- स्मिता देव, saptrang@esakal.com
कधी कधी वर्षांनुवर्षं आपण करत असलेल्या कामाशी संबंधित अगदीच नवीन गोष्ट आपल्याला कळते. वर्षांनुवर्षं उत्तम स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतही असं होऊ शकतं का? होतं कधी कधी! पण शिकण्याचा उत्साह असेल, तर नव्यानं झालेलं ज्ञान अगदी सहज त्या अन्नपूर्णेच्या मूळच्या शहाणिवेत मिसळून जातं आणि त्याला चविष्ट धुमारे फुटतात !
माझ्या आईंचं (सासूबाई- अभिनेत्री सीमा देव) आणि माझं नातं फार छान होतं. आम्ही घट्ट मैत्रिणी होतो. अनेक गोष्टी एकमेकींशी बोलता बोलताच आमच्यातला बंध मजबूत होत गेला. त्या गप्पांमध्ये काय काय असायचं म्हणून सांगू! त्यांच्या बालपणीच्या गोष्टी, जगण्यात त्यांना आलेले बरेवाईट अनुभव, त्या जेव्हा त्यांच्या सासूबाईंबरोबर कोल्हापूरमध्ये राहत होत्या तेव्हाचे किस्से... त्यात गाडी खाद्यसंस्कृतीवर आली नाही असं व्हायचंच नाही.
त्या अतिशय यशस्वी अभिनेत्री असल्या, तरी मनातून मात्र अगदी साध्या गृहिणी होत्या. घरी असत तेव्हा मुलांना, घरातल्या बाकीच्या माणसांना काही तरी चांगलंचुंगलं करून खाऊ घालण्यात त्यांना मोठा आनंद वाटे. त्यांनी कधी कोणत्या ‘डाएट्स’ची भलावण केली नाही. माणसानं संतुलित आहार घ्यायला हवा असं त्यांचं मत. म्हणायच्या, की नंतर डॉक्टरवर पैसे घालवण्यापेक्षा, आधी चांगल्या आहारावर पैसे खर्च केलेले बरे ! मला हे तंतोतंत पटतं.
त्यामुळे आमच्या घरचं रोजचं जेवण अगदी चौरस आणि परिपूर्ण असायचं; तरी साधं असायचं. कोशिंबीर, सुकी भाजी/ पालेभाजी, रस्सा भाजी, चपाती, वरण आणि भात. जेवणानंतर आईंच्या खोलीत थोडा वेळ वामकुक्षी. त्याच वेळी गप्पा रंगायच्या आणि त्याचं आयुष्य माझ्यासमोर झरझर उलगडत जायचं.
अशाच एकदा आई काही किस्से सांगत होत्या. त्यांचं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हाच्या कोल्हापूरमधल्या आठवणी. एके दिवशी आई आणि त्यांच्या सासूबाई (म्हणजे आमच्या आजी!) सकाळी सकाळी मंडईत निघाल्या. आई सासूबाईंना ‘वहिनी’ म्हणत आणि सासूबाई आईंना त्यांच्या लग्नानंतरच्या नावानं हाका मारत - ‘रमा’! गाडीतून उतरून मंडईकडे जाणाऱ्या लहानशा गल्लीतून दोघी चालत होत्या.
अभिनेत्री सीमा देव चाललीय, म्हणताच लोक त्यांना बघायला गर्दी करू लागले. गर्दी वाढायला लागली, तशी आजींना जरा चिंता वाटू लागली. आईंनी हळूच त्यांचा हात धरला आणि ‘काळजी नको!’ असा दिलासा देत शांतपणे मंडईकडे चालू लागल्या. मंडईत आणखी गर्दी होती. भाजीविक्रेते गिऱ्हाइकाचं लक्ष वेधून घ्यायला लयीत ओरडत होते. तिथेच एक एक बाई पथारी टाकून बसली होती.
