पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात लाहोरमध्ये तिरंगी वनडे मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं आहे. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने वादळी शतक करत मैदानात गाजवले आहे. त्यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी तब्बल ३३१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. विल यंग ४ धावांवर आणि रचिन रविंद्र २५ धावांवर बाद झाला होता. पण त्यानंतर केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांनी डाव सावरताना ९५ धावांची भागीदारी केली. त्यांनी संयमी खेळ करत डावाला स्थैर्य दिले होते.
यादरम्यान, अर्धशतकही केले. पण तो अर्धशतकानंतर ८९ चेंडूत ५८ धावा करून बाद झाला. त्यानंतर टॉम लेथमही शून्यावर माघारी परतला. पण नंतर ग्लेन फिलिप्स २८ व्या षटकात फलंदाजीला उतरला.
सुरुवातीला मिचेलला साथ देताना संयमी खेळ करत डाव पुढे नेला. त्यांनीही अर्धशतक भागीदारी करत संघाला ३८ व्या षटकापर्यंत २०० धावांपर्यंत पोहचवले होते. पण डॅरिल मिचेल ३८ व्या षटकात ८४ चेंडूत ८१ धावा करून अब्रार अहमदविरुद्ध खेळताना खुशदिलकडे झेल देत बाद झाला.
त्यानंतर फिलिप्सला साथ देण्यासाठी मायकल ब्रेसवेल आला. ४० षटकात न्यूझीलंडच्या ५ बाद २०७ धावा झाल्या होत्या. पण यानंतर ग्लेन फिलिप्सने टॉप गिअर टाकला. त्याने शेवटच्या १० षटकात चौकार - षटकारांची बरसात केली. त्याला सुरुवातीला ब्रेसवेलने साथ दिली. तो ३१ धावांवर बाद झाला.
अखेरची चारही षटके जपळपास एकट्या फिलिप्सने खेळून काढली. त्याने शेवटच्या षटकात त्याचे शतकही पूर्ण केले. त्याने ७२ चेंडूत शतकाला गवसणी घातली. दरम्यान, त्याच्या शतकामुळे न्यूझीलंडने ५० षटकात ६ बाद ३३० धावा केल्या.
कर्णधार मिचेल सँटेनर ८ धावांवर नाबाद राहिला. तसेच ग्लेन फिलिप्सने ७४ चेंडूत नाबाद १०६ धावा केल्या, ज्यात त्याने ६ चौकार आणि ७ षटकार मारले. हे त्याचे पहिलेच वनडे शतक ठरले.
त्याने शेवटी केलेल्या आक्रमणामुळे न्यूझीलंडच्या खात्यात शेवटच्या १० षटकात १२० हून अधिक धावा जमा झाल्या. विशेष म्हणजे शेवटच्या ६ षटकात तब्बल ९८ धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे सुरुवातीला या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचे दिसणारे वर्चस्व शेवटी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मोडून काढण्यात यश मिळवले.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अब्रार अहमदने २ विकेट्स घेतल्या, तर हॅरिस रौफ याने १ विकेट घेतली.