>> जगदीश कब्रे
नुकताच जागतिक कर्करोग दिन पार पडला. माधुरी काबरे यांना कर्करोगाचे निदान झाले अन् त्यानंतर काही वर्षांनी त्यांचे निधन झाले. या दरम्यानच्या काळात माधुरी यांनी लिहिलेल्या डायरीतील नोंदीतून या आजारपणातील वेदनेत, संघर्षात, आनंदात दडलेलं जीवनाचं सौंदर्य उलगडलं. या नोंदींचा त्यांचे पती जगदिश काबरे यांनी घेतलेला वेध.
मे 2018 मध्ये माधुरीला स्वादुपिंडाच्या कर्करोगाचं निदान झालं. तेव्हापासून 16 ऑगस्ट 2022 पर्यंत ती कर्करोगाशी धीटपणे झुंज देत होती. माधुरीला जाऊन आता तीन वर्षं होत आली. तिच्या मरणानंतर मी तिच्या डायऱया चाळत असताना जसा मला तिच्या मनाच्या एका वेगळ्याच पैलूचा थांग लागत गेला, तसा एक वेगळा पैलू तिचे गुगल ड्राईव्ह चाळतानाही मला लागला. कर्करोगग्रस्त असतानाही ती रोजनिशी लिहायची. त्यामुळे तिला खूप मोकळं मोकळं वाटायचं. ही तिची खाजगी बाब असल्यामुळे मी तिला तिची स्पेस देण्यासाठी त्या डायऱया कधीही वाचण्यास मागितल्या नाहीत. तिच्या मृत्यूनंतरच त्या डायऱया मी उघडून वाचल्या.
18 मार्च आमच्या लग्नाचा वाढदिवस. 2022 च्या 18 मार्चच्या रोजनिशीमध्ये लिहिलेले माधुरीचं हे मनोगत मला तिच्या मोबाइलच्या गुगल ड्राईव्हवर सापडलं. वाचून आठवणींचा कल्लोळ उडाला. माधुरी मरणाच्या दारात उभी असतानासुद्धा एवढय़ा तटस्थपणे कशी काय लिहू शकली याचं मला आश्चर्य वाटत राहिलं. असं लिहिण्यासाठी माणसाचं मन नुसतं खंबीर असून चालत नाही, तर ते विवेकीही असावं लागतं. तिच्या या मनोगतात तिला झालेल्या कर्करोगाचा परामर्ष घेत स्वतबद्दलचाही चिकित्सक वेध घेतला आहे. तो तिच्याच शब्दात…
`माझ्या पोटात अचानक दुखू लागलं म्हणून माझ्या मधुमेहावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी मला काही चाचण्या करून आणायला सांगितल्या होत्या. त्या पाहून त्यांना काय शंका आली न कळे, त्यांनी आणखी काही वेगळ्या चाचण्या करायला सांगितल्या. त्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की, मला स्वादुपिंडाचा कर्करोग झालेला आहे, त्या क्षणी मला धक्का बसणं स्वाभाविकच होतं. डॉक्टरांनी केलेल्या निदानामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले. पण ते शेवटचेच. तरीही `आपुले मरण पाहिले म्या डोळा’ अशी माझी त्या वेळी अवस्था झाली होती. पण तो क्षण सरल्यानंतर मी शांतपणे विचार केला आणि कर्करोग हा कोणालाही होऊ शकतो हे वैज्ञानिक सत्य मी मनोमन स्वीकारलं. मग `मलाच का हा रोग झाला?’ असा निराशावादी प्रश्न स्वतला विचारून मी स्वतला दुःखी करून घेतलं नाही.
मी सुरुवातीलाच ठरवलं होतं की, आपल्या आजाराबद्दल आपण जास्त कुणाला काही सांगायचं नाही. कारण लोकांच्या डोळ्यामधील माझ्याविषयीची बिचारेपण दाखवणारी सहानुभूती मला नको होती. मला त्यांच्यासमोर केविलवाणं होणं पसंत नव्हतं. शेवटी आजाराशी मला एकटीलाच लढायचं होतं. हा त्रास मी बाकीच्यांना का द्यावा? म्हणून कर्करोग झाल्याचं कळल्यावर परिवारात मी एकदाही माझ्या आजारपणाबद्दल चर्चा केली नाही. जोपर्यंत मी हालचाल करू शकत होते तोपर्यंत कधीही अंथरुणावर पडून राहिले नाही. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सकारात्मक विचाराने जाऊ लागले. तसंच माझी सर्व कामं मी नियमितपणे करत आहे.
