वाऱ्यासंगे स्पर्धा!
esakal February 09, 2025 09:45 AM

चारचाकी ही प्रारंभीच्या काळात उच्चभ्रू वर्गापुरती मर्यादित असणारी आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे. भारतात मोटारीची वाढती लोकप्रियता आणि गरज पाहता देश-विदेशातील वाहन उत्पादक कंपन्यांनी नावीन्यपूर्ण मोटारी आणून भारतीयांना भुरळ पाडली. आपल्याकडे बेसिक मॉडेल ते स्पोर्टी, सुपरमॉडेलपर्यंतच्या श्रेणी उपलब्ध असून, उत्पन्नानुसार त्याची खरेदी होते. सक्षम इंजिन, वाहनाची रचना, टायर, आसनशैली, कमी वेळेत वेग गाठण्याची क्षमता या गाेष्टीमुळे सुपरकार अन्य वाहनांच्या तुलनेत अधिक आकर्षक ठरते.

फॉर्म्युला वनसारख्या स्पर्धा पाहून सुपरकारबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीत भर घालणारी या वाहनांची श्रेणी एकार्थाने सामान्यांसाठी स्वप्नवत आहे. या मोटारीची किंमत किमान साडेतीन कोटींपासून सुरू होते. यावरून वेगवान मोटारीचे बाजारातील ‘वजन’ लक्षात येते. भारतात माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्यासह काही उद्योगपतींच्या वाहनतळात सुपरकारचा रुबाब दिसतो. सचिन तेंडुलकरच्या ‘फेरारी’वर तर चित्रपटही आला होता.

फेरारी, लॅम्बोर्घिनी, पोर्शे या सारख्या वाहनांचा वेग पाहून छातीत धडकी भरते. गुळगुळीत रस्त्यांवर सुसाट धावणाऱ्या स्पोर्टी, सुपरकारची लोकप्रियता वाढत आहे. भारतासारख्या मध्यमवर्गीयबहुल देशातील नवश्रीमंतही सुपरकारकडे वळत आहेत. अर्थात उद्योगपती, सेलिब्रिटी, धनाढ्य मंडळींच्या ताफ्यात या वाहनांचा हमखास समावेश असतो. विशेष म्हणजे भारतातील रस्त्यांचा दर्जा सुधारत असल्याने या महागड्या गाड्यांची वर्दळ वाढत आहे.

वेगवान आणि स्पोर्टी मोटारची निर्मिती करणाऱ्या नामांकित मॅक्लारेन कंपनीने अलीकडेच भारतात ५० मॅक्लारेनची विक्री झाल्याच्या निमित्ताने उदयपूर ते माउंट अबूदरम्यान विशेष ‘ड्राइव्ह’चे आयोजन केले. यात माधुरी दीक्षित सहा कोटींच्या ‘मॅक्लारेन ७५० एस’ सुपरकारसह सहभागी झाली होती. शिवाय आणखी दहा-अकरा मालकही या शानदार ड्राइव्हसाठी उतरले होते. हा एक इव्हेंट असला तरी आपल्याकडे सुपरकारची बाजारपेठ बहरत असल्याचे स्पष्टपणे दिसते. भारतात मॅक्लारेनची प्रारंभीची किंमत साडेचार कोटी रुपये असून, सर्वांत महागडी ७५० एस ही सहा कोटीं रुपयांच्या आसपास आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात वेगवान मोटारीच्या विक्रीत विक्रमी वाढ होत आहे. गेल्यावर्षी या वाहनाच्या खरेदीने वार्षिक हजाराचा पल्ला पार केला आणि एकप्रकारे उद्योगांसाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. भारतातील सुपर लक्झरी मोटारीच्या विक्रीतील वाढ हा केवळ ट्रेंडपुरती मर्यादित नसून, तो कायमस्वरूपी होणारा बदल आहे आणि आगामी काळात त्याचा ग्राफ आणखी वाढू शकतो. शिवाय या वाहनांची वाढती मागणी ही उद्योग क्षेत्रालाच नाही, तर या क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देत आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँडबद्दल भारतात रुची वाढत असून, त्यामुळे आपल्या बाजारात परकी गुंतवणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. उदा. ऑस्टिन मार्टिनने भारतात दोन नवीन स्पोर्टस मोटारी व्हेंटेज लाँच केल्या. याप्रमाणे ऑडीनेदेखील दोन मोटारींचे अनावरण केले आहे.

