डॉ.कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतो आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करतात. कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राजकारणातही प्रवेश केला होता. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी वेगळा मार्ग निवडला. आप मधून बाहेर पडल्यानंतर ते इशाऱ्यांमध्ये, मिश्किल टिपण्णी करत खोचक टोला लगावतात, कधी कधी चिमटेही काढतात. आज दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल असून प्रपोज डे सुद्धा आहे. याच दरम्यान कुमार विश्वास यांनी काव्यात्मक शैलीत पोस्ट शेअर केली आहे, ज्यावरून अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
कुमार विश्वास यांनी X या सोशल मीडिया साईटवरील अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया – या सह त्यांनी ब्रोकन हार्ट इमोजी टाकत एक व्हिडीओही शेअर केलाय. बहुत बिखरा, बहुत टूटा, थपेड़े सह नहीं पाया. हवाओं के इशारों पर मगर मैं बह नहीं पाया. अधूरा अनसुना ही रह गया यूं प्यार का किस्सा. कभी तुम सुन नहीं पाई, कभी मैं कह नहीं पाया – अशा ओळी त्यांनी म्हटल्या आहेत. या पोस्टवरून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
अनेक युजर्सनी असा अंदाज व्यक्त केला आहे की या पोस्टचा आम आदमी पक्षाशी संबंध आहे. तुमचा मित्र निवडणूक हरतो, असे एकाने लिहीलं. तर ‘आप-दा संपल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन’ अशी टिपण्णी आणखी एकाने केली. . अभिनंदन डॉक्टर साहेब, आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे, अशी कमेंट आणखी एका युजरने केली. मात्र अनेक युजर्सना तर ही प्रपोज डे ची शायरी वाटत असून अनेकांनी त्यांचं कौतुकही केलंय.
दिल्लीत भाजपचं कमळ फुललं
नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर ५ फेब्रुवारीला मतदान झाले आणि आज त्याची मतमोजणी होऊन निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचा दिल्लीतील सत्ता स्थापनेचा वनवास संपण्याची चिन्हं दिसत आहेत. दिल्लीत आपचा नाही तर भाजपाचा आपला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेतील 70 पैकी 70 जागांचे कल समोर आले आहे. पोस्टल मतमोजणीत आणि आता ईव्हीएममधील मतमोजणीचा कल सुद्धा भाजपाच्या बाजूने दिसत आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी ‘आप’ला तिसऱ्यांदा संधी देण्यास नकार दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे.