भाईंदर: भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट चौक ते काशी-मिरा या मुख्य रस्त्यावर सध्या होत असलेल्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्यावरील मिरा रोडच्या एस. के. स्टोन नाक्यावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल येत्या काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याआधी या मार्गावरील सिल्व्हर पार्क येथील उड्डाणपूल वाहनांसाठी खुला झाला आहे.
गोल्डन नेस्ट ते काशी-मिरा हा मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. परिणामी या मार्गावर सर्वाधिक वाहनांची वर्दळ आहे. या मार्गालगत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असल्याने दररोज वाहनांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे साहजिक जागोजागी वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून या मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर चेकनाका ते भाईंदर असे मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गाच्या खालीच हे तीन उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत.
मिरा रोडच्या एस. के. स्टोन नाका, कनाकीया नाका आणि शिवार गार्डन या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. आता बांधून तयार असलेल्या एस. के. स्टोन नाक्यावरील उड्डाणपुलामुळे या तिन्ही ठिकाणच्या कोंडीतून वाहनचालकांना मुक्ती मिळणार आहे. परिणामी काशी-मिरा ते शिवार गार्डन हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. या पुलाची अंतिम टप्प्यातील काही किरकोळ कामे शिल्लक आहेत.
पहिला डबल डेकर मार्गवरून मेट्रो व खालून वाहने असा मुंबई महानगर क्षेत्रातील हा पहिला डबल डेकर मार्ग आहे. तिन्ही उड्डाणपुलांसाठी २१७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी सिल्व्हर पार्क नाक्यावरील उड्डाणपूल गेल्या वर्षीच वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे हटकेश नाका व सिल्व्हर पार्क नाका येथील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मुक्ती मिळाली.
ऑगस्टपर्यंत काम पूर्णयेत्या १६ तारखेला त्याचे लोकार्पण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आता केवळ जुना पेट्रोलपंप ते गोल्डन नेस्ट चौक या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, तो आगामी ऑगस्टपर्यंत तयार होणार आहे. त्यानंतर गोल्डन नेस्ट चौक ते काशी-मिरा या मार्गावर विनाथांबा प्रवास करता येणार आहे.