महाकुंभ: बातम्या, रील्सच्या पल्याडचा!
esakal February 09, 2025 01:45 PM

बातम्यांमध्ये दाखवले जाणारे दृश्य किंवा रील्समध्ये ३० सेकंदांत दिसणारे साधू तसेच सेलिब्रेटी, नेत्यांच्या व्हीआयपी स्नानाचे व्हिडिओ म्हणजे महाकुंभ नाही. प्रत्यक्षात महाकुंभ हा या व्हिडिओतील फ्रेमच्या बाहेर खूप वेगळा आणि मनाला भावणारा आहे. कोट्यवधी लोक एकत्र येऊनही राखली गेलेली स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रत्येकाच्या पोटाला मिळणारे अन्न, छोट्या-छोट्या व्यवसायातून निर्माण झालेला रोजगार हे या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य आहे. आध्यात्मिक वातावरणातील आयुष्य समृद्ध करणाऱ्या प्रवासाचा हा वृत्तांत...

प्रयागराजमध्ये १४४ वर्षानंतर महाकुंभ होत आहे. विशेष म्हणजे, प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आलेला असतानाचा हा पहिलाच कुंभमेळा असल्याने हा विषय सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये नसता, तरच नवल. त्यामुळे आपसूकच हा विषय चर्चेचा ठरला. देशभरातील भाविकांची पावले प्रयागराजकडे वळत आहेत. १३ जानेवारीला पौष पौर्णिमेला आणि १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्यातील दोन शाहीस्नान पार पडले होते.

आता वेध लागले होते ते २९ जानेवारी रोजी होणाऱ्या मौनी अमावस्येच्या शाही स्नानाकडे. मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचा मुहूर्त साधण्यासाठी देशभरातील कोट्यवधी लोक प्रयागराजच्या दिशेने निघाले होते. पुण्यातून मी, माझे मित्र महेश पोकळे, प्रसाद चावक, दुष्यंत मोहोळ, देवेंद्र असलेकर, ऋषिकेश यादव आणि लक्ष्मीकांत गुज्जा असे आम्ही सात जण विमानाने लखनौला पोचलो. तेथून खासगी गाडीने प्रयागराजला जाण्यासाठी निघालो.

मोठा महामार्ग असूनही रस्त्यावर गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती, त्यावरून प्रयागराजमध्ये होणाऱ्या गर्दीचा अंदाज येत होता. या दरम्यानचे हॉटेल्स, पेट्रोल पंप याठिकाणी रांगा लागलेल्या होत्या. जवळपास चार तासांचा प्रवास केल्यानंतर प्रयागराजपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर ‘कानपूर एक्स्प्रेस वे’वर भदरी फाटा येथे पोचलो. समोर प्रयागराजकडे जाणारा रस्ता दिसत होता, पण पोलिसांनी गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या.

आम्हाला पर्यायी मार्गाने प्रयागराज गाठता येईल असे वाटल्याने या वाहतूक कोंडीत थांबून राहिलो. आमची कार जवळपास अडीच तासाच्या प्रवासात अवघे एक ते दीड किलोमीटर पुढे गेली, तेव्हा लक्षात आले की प्रयागराजकडे गाडी घेऊन जाणे अशक्य आहे. आम्ही गाडीतून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. स्थानिक नागरिकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले, की महामार्गावर दिसणाऱ्या हजारो वाहनांपैकी एकही प्रयागराजकडे जाऊ शकणार नाही.

मौनी अमावस्येला सुमारे १० कोटी भाविक प्रयागराजला जमणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी प्रयागराजला जोडणाऱ्या महामार्गावरील सीमा वाहतुकीसाठी बंद केल्या होत्या. काही ठिकाणी प्रयागराजपासून २० किलोमीटरवर, तर काही ठिकाणी ५० किलोमीटरवर महामार्ग बंद केले होते, असेही स्थानिकांनी सांगितले.

