- ऋचा थत्ते, rucha19feb@gmail.com
ससा-कासवाची शर्यत! मोबाईलकडे पाहत डोळे मोठे करून लहान मुलीसारखी मोठ्याने ओरडले. कारण खरेखुरे ससा आणि कासव यांचीच शर्यत मी पाहत होते आणि इथेही कासवच जिंकलं! मला असा व्हिडिओ पाहायला मिळेल, असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे ती कल्पनाच कमाल वाटली आणि अर्थातच मजाही आली. ‘आयुष्यात वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचं’ हा विचार याच गोष्टीनं आपल्या मनावर बिंबवला; मात्र मला या गोष्टीबद्दल काही प्रश्न आधीही पडले होते आणि मी ते बोलण्याच्या ओघामध्ये शक्य तेव्हा कार्यक्रमात मांडलेही होते. कुणी याला ‘उगाच’ असंही म्हणेल; पण गंमत म्हणून विचार करून पाहा.
एकतर शर्यत लावायची, तर ती ससा आणि कासवामध्ये का लावली? दोन ससे किंवा दोन कासवांमध्ये लावायला हवी! किंवा कासवाने असं आधीच म्हणायला हवं, की हीच शर्यत पोहण्याची लावा आणि मग बघा. कारण ससा पाण्यात उतरणारच नाही. हा मुद्दा गृहीत धरला, तर कासव आधीच जिंकेल! आणि पुढे जाऊन मला असंही वाटलं, की शर्यतच होती म्हणून ठीक; पण एरवीही आपण असंच काहीसं करतो. सतत वेगे वेगे धावू... नि डोंगरावर जाऊ... पण कुठेतरी जरा रेंगाळावं, आजूबाजूला पाहावं, या प्रवासाचा भरभरून अनुभव घ्यावा. विशिष्ट स्टेशनवर उतरण्यासाठीच प्रवास करतो आपण; पण स्टेशनवर उतरण्याच्या त्या एका क्षणापेक्षा आधीचा प्रवासच लक्षात राहतो. मुक्कामाकडे धावताना प्रवासाचा आनंद तर गमावत नाही ना हे पाहायला हवं. या गोष्टीबद्दल मी आणखीही विचार ऐकले किंवा वाचले; पण त्यात सर्वात निरागस काय वाटलं, तर म्हणे सशाने कासवाच्या पाठीवर बसून नदी पार केली. किती छान विचार हा! तसाही प्रत्येकाचा प्रवास वेगळाच असतो, मग काही क्षणांसाठी एकत्र येताना अशा पद्धतीने भेटूया की!
अशीच ती बिरबलाची गोष्ट. बादशहाची रेघ न पुसता लहान करायची असते. तर बिरबल वाळूत अजून मोठी रेघ काढतो आणि बादशहाची रेघ आपोआप लहान ठरते. पूर्वी शीतपेयांच्या एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या जाहिराती पाहिल्या किंवा कपड्याच्या साबणाच्या वगैरे... त्या पाहिल्यावरही हीच गोष्ट हमखास आठवायची! मग अशावेळी वाटतं काय गरज, रेघच मारायला हवी? म्हणजे बादशहाच्या अटीमुळे बिरबल ती काढतो हे ठीक; पण आपणही असेच वागत राहतो. दुसरा काय करतोय ते पाहात सतत बरोबरी करायला जायचं! स्पर्धा स्पर्धा म्हणतात ती इथूनच सुरू होते. खरंतर प्रत्येक जण इतका वेगळा आहे, की असंख्य शक्यता समोर असतात. म्हणजे रेघेचंच उदाहरण घेतलं, तर त्याच किनाऱ्यावर कितीतरी आकार काढता येतील. आपल्या कामाशी एकरूप होऊन त्यात हरवून जावं आणि जगाचा विसर पडावा. आपलीच आपल्याशी नव्याने ओळख त्यामुळे होऊच शकते; पण आपण स्वतःला विसरतो आणि तुलनेतच मग्न होतो.
