गुठली तर परी आहे!
esakal February 09, 2025 07:45 AM

गुठलीने ते पाकीट अगदी सावकाश उघडलं आणि एकदम आनंदाने चित्कारलीच. तिने आश्चर्याने आईकडे पाहिलं. पाकिटात परीच्या फ्रॉकपेक्षा ही सुंदर फ्रॉक होता! गुठलीला हा फ्रॉक अगदी सहजासहजी मिळाला असं मुळीच नव्हतं हं! गुठली! आता या गुठलीचं एका शब्दात वर्णन करायचं झालं, तर ‘स्वच्छंदी’ हा शब्द परफेक्ट असेल! अहो काय नव्हती करत गुठली? सातपुड्यातल्या लहान-मोठ्या पर्वतांवर भटकणं, वेगवेगळी रंगीत पानं-फुलं गोळा करणं, झोका घेणं, झाडावर चढणं, खूप बडबड करणं आणि हो पऱ्यांची चित्र काढणं हे सगळंच तिला खूप खूप आवडायचं. अशी ही मस्त खुशालचेंडू गुठली म्हणजे घरातलं शेंडेफळ होती. आई, बाबा, ताई, दादा या सगळ्यांचीच खूप लाडकी. आई तर तिला ‘माझी सोनपक्षी’ असं म्हणायची!

एकदा दिवाळीच्या आदल्या दिवशी गुठली आणि तिचं कुटुंब घर सजवण्यात दंगून गेलं होतं. गुठली आणि ताई रांगोळी काढत होत्या आणि सगळ्यांसाठी नवीन कपडे सुद्धा आणले होते. पण हे काय! गुठलीचा चेहरा का असा? तिला तिच्यासाठी आणलेले कपडे आवडले नव्हते की काय? मुळीच आवडले नव्हते! तिला तिच्या ताईसाठी आणलेला फ्रॉक आवडला होता खरं तर! गुठलीने काय केलं, हळूच ताईचा तो फ्रॉक घेतला आणि घातला. गुठलीने आपला फ्रॉक घातलेला पाहून ताई जाम चिडली आणि बाबांनीसुद्धा रागाने गुठलीकडे पाहिलं. दादा तर हसायलाच लागला. गुठलीला खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

आईने गुठलीला समजावलं, ‘गुठली, तू तुझेच कपडे घालायला हवेस. ताईचे नव्हे.’ गुठलीला ते मुळी मान्यच नव्हतं. तिला परी व्हायचं होतं आणि परी तर फ्रॉक घालतात. आईने एक दोनदा प्रेमाने समजावून पाहिलं, पण गुठली ऐकतच नाही म्हटल्यावर मात्र आई रागावली. तिने गुठलीला लगेच तो ताईचा फ्रॉक काढून तिच्यासाठी आणलेले कपडे घालायला लावले. आणि त्या दिवसानंतर नेहमी आनंदी असणारी गुठली उदास राहू लागली. तिचा उत्साह, बडबड, सगळं मावळून गेलं. एकटीच आपल्या विचारांमध्ये हरवलेली गुठली सगळ्यांपासून लांब, अबोल राहू लागली. कोणामध्ये मिसळेनाशी झाली. फुलं-पानं, कोंबडीची पिल्लं एवढ्यांशीच फक्त ती बोलायची. तिची रंगीबेरंगी दुनिया बेरंग झाली होती. थोडक्यात काय, ‘गुठली’ आता ‘ गुठली’ राहिलीच नव्हती. कशी राहणार म्हणा!

आई म्हणाली होती, “गुठली, तू मुलगा आहेस. मुलगे मुलगे असतात आणि मुली मुली. मुलं परी नसतात. ते राजकुमार असतात.” पण गुठलीचं मन म्हणत होतं, ‘पण असं कसं? मला तर नेहमीच मी एक मुलगी आहे असंच वाटत आलंय. फक्त साधी सुधी मुलगी नाही आणि- परी. एक सुंदर परी. मला फ्रॉक घालायचाय. आई म्हणते तसा राजकुमार मी नाहीये. खरच मी मुलगी आहे. मी मुलगीच आहे.’