गडद हिरवी इरकलची साडी; लाल काठांची आणि खणाचा ब्लाउज. ऊन लागू नये म्हणून डोक्यावरून पदर घेतलेला. ती काही तरी विकत होती; मोठ्या मोठ्या दगडांसारखं! आजींचं कुतूहल चाळवलं आणि त्या ते काय आहे बघायला थांबल्या. त्यांना प्रश्नच प्रश्न पडले होते - ‘काय विकतेय ही बाई?... दगड?... ते कोण घेतं?... आणि त्याचं करायचं काय?’
जरा ओशाळंच होऊन त्यांनी आईंना विचारलं, ‘रमा, हा कसल्या प्रकारचा दगड आहे?’
एव्हाना दोघींच्या भोवती गर्दी फारच वाढली होती. त्यामुळे आपण आणि आजी सुरक्षित राहाव्यात इकडे आईंचं सगळं लक्ष होतं. त्यांनी आजी दाखवतायत तिकडे पाहिलं आणि हसू दाबत म्हणाल्या, ‘अहो वहिनी, हा सुरण आहे!’
मजा अशी, की आजींनी त्या दिवशी सुरण पहिल्यांदा पाहिला होता आणि त्याचं ‘रुपडं’ त्या बघतच राहिल्या होत्या.
याच आजी साठच्या दशकात घरी चॉकलेट्स बनवायच्या, वाळूवर छान केक करायच्या. त्या काळात ती नवलाची गोष्ट होती. नवीन काही तरी जाणून घेण्याबद्दलचं कुतूहल मात्र त्यांच्यात पुष्कळ होतं. सुरणाबद्दल पहिल्यांदाच कळल्यावर त्या आईंना म्हणाल्या, ‘आपण थोडा सुरण घेऊ या आणि घरी जाऊन काही तरी छान करू या!’ या वयात सासूबाईंचा उत्साह पाहून आईंना जरा आश्चर्यच वाटलं. मला वाटतं, की मनात कुतूहल असेल तरच आपण शिकत राहतो.
अखेर दोघींनी सुरण घेतला आणि आनंदात घरी आल्या. रात्रीच्या स्वयंपाकासाठी दोघी चुलीपाशी बसल्या. पांढऱ्या रश्श्यात खिम्याचे गोळे, हा बेत आधीच ठरलेला होता. बाबांना (अभिनेते रमेश देव) ते फार आवडत. त्यात आई सासूबाईंच्या ‘असिस्टंट’! कधी एकदा हा पदार्थ शिकतेय म्हणजे मुंबईच्या घरात मी ‘ह्यां’ना तो करून वाढीन, असं त्यांना झालेलं. आजींनी आईंना रश्श्याची तयारी करायला सांगितलं.
सुरणाचं काही तरी करायचं होतंच, म्हणून स्वत: माजघरातून सुरण घेऊन आल्या. घरगडी गण्याने सुरणाची माती धुवून तो स्वच्छ करून आणला. आजी तो चिरायला बसल्या आणि पुन्हा आश्चर्याचा छोटासा धक्का. सुरणाचं वरचं रूप कसं आणि आत किती सुंदर पिवळा रंग. त्या निरखून त्या चिरलेल्या सुरणाच्या तुकड्याकडे बघत असतानाच गण्याची बायको शेवंता म्हणाली, ‘‘वहिनीसाहेब, हा सुरण कुठं गावला?’
‘अगं तुला माहितीय सुरण?... काय बनवता याचं?’
शेवंता म्हणाली, ‘मटणाचं वाटप घालू लय झ्याक रस्सा बनवतो की आम्ही!’
आता दुसरी मजा अशी, की आजी स्वत: शाकाहारी! त्यामुळे सुरणातही मटणाचं वाटप म्हटल्यावर त्यांनी प्रथम नाक मुरडलं. पण सुरणाचा पदार्थ करायचा हे तर नक्की होतं. त्यामुळे त्या तयारीला लागल्या. सुरण चिरला, त्याचा पोत बघितला, बारका तुकडा खाऊन पाहिला. मग मात्र याचा उत्तम रस्सा होईल याची त्यांना खात्री पटली आणि त्यांचे डोळे चमकले.
