रोहित आवाळे आणि पूजा आव्हाड
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अर्जुन, म्हणजेच अभिनेता रोहित आवाळे आणि त्याची पार्टनर पूजा आव्हाड यांची मैत्री हा केवळ एक योगायोग नाही, तर एक सुंदर प्रवास आहे. कॉलेजमध्ये सुरू झालेली त्यांची ओळख आज आयुष्यभराच्या सहवासात रूपांतरित झाली आहे. अभ्यासाच्या निमित्तानं वाढलेली ओळख हळूहळू मैत्रीत बदलली, आणि त्यानंतर प्रेम आणि समर्पणाच्या नात्यात.
या नात्याविषयी पूजा म्हणते, ‘‘मी आणि रोहित कॉलेजपासून सोबत आहोत. क्लासमध्ये त्याचा रोल नंबर १ होता आणि माझा २ नंबर. बऱ्याच वेळा आम्ही एकत्र असायचो, प्रॅक्टिकल्ससाठी पार्टनर होतो. या सगळ्यांतूनच आमची मैत्री घट्ट होत गेली. मला रोहित माणूस म्हणून आवडतो. त्याच्याविषयी मला अतिशय प्रेम आणि आदर आहे. त्याची एक गोष्ट मला खूप आवडते - तो कधीही आत्मविश्वास गमावत नाही.
ती पुढे म्हणाली, ‘‘आधी त्यानं फार्मसी केलं, मग स्वतःची जिम सुरू केली आणि आता अभिनयात करिअर करत आहे. त्यानं प्रत्येक टप्प्यावर खूप मेहनत घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत तो मागे हटत नाही. हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे.’’
कॉलेजमध्ये एक गमतीदार किस्सा पूजाने सांगितला, ‘‘कॉलेजमध्ये असताना दहीहंडी साजरी करण्याची माझी इच्छा होती; पण हॉस्टेलमध्ये राहून ती पूर्ण करणं अशक्य होतं. त्यानं हे ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं, की रोहितनं प्रिन्सिपल आणि एचओडी सर यांची परवानगी घेऊन पहिल्यांदाच कॉलेजमध्ये दहीहंडी आयोजित केली! आम्ही खूप एन्जॉय केलं; पण त्यानंतर कॉलेजची जी वाट लागली, त्यामुळे ती पहिली आणि शेवटची दहीहंडी ठरली!’’
रोहित म्हणतो, ‘‘ती पहिल्यांदा माझी क्लासमेट झाली, मग प्रोजेक्ट पार्टनर, त्यानंतर माझी पार्टनर... आणि आता ती माझी लाईफ पार्टनर आहे.
ती फक्त बाहेरून नाही, तर आतूनही खूप सुंदर आहे. स्वतःची व्यवस्थित काळजी घेते. मी बॉडीबिल्डिंग करतो, फिटनेससाठी कठोर शिस्त पाळतो; पण तिला त्यासाठी कुणाच्या मदतीची गरज पडली नाही. ती नैसर्गिक आहारावर भर देते, नियमित वर्कआउट करते. ती फिजिकली, मेंटली खूप स्ट्रॉंग आहे.’’
रोहितनं पुढे सांगितलं, ‘‘मी करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले; पण पूजाच ही एकमेव व्यक्ती माझ्यासोबत ठाम उभी राहिली. मी सुरुवातीला जॉब करत होतो; पण ती म्हणाली, ‘रोहित, मला तू नऊ ते पाचच्या शिफ्टमध्ये अडकू नकोस. तू वेगळं काहीतरी कर.’ त्या वेळी मी जिम सुरू केली, आणि ती माझ्या स्ट्रगलिंग फेजमध्ये कायम सोबत होती.
‘‘मला अभिनयात जायचं होतं, तेव्हा तिनं मला सपोर्ट केला. माझ्या स्ट्रगलच्या काळात तिनं घर सांभाळलं, आर्थिक जबाबदाऱ्या उचलल्या आणि मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. ती माझी बॅकबोन आहे. तिचं नेचर खूप साधं आहे. दुसऱ्यांसाठी काही करायचं असेल, तर ती नेहमी पुढे असते. पाहुणचार तिच्या रक्तात आहे.’’ मैत्रीची व्याख्या करताना ते म्हणाले, ‘‘मैत्रीचा पाया म्हणजे पारदर्शकता. आम्ही एकमेकांपासून कधीच काही लपवून ठेवत नाही. एखादी गोष्ट आवडली नाही, तर तोंडावर सांगतो.’’
(शब्दांकन : मयूरी गावडे)