सुपरमोटारीच्या विक्रीत वाढ कशामुळे?

भारतात साध्या चारचाकी वाहनांबरोबरच आलिशान वाहनांच्या खरेदीतही तेजी दिसते. तज्ज्ञांच्या मते, तरुण पिढीच्या मानसिकतेत बदल झाल्याने सुपरकारचे फॅड वाढत आहे. आजची तरुण पिढी तुलनेने आलिशान वस्तूंवर अधिक खर्च करणे आणि यांसारख्या वस्तूंवर गुंतवणूक करण्यावर भर देते. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने वाढ होत आहे. ‘नाइट रँक वेल्थ’च्या अहवालानुसार भारतात गर्भश्रीमंत व्यक्तींची आणि नवश्रीमंतांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२३मध्ये तीनशे कोटींपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या व्यक्तींची संख्या १३ हजार २६३ होती आणि ती २०२८ पर्यंत १९ हजार ९०८ वर पोहोचण्याची शक्यता आहे.

सुपर लक्झरी मोटार प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. ‘फेरारी की सवारी’ चित्रपटातील एका दृश्यात नगरसेवक आपल्या मुलाच्या लग्नाची वरात ‘फेरारी’तून काढण्याबाबत आग्रही असतो. यावरून सुपरकारची प्रतिष्ठा लक्षात येते. खरेदीदारांच्या मते, अशा आलिशान वाहनांचे मालक झाल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढते. शिवाय कर सवलत मिळत असल्याने या मोटारीचा बाजार वाढण्यास मदत मिळाली आहे. कंपनीच्या मूल्यात घसरण झाल्याचा लाभ कंपनीला मिळतो आणि व्यक्तीच्या पातळीवर कॉर्पोरेट कार लीजद्वारे कर वाचवता येतो. हा लाभ लोकांना महागड्या सुपरमोटार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. आलिशान सुपरकारची असंख्य मॉडेल्स आहेत. यापैकी निवडक मॉडेल्सची माहिती इथे घेता येईल.

भारतातील वेगवान मोटारींची विक्री (किंमत चार कोटी रुपयांच्या पुढे) (स्रोत : वाहन उद्योग)

२०२१ - ३००

२०२२ - ४५०

२०२३ - १,०००

२०२४ - १,३००

मॅक्लारेन ७५० एस

1) मॅक्लारेन ७५० एस ही सर्वांत वेगवान धावणाऱ्या स्पोर्टस मोटारींपैकी एक. मॅक्लारेन ७५० एसमध्ये फोर-लिटर टर्बो व्ही-८ इंजिन आहे. हे इंजिन ७५० पीएस ऊर्जा आणि ८०० एनएमचा टॉर्क उत्पादित करण्यात सक्षम आहे. सात- स्पीड ऑटोमेटिकसह धावणारी मॅक्लारेन केवळ २.८ सेकंदांत शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठते. ७.२ सेकंदांतच ती २०० किलोमीटर प्रतितास वेग गाठते. त्याची टॉप स्पीड ३३२ किलोमीटर प्रतितास इतकी आहे.

2) या मोटारीत कार्बनफायबर रेसिंग आसन असून सस्पेन्शन पार्टमध्ये बदल केल्याने पूर्वीच्या तुलनेत ही मोटार २९ किलो वजनाने आणखी हलकी झाली आहे. सर्वांत हलकी आणि शक्तिशाली म्हणून या मोटारीकडे पाहिले जाते.

पोर्शे टायकन टर्बो एस

1) पोर्शे टायकन वेगवान आणि आलिशान मोटारींपैकी एक. या मोटारीने मागील वर्षी सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक मोटार म्हणून गौरव मिळवला आहे. भारतातही पोर्शेची ई मोटार लाँच झाली असून, ती १०५ किलोवॉटच्या बॅटरीपॅकसह सुसज्ज आहे. यातील इंजिन ७७५ पीएसची ऊर्जा आणि १११० एनएमचा टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे.

