अमृतस्नानाआधी मुख्यमंत्री योगींची अधिकाऱ्यांसोबत बैठक; वाहतूक अन् गर्दीसाठी प्लॅन लागू करण्याचे आदेश
esakal February 11, 2025 03:45 PM

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी माघ पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या अमृतस्नानाच्या तयारीचा आढावा घेतला. महाकुंभ मेळ्यातील पाचवं माघ पौर्णिमेचं स्नान १२ फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वाहतूक आणि गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्लॅन लागू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

सोमवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या बैठकीत अमृतस्नानाच्या तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रयागराज, कौशांबी, कानपूर, सुल्तानपूर, अमेठी, वाराणसी, अयोध्या, मीरजापूर, जौनपूर, चित्रकूट, बांदा, प्रतापगढ, भदोही, रायबरेली, गोरखपूर, महोबा आणि लखनऊच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाचं व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी दिशानिर्देश जारी केले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या आठवड्यात प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या खूप वाढली आहे. सार्वजनिक वाहनांसोबतच खासगी वाहनांमधूनही भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. अमृतस्नानावेळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक आणि गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्लॅन लागू केला पाहिजे. संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना लगेच योग्य ती माहिती द्यावी असंही योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ५ लाखांपेक्षा अधिक वाहनांसाठी पार्किंगचा वापर करायला हवा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनाला महाकुंभ मेळ्याच्या परिसरात परवानगी देऊ नये. मुलं, महिला आणि वृद्धांना सहकार्य करा. आवश्यकतेनुसार शटल बसचा वापर करावा. त्यांची संख्या वाढवावी. लोकांना पार्किंगमध्ये शिस्त पाळण्यासाठी प्रेरित करा.

गेल्या काही दिवसांपासून प्रयागराजला जाणाऱ्या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र समोर आलं. यावरही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला निर्देश दिले. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागू नयेत. ट्राफिक जामची स्थिती बनू नये. रस्त्यावर कुठेच वाहन उभा राहू देऊ नका. वाहतुकीची गर्दी कोणत्याही परिस्थितीत टाळायला हवी. वाहनांची हालचाल सतत सुरू राहिली पाहिजे असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. प्रयागराजच्या सीमेवरील सर्व जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांना वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात समन्वय साधण्यास सांगितलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.