त्यामुळे तुम्हाला मौनी अमावस्येला गंगेत डुबकी मारायची असल्यास स्थानिक खासगी गाड्यांचा वापर करा, मिळेल त्या वाहनाने किंवा चालत जाण्याचीही तयारी ठेवा, असेही सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने मोफत बससेवा सुरू ठेवली असली, तरीही त्या बस वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांतून प्रवास करण्यात काहीच अर्थ नव्हता.

थंडीचा तडाखा

प्रयागराजला जाण्यासाठी प्रचंड थंडीत गाडीचा शोध सुरू केला. बोलताना तोंडातून वाफा बाहेर पडत होत्या. जॅकेट, त्यावरून स्वेटर, डोक्यावर टोपी, मफलर गुंडाळूनही थंडी जाणवतच होती. एका सहा आसनी रिक्षावाल्याने प्रयागराजपासून नऊ किलोमीटरवर असणाऱ्या फाफामाऊ या गावात सोडण्याचे ५०० रुपये मान्य केले. रात्री साडेबारा वाजता भदरी फाटा येथून रिक्षाने प्रवास सुरू केला.

खेड्यातील भरपूर खड्डे असलेल्या या रस्त्याने जाताना आदळून कंबरडे मोडण्याची वेळ आली, धुळीने चेहरे माखून गेले. रिक्षावाल्याला ‘दुसरा रस्ता नाही का?’ असे विचारल्यानंतर त्याने ‘हा रस्ता जास्त कोणाला माहिती नाही, बाकी सर्व रस्त्यावर ५ किलोमीटरपेक्षा जास्त मोठ्या रांगा लागल्या आहेत,’ असे सांगितले. आम्ही जवळपास अर्धा तास रिक्षाने प्रवास करून फाफामाऊला रात्री एक वाजता पोचलो.

रिक्षातून खाली उतरून काही अंतर चालत गेल्यावर मुख्य चौकात प्रचंड गर्दी, कोंडीत अडकलेली वाहने दिसली. येथील पोलिस काहीच करू शकत नव्हते. ते फक्त भाविकांना ‘सुरक्षितपणे चालत रहा’, ‘मौल्यवान दागिने, मोबाईल, पैसे सांभाळा’ असे वारंवार आवाहन करत होते. फाफामाऊपासून प्रयागराज जवळपास साडेनऊ किलोमीटर लांब होते. भाविक डोक्यावर, खांद्यावर त्यांच्या बॅगा घेऊन चालत प्रयागराजकडे निघाले होते.

गर्दीतून वाट काढत आमचा सात जणांचा गट पटापट पावले टाकत होता. हे अंतर पार करताना चांगलीच धावपळ झाली व त्यातून अंगात उष्णता निर्माण होऊनही बोचरी थंडी जाणवतच होती. एके ठिकाणी भाविकांना शिऱ्याचे वाटप सुरू होते, गरम गरम शिऱ्यावर आम्ही ताव मारला अन् पुढच्या प्रवासाला तयार झालो. रात्रीचे दीड वाजत होते, प्रयागराजला जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागणार होते. त्यामुळे काही वाहने मिळतात का याचा शोध सुरू केला.

तेव्हा स्थानिक तरुणांनी प्रत्येकी दीडशे रुपये घेऊन कुंभमेळ्यातील सेक्टर नऊपर्यंत सोडण्याची तयारी दाखवली. दुचाकीवरून पुन्हा प्रवास सुरू केला, गाडीवरून प्रवास करताना अंगात चांगलीच हुडहुडी भरली. फाफामाऊ येथे गंगा नदीचा पूल ओलांडून प्रयागराजच्या दिशेने निघालो. दुचाकीस्वाराने आम्हाला सेक्टर नऊमध्ये गंगाजी माता मंदिर येथे सोडले. समोर गंगेच्या विस्तीर्ण वाळवंटात हजारो दिव्यांमध्ये चमकणाऱ्या कुंभमेळ्याचे दर्शन झाले!