तरीसुद्धा काही आप्तांनी खोचकपणे विचारलंच, `तुम्ही एवढय़ा आहारतज्ञ असूनसुद्धा तुम्हाला कॅन्सर कसा झाला?’ त्यांच्या या अज्ञानी प्रश्नाला मी फक्त हसून उत्तर देत असे. तर काही आप्तांनी सांगितलं की, `तुम्ही देवाधर्माचं काही करत नाही ना, म्हणून देवाने तुम्हाला शिक्षा दिली. आता तरी कुळाचार पाळा.’ त्यावर मी त्यांना एवढंच म्हणत असे की, `तुम्हीच म्हणता ना, की देव हा दयाळू आहे, करुणेचा सागर आहे. मग त्याला भजलं नाही म्हणून तो रागावून का शिक्षा देईल? आणि देवाला माणसासारखे रागलोभ असतील तर मग तो देव कसला… तो तर माणूसच.’ असो.
पण खरं सांगू, या कर्करोगामुळे मी खऱया अर्थाने जगण्यास शिकले. मी कृतज्ञ राहण्यास शिकले. खोचक प्रश्न विचारणाऱया माझ्या आप्तांनाही माफ करायला शिकले. म्हणूनच मी हा कर्करोगाचा प्रवास आनंदाने करू शकतेय. मी ज्या हॉस्पिटलमध्ये जातेय तेथील
डॉक्टर, तिथे काम करणारी माणसं, एवढंच काय, मला देण्यात येणारी औषधंही आपल्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येतात, असं मला वाटत असतं. म्हणून हॉस्पिटल माझ्यासाठी एक जिगीषा जागवण्याचं प्रतीक आहे.
माझ्या या साऱया दुःखद प्रवासात खरी कसोटी लागतेय ती जगदीशची. तो रॅशनल विचारांचा… विवेकी विचाराचा असल्यामुळे त्याने न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळली आणि अजूनही हाताळतोय. आता मी पलंगावरून उठूही शकत नाहीये. तेव्हाही तो न कुरकुरता प्रेमाने माझं सर्वकाही करत आहे. अगदी माझी शी-शूसुद्धा. माझ्या स्वच्छतेकडे लक्ष पुरवत आहे. त्याला जरासुद्धा या गोष्टीची किळस वाटत नाही. उलट हे सगळे करत असताना त्याच्या डोळ्यातून निखळ आणि नितळ प्रेमच बरसत असताना दिसतं. ते पाहून मी मात्र अचंबित होते. त्याच वेळी मी स्वतलाच प्रश्न विचारते की, जर हीच वेळ अशीच सेवा मला जगदीशसाठी करायला लागली असती तर मी करू शकले असते का? मला किळस आली असती का? प्रामाणिकपणे सांगते, मला ते शक्य झालं नसतं. त्यानेच मला निरपेक्ष प्रेम कसं करावं हे शिकवलं.
या कर्करोगाने मला हेही शिकवलं की, अडचणी आल्या तर त्या संधी म्हणून स्वीकारायला हव्यात. अत्यंत कठीण परिस्थितीत तुम्ही स्वतच स्वतचे चांगले मित्र असता. त्यामुळे स्वतवर प्रेम करा, हा महत्त्वाचा धडा मला कर्करोगाने दिलाय. आयुष्यभर लोकांच्या दृष्टिकोनातून आपण कसे दिसतो या नजरेने स्वतकडे पाहात असतो. त्यामुळे अनेकदा आपण नको ते मुखवटे घालून जगत असतो आणि स्वतचं आयुष्य मात्र जगायचं विसरून जातो. पण या रोगामुळे माझ्या आयुष्यात बऱयाच नकारात्मक गोष्टी घडत असतानादेखील मी सकारात्मकतेने जगायला शिकले. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला. माझ्यावर ओढवलेली परिस्थिती तर मी बदलू शकत नाही; पण आलेल्या या प्रसंगाला हसत हसत सामोरं जाणं माझ्या हातात आहे ना आणि मी तेच करतेय. कारण कर्करोग फक्त शरीराला होतो, तो तुमच्या मनाला कधीच होऊ शकत नाही.
माझ्या कर्करोगाच्या या प्रवासातून मी अजून एक तत्त्व शिकले की, आयुष्य हे अनाकलनीय आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही. काही गोष्टी आपल्या हातात आहेत, तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आनंदी राहणं, भरभरून जगणं तर आपल्याच हातात आहे ना! ते का सोडा? आयुष्यामध्ये आलेला प्रत्येक क्षण मग तो दुःखाचा असो किंवा सुखाचा; त्याचाही एक ठरावीक कालावधी असतो. माणूस जन्माला येताना एकटा येतो, मरतानाही एकटाच असतो. पण या दोन्ही टोकांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याच्या जिवाभावाची माणसं लाखमोलाची असतात. मग लहानसहान घडणाऱया अप्रिय घटनांमुळे आपण त्यांना आपल्या क्षुल्लक अहंकारापोटी दूर का लोटतो? म्हणून आनंदी जगा, हसत जगा. आपलं दुःख उगाळत न बसता लोकांनाही आनंदी जगायला शिकवा. कारण आयुष्याचा हा चलचित्रपट एकदा संपला की त्याचं पुनप्रक्षेपण होणं नाही. तुमच्या वेदनेत, संघर्षात, आनंदातच जीवनाचं सौदर्य दडलं आहे.