Ranji Trophy 2025 QF Marathi Updates: सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत फक्त २८ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळेच रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत तो मुंबईच्या संघात परतला आणि फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याला इथेही संघर्ष करावा लागला आहे. सर्वाधिक ४२ वेळा विजेता ठरलेल्या अन् गतविजेते असलेल्या मुंबई संघासमोर हरियाना संघाचे आव्हान आहे. कोलकाताच्या इडन गार्डवर सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या सत्रात हरियानाने बाजी मारलेली दिसतेय. मुंबईचे ४ फलंदाज त्यांनी २९ धावांत माघारी पाठवले आहेत आणि त्यात सूर्याच्या विकेटचा समावेश आहे.
मुंबई संघामध्ये अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल व शिवम दुबे हे स्टार खेळाडू असल्यानंतरही जम्मू - काश्मीर संघाविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले. मुंबई संघाने त्यानंतर मेघालयवर एक डाव व ४५६ धावांनी विजय मिळवला आणि बाद फेरीत प्रवेश केला. मुंबई - हरियाना यांच्यामधील उपांत्यपूर्व फेरीची लढत रोहतक येथील लाहली येथे होणार होती. पण ऐनवेळी ही लढत आता कोलकाता येथे हलवण्यात आली. त्यामुळे दोन्ही संघांसाठी प्रवासाची गैरसोय झाली. तसेच लढत हलवण्याचे कारणही बीसीसीआयकडून देण्यात आले नाही. याआधी हरियानाच्या घरच्या मैदानावर ही लढत होणार होती. आता ही लढत त्रयस्थ ठिकाणी होणार आहे.