कैलासद्वारातून कुंभमेळ्यात प्रवेश

प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण २५ सेक्टर आहेत, त्यापैकी सेक्टर नऊमध्ये श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या आश्रमात राहण्याची व्यवस्था होऊ शकते, असे समजले. सेक्टर नऊसाठी कैलासद्वार साकारण्यात आले आहे, त्यातून आम्ही कुंभमेळ्याच्या भूमीत प्रवेश केला. रस्त्याच्या दुतर्फा आश्रम होते, त्यात भाविकांसाठी तुंबू होतेच, पण त्याचसोबत सर्व सोयींनी युक्त अशा खोल्याही होत्या.

राहण्याची जागा न मिळालेले रस्त्याच्या कडेला भर थंडीत झोपले होते. प्रयागराजला गेल्यानंतर राहायचे कोठे हा मोठा प्रश्न होताच, पण गोविंद देव गिरी महाराज यांचे शिष्य दत्तात्रेय माने यांनी आमची राहण्याची व्यवस्था केली. थंडीचा बंदोबस्त करण्यासाठी उबदार पांघरून, गादीचीही व्यवस्था होती. हे मात्र खूपच अनपेक्षित होते. आपल्याला कोठे तरी पाठ टेकवायला जागा मिळावी, अशी अपेक्षा असताना घरातल्या सारखी व्यवस्था होणे यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो!

चेंगराचेंगरीच्या घटनेची दहशत

कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक येतात असे आपण कायम ऐकतो, वाचतो. आम्ही मध्यरात्री तेथे पोचलो तेव्हा रस्ते ओस पडलेले होते, मात्र सकाळी सातच्या सुमारास आम्ही आखाड्यातून बाहेर पडलो, तेव्हा याच रस्त्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. त्यापूर्वीच संगम घाटावर शाही स्नानाला जाताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३०पेक्षा जास्त भाविक मृत्युमुखी पडल्याची बातमी वाचनात आली. नेमके याच दिवशी आम्ही प्रयागराजला पोचलो होतो. त्यामुळे आम्हा सर्वांची घरच्यांनी, नातेवाइकांनी, मित्रांनी फोन करून चौकशी सुरू केली.

आम्ही ज्या सेक्टर नऊमध्ये होते, तेथून संगम घाट सुमारे ७ किलोमीटर लांब असल्याने या भागात कोणताही गोंधळ नव्हता. मात्र, सर्व यंत्रणा दक्ष झाल्याचे पाहायला मिळाले. मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी गंगेत डुबकी मारण्यासाठी भाविकांचे जत्थेच्या जत्थे घाटाकडे निघाले होते. पोलिसांकडून ढकलाढकली करू नका, लहान मुलांचे हात सोडू नका, ज्येष्ठ नागरिकांना मदत करा असे आवाहन माईकवरून केले जात होते.

संगम घाटाच्या परिसरात प्रचंड गर्दी असते, त्या तुलनेत सेक्टर नऊमध्ये कमी गर्दी असल्याचे पोलिस सांगत होते. आपल्या सोबतचा माणूस गर्दीमध्ये हरवू नये यासाठी हाताचे, दोरीचे कडे केले जात होते. समोर चालणाऱ्याच्या हातात उंच निशान असायचे, त्याच्या पाठीमागे प्रत्येकजण चालत असे, त्यामुळे अंतर पडले तरी हे निशान बघून पुन्हा आपल्या गटात सहभागी होणे सोपे होते. प्रत्येकाने गर्दीतून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही तरी जुगाड केलेले होते.

एकत्र चालणाऱ्यांमध्ये दोन-चार सेकंदांचा फरक पडला, तरी दोघांमधील अंतर १० ते १५ फुटापर्यंत वाढत होते. त्यामुळेच चुकामूक होण्याचे प्रमाण मोठे होते. त्याचा अनुभव आम्हीही घेतला, मात्र वेळीच एकमेकांना आवाज दिल्याने पुन्हा सर्वजण एकत्र आलो. चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. आपण कोणत्या गोंधळात सापडणार नाही, याची सर्वजण काळजी घेत होते.

