- आशिष निनगुरकर, ashishningurkar@gmail.com
तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा, अशी जगाची अपेक्षा असते. परंतु देशाच्या सुरक्षिततेआधी आपली, आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्त्वाची मानून ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत पुढे सरकत राहतात. दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आंदोलनाच्या निमित्ताने आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी मिळते.
गेल्या काही वर्षांत आपल्याला अशा अनेक संधी मिळत आहेत. कधी भाषिक अस्मिता, तर कधी कडवी आक्रमक भूमिका घेणाऱ्यांच्या निमित्तानं आपण कोड्यात पडतो. खरोखरच आपली म्हणून काही भूमिका आहे काय, तशी ती असल्यास जाहीरपणे आपण ती मांडू शकतो का आणि तशी भूमिका मांडल्यानंतर होणारी टीका स्वीकारायची आपली तयारी आहे काय?
नोकरीत तणाव, आवराआवरीची धावपळ आणि थकून जाणारं मन आणि शरीर याला आपल्यातला प्रत्येक जण सभ्य, सुशिक्षित असताना संघर्षापासून भूमिका घेण्यापासून दूर राहू लागलो, तर नेमकी समजोपयोगी भूमिका घेणार कोण? आवर्जून काही सांगायची तीव्र गरज असतानाही गप्प बसून राहिल्यामुळे समाजात पसरत राहणारे चुकीचे विचार अधिक टोकदार बनले तर येणारा भविष्यकाळ आपल्याला क्षमा करेल काय, या प्रश्नांचा विचार करायला हवा. रस्त्यावर उतरून संघर्ष करता येत नसला, तरी पुढे येऊन विचार मांडणं आवश्यक आहे. मनमोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्या भावनांचा एकत्र उद्रेक झाला की त्याचा काय उपयोग?
एरवी आपण आपल्याच कामात म्हणजे नोकरीत किंवा व्यवसायात व्यग्र असतो. स्वतःला द्यायला आपल्याकडे जरासुद्धा वेळ नसतो. त्यामुळे जरासा वेळ काढून मिळालेला हा वेळ सत्कारणी लावणे गरजेचे आहे. मी जेव्हा माझ्या भूतकाळात जातो, तेव्हा माझ्या कॉलेजचे ते मोरपंखी दिवस मला आठवतात. ते दिवस खरंच खूप भारी होते. त्या वेळी मी ‘कमवा आणि शिकवा’ या योजनेत सहभाग घेतला होता. कॉलेजची लेक्चर्स झाली की आम्ही कॉलेजमधील काम करायचो. त्याचे आम्हाला काही पैसे मिळायचे; पण त्या पैशांपेक्षा जास्त मनोभावे आनंद त्या कामातून मिळायचा. पैशातून बसच्या पासची निकड भागायची. त्यामुळे घरच्यांवरचा थोडासा भार हलका व्हायचा. त्या वयात पैशाची किंमत कळली, म्हणून आजच्या महागाईच्या जगात सर्व गोष्टींना तोंड देता येते.
आज कॉलेज कॅम्पसमध्ये शिरलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या तरुणाईत फेरफटका मारल्यानंतर नवीन पंख घेऊन उडू पाहणारी ही पाखरं वेगवेगळ्या कल्पनेत रमताना दिसतात. नवनवीन फॅशन करू पाहणारी ही तरुणाई कट्ट्यावर आल्यानंतर त्यांच्या विविध विषयांवरील चर्चा, प्रसंग व मतं मांडताना पाहून बरं वाटतं. प्रत्येक जण आपल्या देहबोलीतून जो स्मार्टनेस दाखवीत असतो, तो वाखाणण्याजोगा असतो. याच वातावरणात इंटरनेटच्या मोहमयी जगात व्यसनाधीन, निराशमय पिढीचं चित्रही दिसतं तेव्हा मन चिंताग्रस्त होतं. अशी दोन्ही टोके दिसल्याने मन भावविभोर होते.
