विलोभनीय 'कारवार'
esakal February 09, 2025 08:45 AM

- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com

प्रत्येक मराठी माणसाला हवीहवीशी वाटणारी कोस्टल कर्नाटकच्या ट्रिपची सुरुवात होते ती कारवार या ठिकाणापासून. हे ठिकाण तसे पाहिले तर आहे अद्भुतच. म्हणजे कर्नाटक राज्याला जो काही समुद्रकिनारा लाभला आहे, त्या किनाऱ्याचे एक टोक म्हणजे हे कारवार. त्यामुळे ‘कोस्टल कर्नाटक’नामक प्रसिद्ध अशा भटकंतीचा श्रीगणेशा म्हणा किंवा आरंभ बिंदू म्हणजे हे शहर..

समुद्रकिनारी वसलेल्या गावांना किंवा शहरांना एक प्रकारचा टच लाभलेला असतो. तसाच काहीसा याही कारवार शहराला लाभलाय. शांत तितकेच आल्हाददायक वातावरण. नयनरम्य समुद्रकिनारा, किल्ला, मंदिरे, खास दाक्षिणात्य पदार्थ यांची रेलचेल, म्युझियम अशा विविधांगी प्रेक्षणीयस्थळांनी सजलेले हे विलोभनीय ठिकाण. त्यामुळे हे कारवार का पाहायचे, याची उत्तरे याच ठिकाणात दडलेली आहेत.

कारवारचे भौगोलिक स्थानसुद्धा छान आहे. एकतर हे गोव्याला अगदी चिकटून आहे. म्हणजे गोव्याची हद्द सोडली की आपण अवघ्या काही मिनिटांतच काली नदीवर बांधलेला पूल ओलांडून या कारवारमध्ये दाखल होतो. जर तुम्ही गोवामार्गे आलात तर तुम्ही याच रस्त्याने येता, अन्यथा महाराष्ट्रातील अनेक पर्यटक बेळगावमार्गे प्रवास करत या कारवारमध्ये दाखल होतात. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच; पण रेल्वेही सोयीचे आहे. कारण या शहरातच कारवार नावाचे रेल्वे स्टेशन आहे.

अशा या कारवारमध्ये आपण येतो तेव्हा साहजिकच प्रवासाचा शीण अंगात असतो. त्यामुळे या गावात येऊन हमखास एक तरी मुक्काम होतोच. या अशा कारवारची भुरळ नोबेल परितोषिक विजेते व महान कवी रवींद्रनाथ टागोर यांना पडली.

मुळात हे शहर शांत तर आहेच; पण या शहराला एक वेगळा साज आहे. गोव्याला जरी चिकटून असले तरीही इथे एक प्रकारची रसिकता नांदते. गोव्याच्या पर्यटनाचा बाज इथे अजिबात दिसून येत नाही. या कारवारने त्याची स्वतःची पर्यटन शैली अगदी जपून ठेवली आहे.

कारवारमध्ये सदाशिवगड नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची किनार आहे. हा उभारला आहे तो काली नावाची नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्या अगदी मुखापाशी. त्यामुळे आपल्याला कारवार शहरातून सदाशिवगडावर जाण्यासाठी काली नदीवरील सुंदर असा पूल ओलांडावा लागतो. कारवारपासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला उभा आहे. गडावर जाताना पहिल्यांदा लागते ती दुर्गादेवी मंदिराची भव्य कमान आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या.

त्यामुळे गाडी मध्यावर लावायची आणि पायऱ्यांनी मंदिराकडे निघायचे. दुर्गादेवीच्या मंदिरात आलो की या मंदिराने कात टाकलेली दिसते. मंदिराला इतिहासही बराच मोठा असावा. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे.

किल्ल्यावरून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. समोर काली नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. माथ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी तोफदेखील पाहायला मिळते. तसेच एका जांभ्या दगडात कोरलेला दगडी घोडाही भुरळ पाडतो; पण एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगविशी वाटते ती म्हणजे, सदाशिवगडावर आता एक मोठे रिसॉर्ट झाल्यामुळे पर्यटकांना किल्ल्याच्या माथ्यावर सोडत नाहीत. आपल्याला आपली भूक ही फक्त गडाच्या मध्यावर असलेले दुर्गादेवी मंदिर पाहून आणि मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला तोही फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी यावरच भागवावी लागते. कारण आता गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती उभारल्या आहेत.

कर्नाटक किनारपट्टीतले सगळे बीच नितांत सुंदर आहेतच. प्रत्येकाची एकेक तऱ्हा आपल्याला अनुभवायला मिळते. त्यातलाच हा रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाचा समुद्रकिनारा; पण या बीचवर जाण्यापूर्वी एक प्रश्न हमखास प्रत्येक पर्यटकाच्या मनात येतो तो म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि कारवार या ठिकाणाचा संबंध तरी काय?