स्वच्छतेला तोड नाही

एखाद्या ठिकाणी कोट्यवधी लोक एकत्र आल्यानंतर अस्वच्छता निर्माण होणे सहाजिकच आहे. स्वच्छतागृहांची व्यवस्था कमी पडणे, पाण्याचा वापर न केल्याने घाण होणे असे प्रकार आपल्याला निदर्शनास येतात. मात्र, कुंभमेळ्यात अशी घाण कोठेच दिसली नाही! प्रत्येक आखाड्यामध्ये मोबाईल टॉयलेटची व्यवस्था होती, तेथे शोष खड्डे केल्याने दुर्गंधी पसरत नव्हती. आखाड्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था होती, ठरावीक अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी नळकोंडाळे होते.

या सर्व व्यवस्थेमुळे गंगेच्या वाळवंटात कोणी उघड्यावर शौचास बसले आहे, असे चित्र आम्हाला दिसले नाही. रस्त्यावरही कोठेही कचरा पडलेला नव्हता. कचरा पडल्यास लगेच स्वच्छता कर्मचारी तो उचलत होते, जमा झालेला कचरा घटांगाडीत टाकून वाहून नेत होते. सेक्टर नऊमधील गंगा नदीचा घाट आखाड्यापासून सुमारे एक किलोमीटर लांब होता. या भागात प्रचंड गर्दी होती, मात्र स्वच्छताही तेवढीच होती. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यावसायिकही कागद रस्त्यावर टाकू नका, कचरा पेटीत टाका असे आवर्जून सांगत होते. स्वच्छतेबाबत प्रत्येकच जण काळजी घेत असल्याचे सर्वत्र होते.

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याबद्दल अनेक चर्चा रंगत असल्या, तरी तेथील आध्यात्मिक वातावरणाबाबतची माहिती फारशी बाहेर आली नाही. पहाटेपासून आखाड्यांमध्ये महादेवाची पूजा, अभिषेक, यज्ञ सुरू होतात. आश्रमांमध्ये भजन, कीर्तनाला सुरुवात होते. रामायण, महाभारतातील कथांचे निरूपण आध्यात्मिक गुरू करत असतात अन् हजारोंच्या संख्येने जमलेले भाविक या भजनात, कीर्तनात तल्लीन होऊन गेलेले दिसतात.

रामरक्षा, हनुमान चालिसा, भगवद्गीतेतील श्लोक कायम कानावर पडत असतात. एखाद्या प्रसिद्ध गायकाचा सुसज्ज व्यासपीठावर भजनाचा कार्यक्रम होत असतो. त्याचा आनंद आखाड्याबाहेरील भाविकांना घेता यावा यासाठी एलइडी स्क्रीनही लावले आहेत. आखाड्यांमध्ये किंवा आश्रमांमध्ये नेमके काय सुरू आहे, हे माध्यमे किंवा समाजमाध्यमांत दिसत नाही, मात्र ते दृश्य आम्हाला प्रयागराजमध्ये सर्वत्र पाहायला मिळाले. आध्यात्मिक गुरूंचे देशभरातील शिष्य या ठिकाणी अनेक दिवस राहायला आलेले असतात. शाही स्नान हा एक कुंभमेळ्यातील प्रमुख कार्यक्रम आहे, परंतु अन्य दिवसांत भाविक भजन, कीर्तन, प्रवचनात तल्लीन होऊन अध्यात्मामध्ये बुडाल्याचे चित्र दिसले. प्रयागराजला गेलो नसतो, तर हा आध्यात्मिक आनंद घेता आला नसताच आणि तो कधी समजलाही नसता...