अर्थात जगात काय चालू आहे हे कळण्यासाठी, इतरांकडून प्रेरणा घेऊन शिकण्यासाठी आजूबाजूला पाहावं लागतं. आपली नक्कल करायला अनेक जण टपलेले असतात म्हणून सतर्कही राहावं लागतं. अनुभव म्हणून पाहिलं तर जडणघडण व्हायला, आत्मविश्वास वाढायला स्पर्धा मदतच करतात; पण सतत इतर आणि आपण अशा तुलनेत अडकलो, तर वाटतं आपणंच आपल्याला मर्यादा घालून ठेवतो आणि मग स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण होऊ शकतं हे जाणवतंच नाही.
नुकतंच एक सुंदर चित्र पाहिलं, की एका शिल्पाचे हातच ते शिल्प घडवत होते. मनाला इतकं स्पर्शून गेलं. आपण आपल्याकडे पाहायचं, स्वतःला ओळखायचं आणि ज्या गोष्टी आपण घेऊनच आलोय त्याला योग्य तो आकार द्यायचा, दिशा द्यायची. लागलेले नवीन शोध, नवनवीन उपयोगी वस्तू यातूनच तर निर्माण होत असतील ना!
कलेच्या क्षेत्रात असं प्रभावित होणं अनेकदा दिसतं. अगदी भलेभले कलाकार सुरुवात एखाद्या प्रभावातून करतातही. मग त्यांना त्यांची वाट किंवा शैली गवसत जाते. मंगेश पाडगांवकरांनी स्वतः सांगितलेली आठवण उदाहरण म्हणून घेता येईल. बा. भ. बोरकर यांच्या काव्याचे ते विलक्षण चाहते. याच प्रेमातून पाडगावकरांची काव्यलेखनाला सुरुवात झाली. बोरकरांची काव्यपंक्ती होती - तव चिंतनी, मन गुंतुनी, मी हिंडतो रानीवनी
त्याच धर्तीवर पाडगावकरांनी लिहिलं...
- तुज पाहिले, तुज वाहिले, नवपुष्प हे हृदयातले
सुरुवात अशी प्रभावातून झाली असली, तरी नंतर त्यांची कविता अशी काही बहरली, की बोलगाणी, वात्रटिका असे नवनवीन काव्यप्रकार त्यांनी निर्माणही केले. हे खरोखर शिकण्यासारखं आहे आणि अशी आणखीही उदाहरणं आहेत; पण सामान्यपणे काय दिसतं? आपण कुणामुळे प्रभावित होतो. सुरुवातीला त्याच्यासारखं करू पाहतो आणि बरेचदा त्याच ऊबेत सुखी राहण्याची शक्यता असते. आपल्यालाच आपली ओळख मग होत नाही; पण असं म्हणतात, की झाडाचं एक पानही दुसऱ्यासारखं तंतोतंत नसतं, म्हणजे साच्यातून काढल्यासारखं! यावरून बा. भ. बोरकरांची कविता आठवली. एका कवितेत ते म्हणतात,
प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रूपकळा
प्रति एक पानाफुला त्याचा त्याचा तोंडवळा
थोडक्यात, प्रत्येक गोष्टीचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे आणि त्यातच त्याचं सौंदर्य दडलंय - असं या कवितेत पुढे बाकीबाब म्हणतात. मग माणसाच्या बाबतीत तर ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आज ‘युनिक’ हा शब्द परवलीचा झाला आहे; पण आपण आपल्यासारखे वागलो, तरी सहज ते वेगळेपण उमलून येईल. आता बोलगाण्याचाही विषय निघालाय, तर पाडगावकर चिऊताईला काय सांगतात पाहा,
मोर धुंद नाचतो, म्हणून आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गाते, म्हणून आपण का खिन्न व्हायचं?
तुलना करीत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं!