रवींद्रनाथ टागोर हे तरुण वयात त्यांच्या मोठ्या भावाकडे सत्येंद्रनाथ यांच्याकडे काही काळ राहत होते. हे सत्येंद्रनाथ न्यायाधीश म्हणून काही कलावधीसाठी याच कारवार येथे होते, तेव्हा रवींद्रनाथ यांनी काही काळ या कारवारमध्ये व्यतित केला. मुळातच कारवार हे निसर्गसृष्टीने आणि सौंदर्याने संपन्न. त्यामुळेच कारवार येथील समुद्रकिनारा आणि आजूबाजूच्या सृष्टीसौंदर्याचा तरुण रवींद्रनाथ टागोर यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. आणि त्यांना त्यांच्या पहिल्या नाटकाची प्रेरणा याच ठिकाणी मिळाली. कारवारच्या मुक्कामाबाबत रवींद्रनाथांनी स्वतःच्या शब्दांत वर्णन केलेले आपल्याला अनेक ठिकाणी वाचायलादेखील मिळते. या बीचच्या बाहेर रवींद्रनाथ टागोर यांचा सुंदर पुतळा आणि माहितीदेखील दर्शनी भागात लावली आहे. हा बीच स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला आहे.

आयएनएस चॅपल युद्धनौका संग्रहालय

कारवरच्या भेटीत अगदी आवर्जून पाहावे असे एक ठिकाण म्हणजे ‘आयएनएस चॅपल’ युद्धनौका संग्रहालय. ही भारतीय नौदलाची युद्धनौका होती आणि १९७१च्या भारत-पाक युद्धात नौदल युद्धात सहभागी होती. आता हिचे संग्रहालयात रूपांतर झाले आहे. या नौकेचे अगदी आतून आपल्याला अनेक गोष्टींचे दर्शन घडते. म्युझियमच्या आत कॅप्टन, खलाशी, डॉक्टर इत्यादींच्या वेषभूषा केलेले पुतळे आहेत.

देखणे ‘रॉक गार्डन’

शहराजवळ असलेले आणखी एक ठिकाण आपल्याला खुणावते. ते म्हणजे रॉक गार्डन. रवींद्रनाथ टागोर बीचपासून अवघ्या काही मीटरवर उभं असलेलं हे ठिकाण दर्दी पर्यटकांनी तरी चुकवू नये असेच आहे. अनेक राज्यात याच धर्तीवर गार्डन उभारली गेलेली आहेत; पण तरीही कारवारचे हे रॉक गार्डन मात्र इतरांपेक्षा फारच वेगळे, सर्जनशील आणि सुंदर वाटते. हा अनुभव घेण्यासाठी तरी आपल्याला या गार्डनला भेट द्यावी लागते.

आत गेलो की आपल्यासमोर एक दगडाचे भव्य शिल्प उभारलेले दिसते. या शिल्पाच्या मागेच समुद्रकिनारा आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवरचे हे शिल्प म्हणजे एक सुरेख कॅनव्हासच. तर हे शिल्प आहे एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबाचे. या शिल्पामध्ये एका मच्छीमार कुटुंबाचा आनंद फारच सुंदरपणे चितारलेला दिसतो. तसेच या गार्डनमध्ये आपल्याला कर्नाटकची लोकसंस्कृती शिल्पांच्या माध्यमातून उभी केलेली दिसते. म्हणजे या राज्यातील राहणारी वेगवेगळी जाती-जमाती यांचे जीवन यात आपल्याला पाहायला मिळते. या जाती-जमातींचे विश्व ‘राहणीमान, घरे आणि कामधंदा’ या त्रिसूत्रीच्या आधारे फारच सुंदररीत्या उभारलेले दिसते.

यामध्ये गवळी, हलककी, मुखरी, डोंगरी, गोंड, हसला, सिद्दी, कुणबी या जमातींचा समावेश आहे. या जमातींच्या उभारलेल्या झोपड्या पुरुष- स्त्रियांचे पुतळे अगदी जिवंत वाटतात. इतकेच काय ही माणसे आपल्या अवतीभोवतीच जिवंतपणे वावरत आहेत असा भास होतो. आणि आपणही काही क्षण त्यांच्या जीवनात समरस झालो आहोत, असे वाटते.

कारवार हे छोट्या ट्रीपसाठी उत्तम ठिकाण आहे. दोन दिवस इथल्या निसर्गाच्या सान्निध्यात रमावे. इथल्या खाद्य-संस्कृतीचा आनंद घ्यायचा आणि मग हा सुंदर अनुभव घेऊन पुन्हा माघारी फिरायचे.

(लेखक गडकिल्ल्यांचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.