2) पोर्शे टायकनच्या मायलेजचा विचार केला तर एका चार्जिंगमध्ये ती सुमारे ५६८ ते ६३० किलोमीटर धावण्यात सक्षम आहे. केवळ अडीच सेकंदांतच ती शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठते. पोर्शेचा टॉप स्पीड २६० किलोमीटर प्रतितास आहे.

मर्सिडीज एएमजी एस ६३ ई

1) नामांकित मर्सिडीजची एएमएजी एस-६३ मोटार हायब्रिड टेक्नोलॉजीयुक्त आहे. या मोटारीच्या इंजिनमध्ये प्रचंड ऊर्जा क्षमता आहे. यात २-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असून, ते लहान बॅटरीपॅकला जोडलेले आहे. संयुक्त रूपात ही मोटार ८०२ पीएसची ऊर्जा आणि १४३० एनएमचा टॉर्क जनरेट करते. इलेक्ट्रिक नसते तेव्हा तिचे आउटपूट ६१२ पीएस ऊर्जेसह ९०० एनएमचा टॉर्क जनरेट करणारे आहे.

2) मर्सिडीज एएमजी एस ६३ ई केवळ ३.३ सेकंदांतच शून्य ते शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात सक्षम आहे. त्याचा कमाल वेग २५० किलोमीटर प्रतितास आहे.

फेरारी २९६ जीटीबी

1) अतिवेगवान फेरारी २९६ जीटीबीचे इंजिन ३.० लिटर ट्विन टर्बो व्ही ६ असून, ती ८१९ बीएचपी आणि ७४०एनएमचा टॉर्क जनरेट करते. शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यासाठी ती केवळ २.९ सेकंदांचा वेळ घेते. तिचा कमाल वेग ३३० किलोमीटर प्रतितास आहे. आठ स्पीड ऑटोमॅटिक ड्युअल क्लच ट्रान्समिशनचा गिअरबॉक्स गाडीला वेग देण्याचे काम करते.

2) फेरारीच्या कन्व्हर्टिबल मॉडेलमध्ये ओपन रुफचे फीचर असून, ते वैशिष्ट्यपूर्ण करते. त्याचा रुफ चौदा सेकंदांतच उघडता किंवा बंद करता येते. फेरारीत रिअर स्पॉइलर असून, ते अतिवेगात असताना वाहनाची रस्त्यावर पकड मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारा दबाव निर्माण करण्याचे काम करते.

लॅम्बोर्घिनी उरुस एसई

1) लॅम्बोर्घिनी उरुस एसई मोटारीत हायब्रिड पॉवरट्रेन (इंजिनपासून त्याच्या अॅक्सलपर्यंत आवेग प्रसारित करणारी यंत्रणा) असून, यात फोर लिटर व्ही ८ टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. ती ६२० पीएसची ऊर्जा आणि ८०० एनएमचा टॉर्क जनरेट करते. यात २५.९ किलोवॉटचा बॅटरीपॅक आहे.

2) लॅम्बोर्घिनी उरूस एसई केवळ ३.४ सेकंदांतच शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठते आणि तिचा टॉप स्पीड ३१२ किलोमीटर प्रतितास आहे.

बीएमडब्लू एम ४ सीएस

1) आलिशान वाहननिर्मितीत अग्रेसर असणाऱ्या बीएमडब्लूची एम ४ सीएस स्पाेर्टस माेटार दमदार आणि वेगवान आहे. ती चालविणे हा एक अलाैकिक अनुभव आहे. बीएमडब्लूमध्ये ट्विन टर्बाे पेट्राेल इंजिन आहे. हे इंजिन ५५८ पीएस ऊर्जा आणि ६५० एनएमचा टाॅर्क जनरेट करते.

2) इंजिनचा गिअरबाॅक्स ८ स्पीड ऑटाेमेटिक ट्रान्समिशनयुक्त आहे. बीएमडब्लूच्या वेगाचा विचार केला तर ती केवळ साडेतीन सेकंदांतच शंभर किलाेमीटर प्रतितास वेग गाठते आणि त्याचा कमाल वेग ३०२ किलाेमीटर प्रतितास आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.