तरुणाई म्हटलं की सळसळता उत्साह, कट्ट्यावरच्या गप्पा, मित्रांबरोबर एन्जॉय केलेला प्रत्येक क्षण हेच आठवतं. पण बदलत्या परिस्थितीनुसार भान येतंच असं नाही. मी नेमका कोण आणि बदलत्या परिस्थितीत माझं खरं स्थान काय आहे, हा प्रश्न किती तरुणांना पडतो? शिक्षण, उच्च शिक्षण, रोजगार, लग्न आणि सेटल होणं या मार्गानं सुरू असलेला आपला सरधोपट प्रवास उमेदीची पंधरा वर्षं तरी खातो. इतकी वर्षे घालवल्यानंतर लग्न करून संसाराची काळजी घेण्याची जबाबदारी पडते. चाळिशीपर्यंतचा माणूस तरुण मानला जात असला तरी तरुणाईत अपेक्षित असलेला जोश, संस्कारांचं उपयोजन आणि समाजाभिमुखता खरोखरच कितपत जपता येते, असा प्रश्न पडतो आहे.
आपली भविष्यातील ओळख काय असावी, याचे असे सुस्पष्ट चित्र घटनात्मक स्वरूपात आपल्या भावी पिढ्यांपुढे ठेवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये आपला देश आहे. ते चित्र प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे, त्या ध्येयपूर्तीसाठी समाजाला दिशा देणे, समाजाची जडणघडण करणे, त्या चित्रातील तत्त्वांच्या विरोधी तत्त्वांशी अहिंसक संघर्ष करणे आणि ते चित्र प्रत्यक्षात आणल्यानंतर ते प्राणपणाने अबाधित राखणे, संवर्धित करणे हे आपल्या भावी नेतृत्वाचे इतिहासदत्त कर्तव्य आहे आणि तेच त्याच्यापुढील आव्हानही आहे.
या स्वप्नपूर्तीला खीळ घालणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यात पराकोटीची विषमता, गरिबी, कुपोषण, उपासमार, बेकारी, व्यसनाधीनता, सार्वजनिक सुविधा व विकासातील असमतोल, आर्थिक मंदीचे सावट, भ्रष्टाचार, अस्वच्छता, प्रदूषण, रोगराई, अज्ञान, निरक्षरता, निकृष्ट दर्जाचे शिक्षण-आरोग्यव्यवस्था-जीवनमान, पराधीनता, अवैज्ञानिकता, दैववाद, सामाजिक अन्याय, शोषण, लिंगभेद, जातीयवाद, धर्मांधता, हिंसाचार, अत्याचार, झुंडशाही, शत्रुभाव, असहिष्णुता, असुरक्षितता, लोकशाही संस्थांचा ऱ्हास, दहशतवाद, सांप्रदायिकता, सांस्कृतिक मागासलेपण, बेशिस्त, सुजाण नागरिकत्वाचा अभाव, नैसर्गिक संसाधनांची उधळपट्टी, पर्यावरणीय अरिष्ट अशा अनेक जटिल समस्या आपल्या देशात दीर्घकाळ टिकून राहिल्या आहेत. या समस्या पारंपरिक उपायांनी सुटण्यासारख्या असत्या तर अद्याप शिल्लक राहिल्याच नसत्या.
गेल्या दहा हजार वर्षांत मानवी समाज शेतीप्रधान, उद्योगप्रधान आणि माहितीप्रधान अवस्थांमधून संक्रमित होत होत आता ज्ञानप्रधान व बुद्धिमत्ताप्रधान अवस्थेत प्रवेश करीत आहे. पूर्वीच्या तीनही अवस्थांपेक्षा ही अवस्था मुळातच खूप वेगळी आहे. पूर्वीच्या अवस्थांमध्ये ज्ञानाला मध्यवर्ती स्थान नव्हते. निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, प्राण्यांचे व माणसांचे शारीरिक श्रम, आर्थिक भांडवल, माहिती आणि तिच्यावर वेगाने व स्वस्तात संगणकीय प्रक्रिया करण्याची क्षमता इत्यादींना मध्यवर्ती स्थान होते. एकविसाव्या शतकापासून मात्र नव्या कमर्शियल ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होताना आपण बघतो आहोत.