आता एखाद्या परीला राजकुमार व्हायची सक्ती केल्यावर तिचं असणं, तिची ओळख याबद्दल किती गोंधळ निर्माण झाला असेल तिच्या मनात? आपल्याला आपल्याविषयी जे नैसर्गिकपणे वाटतंय ते मुळात खरं नाहीच? की खरं असलं तरी योग्य नाही? आणि हे योग्य-अयोग्य ठरवणार कोण? पण मुळात हे ठरवायला हवंय तरी कशाला? परी व्हावं वाटणाऱ्याला परी होण्याचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे, हो ना?

गुठलीची कनक शशि यांनी लिहिलेली ही मूळ इंग्रजी गोष्ट. फ्रॉक न घालण्याची ताकीद मिळण्यापूर्वीचं गुठलीचं रंगीत जग आणि नंतर तिचं झाकोळून गेलेलं भावविश्व हे वैशिष्ट्यपूर्ण चित्रांमधून आणि सुंदर वेगवेगळ्या रंगछटांतून आपल्याला भिडतं. ही चित्रंसुद्धा कनक शशि यांनीच काढली आहेत. याचा मराठी अनुवाद रमा हर्डीकर-सखदेव यांनी केलाय. एकलव्य फाउंडेशनने हे मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे.

गुठलीच्या निराश असण्यामुळे तिच्या आईला चुकल्या चुकल्यासारखं वाटलं असणार. आपल्या सोनपक्ष्याचा चिवचिवाट असा बंद झालेला बघून तिनं काही तरी विचार केला असणार. म्हणूनच तर तिने एका पाकिटात घालून गुठलीला हवा तसा फ्रॉक भेट म्हणून दिला होता. तो फ्रॉक तिला देताना आईने तिला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, “हा घाल आणि तुला जसं हवं ना तसंच रहा. माझ्यासाठी तू माझी सोनपक्षीच आहेस.” किती सुंदर क्षण हा! आईने फक्त फ्रॉक नाही तर त्याहून अधिक काही तरी दिलं होतं गुठलीला! तिच्या हवं तसं असण्याच्या स्वातंत्र्याचा समंजस स्वीकार आणि मुख्य म्हणजे तिच्या निव्वळ असण्यावर - तिला ती जशी आहे असं वाटतंय तश्या असण्यावर-प्रेम!

रूरूचं वेगळेपण, डिपडिपचं वेगळेपण आणि आता गुठलीचं वेगळेपण! या सर्वांचं ‘खास’ असणं वेगवेगळं आहे, पण या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे - त्यांच्या वेगळेपणाला उचलून धरणारी माणसं त्यांच्या अवतीभवती आहेत! रूरूच्या गाण्याची खासियत त्याला पटवून देणारे त्याचे मित्र, व्हीलचेअर नाही तर डिपडिपचं धाडस हीच तिची ओळख सांगणारे तिचे आई, बाबा, शिक्षक आणि गुठलीला घट्ट मिठी मारणारी तिची आई!

कोणत्याच परी वर राजकुमार होण्याची आणि कोणत्याच राजकुमारावर परी होण्याची जबरदस्ती होऊ नये. या पृथ्वीवरच्या प्रत्येकाला आपलं असणं आहे तसं जपता यायला हवं, मोकेळपणे ते वागवता यायला हवं, साजरं करता यायला हवं! शेवटी असं लिहिलंय पुस्तकात की, कदाचित पुढे जाऊन गुठली जगाचे हे नियम बदलेल किंवा एखादं नवंच जग निर्माण करेल, पण आता गुठली परी आहे आणि आजच्यापुरतं तितकं पुरेसं आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.