊर्जेचं व्यवस्थापन : सहसा आपण या पैलूकडे फारसं लक्ष देत नाही; पण प्रत्येकासाठी, energy manage करणं खूप महत्वाचं आहे. ऊर्जेचं व्यवस्थापन करणं म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीची एक नैसर्गिक क्षमता असते, एक नैसर्गिक ऊर्जा असते. तुम्ही थोडं स्वतःचं निरीक्षण केलं, तर तुम्हाला लक्षात येईल, की दिवसभरात असे अनेक वेगवेगळे प्रसंग आणि अशी कामं असतात, ज्यामध्ये आपली खूप ऊर्जा व्यर्थ जात असते.

काही गोष्टी आणि काही कामं अशीही असतात, जी केल्यानं आपल्याला उत्साही वाटतं, आणि आपली ऊर्जा जणू द्विगुणीत होते. मग मला कुठे, किती ऊर्जा खर्च करायची आहे, आणि कुठे करायची नाहीये, याचाही विचार करायची आणि ते अमलात आणायची सवय करून घ्या.

डिस्ट्रॅक्शनचं व्यवस्थापन : डिस्ट्रॅक्शन्सही मॅनेज करायला शिका. ''Distraction is the enemy of focus''. Focus, म्हणजेच एकाग्रता, ही आपल्या प्रत्येकाला कामामध्ये फार महत्त्वाची आहे. जितकी जास्त डिस्ट्रॅक्शन्स तितके अधिक तास तुम्हाला तुमच्या कामासाठी लागणार आणि याचा प्रतिकूल प्रभाव तुमच्या वेळेच्या व्यवस्थापनावर होणार. मग डिस्ट्रॅक्शन्सचं व्यवस्थापन करायला आपण जरूर शिकलं पाहिजे.

आपला फोन, त्यातील सोशल मीडिया, त्यातील आपली आवडती ॲप्स, हे सगळे काही कामाच्या वेळेला डिस्ट्रॅक्शन्सचा सोर्स होऊ शकतात हे लक्षात घ्या. तसंच, वैयक्तिक चिंता, मेंटल मल्टिटास्किंग, कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन्स, अशा अनेक गोष्टी आपल्याला लक्ष विचलित करत असतात. मग, एकाग्रतेसाठी, आपल्या जुन्या सवयींना नवीन जीवनशैलीप्रमाणं बदलणं आणि आपल्या काही जुन्या सवयींना सीमारेषा घालणंही आवश्यक आहे.

ही जीवनकौशल्यं आपल्याला एक संतुलित आणि सक्रिय दृष्टिकोन निर्माण करण्यात मदत करतात. या तिन्ही जीवनकौशल्यांबद्दल तुम्ही जागरूक राहिलात, आणि ‘मानसभान’ ठेवून त्या विकसित केल्या, तर तुमची ध्येयं आणि स्वप्नं, तुम्ही यशस्वीपणे आणि तणावमुक्त मनानं नक्कीच साध्य करू शकाल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.