सोयी-सुविधा

कुंभमेळ्यात हजारो रुपये भाडे देऊन फाइव्ह स्टार सुविधा उपभोगता येतील अशा बातम्या वाचल्या होत्या, मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठीही चांगल्या सुविधा उपलब्ध होत्या. निवासासाठी असणाऱ्या भाविकांना गादी, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार पांघरूण अशी व्यवस्था होती. न्याहरी, पोटभर जेवण होते. सर्वांना शिस्तीमध्ये जेवण मिळेल याची व्यवस्था होती. विशेष म्हणजे, जेवताना मोबाईल वापरण्यास पूर्ण बंदी होती! आश्रमाच्या आतील व बाहेरील सजावट ही भाविकांना आकर्षित करणारी होती. रामायण, महाभारतातील प्रसंग येथे देखाव्यांच्या स्वरूपात मांडले आहेत. प्राथमिक उपचाराचीही सुविधा उपलब्ध होती. अनेक ठिकाणी अन्नदान करण्यासाठी भंडारा सुरू होता. शेकडो भाविक रांगा लावून कोणतीही गडबड न करता जेवणाचा आस्वाद घेत होते. जेवण झाल्यानंतर प्रत्येकजण आपापले ताट धुवून दुसऱ्या भाविकाला देत होता. तसेच, जेथे पत्रावळ्या होत्या, तेथे जेवण झाल्यानंतर त्या कचरा पेटीतच जात होत्या. प्रत्येकजण स्वच्छतेची काळजी घेत होता हे दृष्य खूपच भावणारे होते.

स्थानिक तरुणांना रोजगार

कुंभमेळा हा स्थानिक तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी आहे. या ठिकाणी भेळ विक्रेत्या तरुणासोबत चर्चा केली. तो २० रुपयांत भेळ देत होता. आम्ही मराठीत बोलत असल्याने तोही काही शब्द मराठीत बोलू लागला. अधिक चौकशी केली असता तो म्हणाला, ‘‘मी इचलकरंजीमध्ये कामाला होतो, मात्र आता कुंभमेळा असल्याने येथे भेळ विकत आहे. भरपूर पैसे मिळत आहेत.’’ आमच्याशी गप्पा मारताना त्याचा हात भेळ बनविण्यासाठी अखंड सुरू होता. या १०-१५ मिनिटांच्या काळात त्याने जवळपास ५०० रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यावरून त्याच्या रोजच्या उत्पन्नाचा अंदाज लावता येऊ शकतो.

मौनी अमावस्येचा दिवस प्रयागराजमध्ये घालविल्यानंतर आम्ही संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू केला. प्रयागराज ते फाफामाऊ आणि फाफामाऊ ते भदरी फाटा येथे कानपूर महामार्गापर्यंतच्या प्रवासासाठी दुचाकीस्वारांची मदत घेतली. प्रयागराजमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी होती, गर्दीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. गाडी चालविणे अवघड असल्याने रात्री दीडशे रुपये भाडे घेणारे तरुण दिवसा अडीचशे रुपये घेत होते. तेही अर्ध्या वाटेत सोडत होते. सकाळी कॉलेज करायचे अन् त्यानंतर दुचाकीवरून नागरिकांना सोडण्याचा व्यवसाय करायचा, अशा पद्धतीने येथील शेकडो तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध झाला.

जड अंतःकरणाने बाहेर

आम्हाला १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. गंगा मातेच्या पाण्यात डुबकी मारल्यानंतरचा अनुभव शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. ज्या गंगा नदीबद्दल आपण लहानपणापासून ऐकले, तिचे धार्मिक महत्त्व आपण जाणतो, त्या नदीत कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या दिवशी डुबकी मारण्याचा आनंद काही वेगळाच होता. पुढील प्रवासासाठी आम्ही सायंकाळी जड अंतःकरणाने प्रयागराज सोडण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी अजून काही दिवस राहिले पाहिजे, धार्मिक, आध्यात्मिक घटनांचा साक्षीदार व्हावे असे वाटत होते. या प्रचंड विस्तारलेल्या कुंभमेळ्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या, शिकण्यासारख्या होत्या. मात्र, वेळच्या मर्यादा असल्याने या एकमेवाद्वितीय अनुभवापासून दूर जाण्याचा निर्णय जड अंतःकरणाने घ्यावा लागला. (लेखक ‘सकाळ’चे बातमीदार आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.