या शतकात निसर्गसंपत्ती, खनिजे, कच्चा माल, ऊर्जा, जमीन, शारीरिक श्रम करणारी मोठी प्रशिक्षित लोकसंख्या, आर्थिक भांडवल इत्यादी घटक पुरेसे नसूनही केवळ ज्ञानाच्या, बौद्धिक संपदेच्या बळावर काही समाज, काही देश, काही उद्योग विलक्षण विकास करताना दिसू लागले आहेत. हे पूर्वी कधीही झाले नव्हते. गेल्या दोन शतकांत श्रीमंत देश अधिकाधिक श्रीमंत होत गेले, ते त्यांनी केलेल्या नव्या कमर्शियल ज्ञानाच्या प्रचंड निर्मितीमुळे. केवळ विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे, तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या ज्ञानशाखांमध्ये अत्याधुनिक ज्ञानाच्या निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला. हे नवे ज्ञान समाजातल्या भेदाभेदांना पार करीत सर्व स्तरांपर्यंत सतत वेगाने वितरित करण्याचा महाप्रयास त्यांनी केला. हे नवे ज्ञान जुन्या उपयुक्त ज्ञानाशी जोडत जुन्या-नव्याचे एकात्मिक व्यवस्थापन त्यांनी केले.
आजच्या काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करता येत नसला, तरी पुढे येऊन विचार मांडणं आवश्यक आहे. मनमोकळेपणाने व्यक्त होणे गरजेचे आहे. वेळ हातातून निघून गेली की अडचण होते. त्यापेक्षा योग्य वेळी बोलता यायला हवे. आजच्या काळात नुसते शांत बसणे किंवा बघ्याची भूमिका घेणे हा गुन्हा आहे.
इंटरनेटमुळे भौगोलिक बंधने दूर सारून माहितीची सर्वदूर उपलब्धता आणि ज्ञानाची सहनिर्मिती विलक्षण वेगाने वाढत आहे. मानवी समाज जणू काही एका चिरायू अशा वैश्विक मेंदूची निर्मिती करीत आहे आणि समाजातला प्रत्येक जण त्या मेंदूचा बव्हंशी मुक्त वापर करणार आहे. या पार्श्वभूमीवर आता आपल्या देशाला गरज आहे-कोट्यवधी गरीब जनतेच्या जीवनातील वर उल्लेखलेल्या जटिल समस्या सोडवू शकणाऱ्या सर्जनशील, नवोन्मेषी ज्ञानकर्मींची. अशा असंख्य संवेदनशील व लोकाभिमुख ज्ञानकर्मींची चळवळ कशी निर्माण करायची व कार्यरत ठेवायची, हे भावी काळातील युवा नेतृत्वासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे.
देशाचे भविष्य हे तरुणाईवर अवलंबून आहे. उद्याचा विकसित भारत हा तरुणांच्या हाती आहे, असे नेहमी म्हटले जाते आणि हे खरेदेखील आहे. कोणत्याही देशाच्या विकासामध्ये त्या देशातील तरुणाईचे योगदान असते. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. समान विचारांचे काही मित्र उभे करणं आणि पुढल्या पिढीला या प्रागतिक आणि संस्कारी विचारांचं बाळकडू देणं गरजेचं आहे.
वाद कुठल्याही गोष्टींनी उभा राहिला तरी आपलं सत्व न गमावता, समाजाभिमुख विचार मांडत आत्मपरीक्षण करता यायला हवं. रोजच्या दगदगीतून वेळ काढत ‘मी माझा’च्या पलीकडे जाऊन इतरांसाठी, समाजासाठी काहीतरी करायला हवं. एक सुरुवात कुणीतरी करायला हवी, तरच कदाचित त्यातून उद्याची रम्य पहाट उगवेल. आतातरी आपण आपले आत्मचिंतन करायला हवे आणि एक पाऊल ‘मी माझा’च्या पल्याड टाकायला हवे.
(लेखक चित्रपट दिग्दर्शक आणि कवी आहेत.)