रात्री अख्ख्या कुटुंबानं पांढरा रस्सा आणि पुलाव्यावर ताव मारला, तेव्हा आजींनी सुरणाची भाजी-जिरेसाळ भात आणि खुडी मिरची डाळीबरोबर चवीचवीनं खाल्ली.
अशा या ‘कवतिकाच्या’ सुरणाची रेसिपी आमच्या आईंनी मला सांगितली, तीच आज तुम्हाला सांगते.
सुरणाची भाजी
साहित्य
अर्धा किलो सुरण (धुऊन, साल काढून १ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्या), अर्धा कप तेल, १ टीस्पून जिरे, २ मोठे कांदे (बारीक चिरून), अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ.
मसाल्यासाठी
पाव कप तेल, २० लसूण पाकळ्या, १० तिखट हिरव्या मिरच्या, अर्धी खोबऱ्याची वाटी (किसून), १ बारकी जुडी कोथिंबीर, एका मोठ्या लिंबाचा रस.
कृती
प्रथम मसाल्यासाठी तेल तापवा आणि लसूण पाकळ्या व मिरच्या जाड्याभरड्या चिरून परतून घ्या. २-३ मिनिटं मध्यम आचेवर परतल्यावर काढून ठेवा.
त्याच तेलात बारीक आचेवर खोबरं कुरकुरीत परतून घ्या.
परतलेलं साहित्य गार झालं की सगळ्याची कोथिंबिरीसह मिक्सरवर खरबरीत वाटून घ्या.
भाजीसाठी दुसऱ्या पातेल्यात तेल तापवा. जिरे घाला. ते तडतडल्यावर कांदा घाला आणि मिनिटभर परता. मग सुरणाचे तुकडे घाला आणि आणखी २-३ मिनिटं परता.
हळद घाला आणि चवीनुसार मीठ घालून भाजी चांगली ढवळा. सुरण तीन चतुर्थांश शिजू द्या.
आता लसूण-मिरची-खोबरे-कोथिंबिरीचा मसाला घाला. गरम मसाला घाला आणि एकत्र करा.
ही भाजी झाकण न ठेवताच शिजवायची. नाहीतर हिरव्या मसाल्याचा रंग चांगला दिसत नाही.
सुरण शिजला की आच बंद करून लिंबू पिळा आणि एकत्र करून मग वाढा.
ही तिखट-चमचमीत भाजी भाकरी-चपाती कशाहीबरोबर खास जेवणाची खुमारी वाढवते. त्याबरोबर इंद्रायणी तांदळाचा गरमागरम मऊ-मऊ भात आणि खुडी मिरची डाळ! सुखच!
ही डाळ अगदीच साधी!
खुडी मिरची डाळ
साहित्य
२०० ग्रॅम तूरडाळ (दीड टीस्पून हळद आणि हिंग घालून चांगली शिजवलेली), पाव कप तेल , १ टीस्पून जिरे, ५-६ लसूण पाकळ्या, ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
कृती
एका पातेल्यात तेल तापवा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडल्यावर लसूण घाला.
लसूण जरा सोनेरी रंगाचा झाला की मिरच्या हाताने तोडून घाला. मिरच्या हाताने तोडून- म्हणजे खुडून घातल्या, म्हणून त्या डाळीला म्हणत ‘खुडी डाळ’!
मिरच्या जरा तळल्या गेल्यावर शिजवलेली तूरडाळ घाला.
मीठ घाला आणि लागेल तसे पाणी घालून डाळ सरसरीत करा. कोथिंबीर घाला आणि एक उकळी आल्यावर उतरवून वाढा.
(अनुवाद : संपदा सोवनी)