>> स्वप्नील साळसकर
छोटेखानी रामगड तसा देखणा, पण दुर्लक्षित. या गडावर दुर्गवीर प्रतिष्ठानची नजर पडली आणि झाडीझुडपांमध्ये गुदमरलेली ही ऐतिहासिक वास्तू मोकळा श्वास घेऊ लागली. स्वच्छता आणि संवर्धनाच्या मोहिमेतून या गडाचे जतन होत आहे, ही गौरवास्पद बाब आहे.
सिंधुदुर्गात मालवण तालुक्यात गडनदीच्या काठावर असलेल्या छोटेखानी रामगडाचे मागील दहा वर्षे स्वच्छता आणि संवर्धनाच्या मोहिमेतून जतन होत आहे. कणकवली-आचरा मार्गालगत असलेल्या या गडावर आता शिवप्रेमी, दुर्गप्रेमींची संख्या वाढू लागली आहे. गडकोटाला भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा जाणून घेणाऱयांची संख्या वाढत आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड यासारख्या बंदरावरील महत्त्वाच्या किल्ल्यांना परक्यांच्या आक्रमणापासून रोखण्यासाठी त्वरित रसद उपलब्ध व्हावी, घाटमाथ्यावरील व्यापार, व्यवहारास सुरक्षितता लाभावी या हेतूने उभारलेला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील रामगड हा खरा पहारेकरी आहे. गडावर त्याकाळी 21 जुन्या तोफा आणि 106 तोफ गोळे असल्याची नोंद आहे. मात्र सध्याच्या घडीला सात तोफा एका विशिष्ट पध्दतीने रांगेत पुरून उभ्या करून ठेवल्या असल्याच्या निदर्शनास येतात.
रामगडचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून गोमुखी पद्धतीचे आहे. प्रवेशद्वारावर भव्य बुरुज, दुतर्फा पहारेकरांच्या देवडय़ा आहेत. त्याशिवाय गडाला पडकोट आणि होळीचा असे दोन दरवाजे आहेत. संपूर्ण तटबंदीवर 17 बुरुज असून त्यावर तोफांच्या माऱयाकरिता खिडक्या ठेवल्या आहेत. त्याशिवाय गडावर वाडय़ांचे अवशेष, समाधीसदृश वास्तू, राजसदर अशा वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. गडावरील गणेश मंदिरातील गणपतीची मूर्ती वैशिष्टय़पूर्ण आहे. मूर्तीच्या आसनाखाली 7 मानवी कवटय़ा कोरलेल्या असून गळ्यात नरकुंड माळ आहे. गणेशाची ही आगळीवेगळी मूर्ती इतर कुठेही पाहायला मिळत नाही.
सन 2015 च्या गुढीपाडव्यापासून रामगडच्या संवर्धन कार्यास सुरुवात झाली. महिन्यातील दोन रविवार/सोमवारी दुर्गवीर प्रतिष्ठानचे मावळे आणि शिवप्रेमी यांच्या माध्यमातून या गडावर स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते. रामगड ज्यांच्या अखत्यारीत येतो ते अभय प्रभुदेसाई आणि कुटुंबिय यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याने हे कार्य आजही निरंतर सुरू आहे. दरवर्षी गडावरील वाढलेले गवत, झाडीझुडपे साफ करण्यापासून ते पावसाळ्यात मुख्य दरवाजांना प्लास्टिकचे आच्छादन टाकून सुरक्षित करणे यासारखी बरीच कामे केली जात आहेत. जांभ्या दगडातील हा गड भक्कम स्थितीत राहावा इतिहासात बांधकामातील कोणताही ढाचा न बदलता त्याची डागडुजी व्हावी यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. सध्या होळीचा दरवाजा कोसळण्याच्या स्थितीत असून त्या ठिकाणी येणाऱया दुर्गप्रेमींसाठी सूचनाफलक लावण्यात आला आहे. शिवप्रेमी, दुर्गप्रेमींना गड चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी वास्तूदर्शक फलक लावण्यात आले आहेत. गेली 10 वर्षे ऐतिहासिक वास्तूला जपताना या ठिकाणी दारूच्या पाटर्य़ा होणार नाहीत, गडाचे पावित्र्य राखले जावे याची विशेष खबरदारी दुर्गवीरांनी घेतली आहे. दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने 2008 साली दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष हसुरकर आणि काही निवडक शिवभक्त एकत्र होऊन ही दुर्गसंवर्धनाची चळवळ ‘दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य’च्या रूपात उभी केली.
गडकिल्ले पुन्हा पूर्वीसारखे बांधू शकत नाहीत, मात्र त्यांचे जतन करू शकतो. म्हणूनच गडावरील तटबंदी बुरूजावर अनावश्यक वाढलेली झाडी तोडणे, पावसाळ्यानंतर गवत काढणे, पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली गडांवरील टाक्यांमधील गाळ काढून पाण्याचा साठा स्वच्छ कसा होईल हे पाहणे, दिशादर्शक आणि स्थलदर्शक फलक लावणे, मातीत गाडले गेलेले अवशेष बाहेर काढणे, त्या वास्तूंचा अभ्यास करून त्यांना पुन्हा जुने रूप देण्याच्या दृष्टीने संस्था आजतागायत कार्यरत आहे.
रामगड किल्ल्यावर महाराष्ट्र दिनानिमित्त मशाल महोत्सव राबविण्यात येतो. या वेळी पणत्यांच्या आणि मशालींच्या तेजोमय उजेडात न्हाऊन निघालेला रामगड वेगळंच समाधान देऊन जातो. संवर्धन कार्यासोबत संस्थेच्या माध्यमातून गरजू मुलांना शालेय साहित्य, आदिवासी भागातील लोकांसाठी जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य (स्कुल किट, लॅपटॉप) सोलर लॅम्प वाटप, आरोग्य शिबीर, नैसर्गिक आपत्तीत लोकांसाठी मदत पुरवण्याचेही काम दुर्गवीरच्या माध्यमातून सुरू असते.
इतिहास जपण्यासाठी आज अनेक हात झटत आहेत. अपरिचित गडकिल्ले राखण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानप्रमाणेच कार्य उभे राहिले तर सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 ऐतिहासिक गडकोट, किल्ले नक्कीच पुढील पिढीसाठी शाबूत राहतील.