हे अगदी मनोमन पटतं. निसर्गसृष्टीत प्रत्येकाला आपली भूमिका दिलेली आहे. चित्रपटसृष्टीत नायक जरी सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसला, तरी लेखक-दिग्दर्शकासह मोठी टीम आपापली वैशिष्ट्य देऊ करते, तेव्हाच सर्वांगसुंदर कलाकृती घडते. अर्थात हे उत्तम चित्रपटाच्या बाबतीत, अन्यथा तिथेही विनोदी, सासू-सून, ऐतिहासिक, बायोपिक... अशा एकसारख्या लाटांवर लाटा येताना दिसतात. अर्थात त्यातही काही ठसा उमटवून जातात; पण कलाकृती सुंदर असेल, तर ती एखाद्या पुष्पगुच्छाप्रमाणे दिसते. गुलाबाला आपण राजा म्हणतो; पण कित्येकदा गुलाबासह अन्य फुलं असतील तर तो गुच्छ अजूनच खुलून दिसतो. अनेक फुलं स्वतःचं वेगळेपण ठेवून एकत्र येतात. इंद्रधनुष्य किंवा मोरपिसाच्या विविधरंगांचं तसंच. मोगरा आणि अबोलीची गजरे स्वतंत्रही छान दिसतात आणि एकत्रही. इतकंच काय, पण कडू चवीला आपण नकारात्मक ठरवून टाकलं; पण कडू कारलं तब्येतीला चांगलंही आणि काहींना आवडतंही!
आपणही या निसर्गाचाच भाग नाही का? एकदा एका प्रदर्शनात स्टाॅलवर हॅन्डमेड आणि मशीनमेड वस्तू होत्या आणि अर्थात मशीनमेड स्वस्त! कारण हस्तकलेत जपला जातो तो वेगळेपणा!
वेगळेपणा का जपायचा? तर मला जाणवलं ते असं, की वेगळेपणाची जाणीव आपला आत्मविश्वास वाढवते आणि दुसऱ्याचा वेगळेपण ओळखून त्याचा आदर करायला शिकवते. मान्य आहे, रुढार्थाने प्रत्येकाला वेगवेगळं यश मिळतं. कुणाला वलय लाभतं, कुणी सामान्य ठरतो. हे लाभलेली प्रतिभा, नशीब, मेहनत सगळ्यावर अवलंबून असतं अर्थातच; पण कूपमंडूक वृत्तीला याने आळा बसतो. कदाचित म्हणूनच माउलींची ओवी आठवली एकदम.
राजहंसाचे चालणे। भूतळी आलिया शहाणे।
आणिक काय कोणे। चालवेचिना।।
राजहंसाची चाल डौलदार म्हणून इतरांनी चालूच नये? जो तो स्वतःच्या परीने वाटचाल करतोच की!
तसं वर्गात पहिला, शाळेत पहिला, बोर्डात पहिला... असं क्षितिज विस्तारताना पाहतोच आपण; पण आजही शेजारी, सहकारी, भावंडं, जावा यांच्यात चढाओढ दिसते. समाजमाध्यमांमुळे मात्र या बाबतीत मोठा बदल घडलाय. जग जवळ आलंच आहे. त्याचबरोबर कला, कौशल्य, बुद्धिमत्ता याची काय झेप असू शकते हे पाहून आपण थक्क होतो. आणि सुज्ञ माणूस पूर्वीप्रमाणे केवळ निवडक लोकांशी तुलना न करता आपली नेमकी जागा ओळखून स्वतःच्या प्रवासाचा आनंद घेऊ लागतो.
आणि कितीही वेगळं वेगळं म्हटलं, तरी एकच आहे ना सगळं. ईशावास्यमिदं सर्वम्! वाटलं असेल, विषय कुठून कुठे गेला; पण चराचराला एकच तत्त्व व्यापून आहे असं म्हणल्यावर शांत वाटतं आणि आपल्या जुन्या ग्रंथातले विचार किंवा ईशोपनिषदातील हा आधुनिक विज्ञानानेही मान्य केलेला विचार आपल्याला हेवेदावे विसरायला भाग पाडू शकतो.
आजच्या भाषेत हेच सांगायचं, तर I am the best! असं म्हटलं, म्हणजे इतर good, better नाहीत, तर तेही Best आहेत याचा स्वीकार करुया आणि आपल्या असण्यानेच हे सगळं अनुभवता येतंय, म्हणून स्वतःवरही भरभरून प्रेम करुया. बा. भ. बोरकरांच्या शब्दात त्याच कवितेतील ओळींनी शेवट करायचा तर-
असो ढग असो नग त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी तिच्यापरीने देखणी
भेटे जे जे त्यात भरे अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे आपुली चाले यातूनच यात्रा
(लेखिका निवेदिका-व्याख्यात्या आहेत.)