बिजापूर : डाव्या विचारसरणीतील कट्टरतावादाविरोधात सुरक्षा दलांनी आज केलेल्या कारवाईला मोठे यश आले. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत जवानांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. या कारवाईत दोन जवानही हुतात्मा झाले. आजच्या कारवाईमुळे या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ८१ झाली आहे.
विविध सुरक्षा दलांमधील जवानांचे संयुक्त पथक आज सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलामध्ये शोधमोहीम राबवीत असतानाच नक्षलवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली, अशी माहिती बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली. चारही बाजूंनी सुरक्षा दलांचे सुमारे ६५० जवान जंगलात घुसले आणि त्यांनी शोध सुरू केला. यामुळे वेढल्या गेलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला, असे राज्याचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले. जवानांनी कारवाईत अतुलनीय धाडस दाखवत ३१ नक्षलवाद्यांना ठार मारले. या चकमकीत अनेक जण जखमीही झाले.
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात जिल्हा राखीव दलाचा एक आणि विशेष कृती दलाचा एक, असे दोन जवान हुतात्मा झाले. अन्य दोन जवान जखमी झाले. या जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्रांचा आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. यामध्ये एके-४७ रायफल, इन्सास रायफल, एसएलआर, .३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लाँचर यांचा समावेश आहे.
या कारवाईत जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, बस्तर फायटर्स आणि राज्य पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते. या चकमकीनंतर काही नक्षलवादी पळून गेले असण्याची शक्यता गृहित धरून अतिरिक्त कुमक मागवून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
बस्तरमध्ये मोठी कारवाईयंदाच्या वर्षात मारल्या गेलेल्या ८१ नक्षलवाद्यांपैकी ६५ नक्षलवादी बस्तर विभागात मारले गेले आहेत. हा विभाग बिजापूरसह सात जिल्ह्यांचा मिळून बनला आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुरक्षा दलांनी २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले होते. २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद मिटवून टाकू, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. त्यानुसार धोरण राबवीत नक्षलवादविरोधी मोहिमांना वेग आणण्यात आला आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत राज्यातून नक्षलवाद मिटवून टाकू, असा विश्वास छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांनीही व्यक्त केला आहे.
नक्षलमुक्त भारताच्या दिशेत सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. मानवताविरोधी नक्षलवाद्यांना समाप्त करताना आमच्या दोन शूर जवानांनाही वीरमरण आले आहे. सर्व देश या वीरांचा कायम ऋणी असेल. आम्ही पुढील वर्षी मार्चपर्यंत नक्षलवाद निश्चित संपवू.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
नक्षलवादाविरोधात सुरक्षा दलांना सातत्याने यश मिळत आहे, त्यामुळे नक्षलवाद संपविण्याचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल.
- विष्णु देव साय, मुख्यमंत्री, छत्तीसगड